Haryana Election Result: हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल, अशी अटकळ राजकीय तज्ज्ञ आणि एग्झिट पोल्सनी वर्तविली होती. मात्र सर्व शक्यता खोट्या ठरवत भाजपाने अनपेक्षित असा विजय मिळविला आहे. २०१९ पेक्षाही यावेळी अधिक जागा जिंकून भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याचे दिसत आहे. दोन टर्म सत्ता उपभोगल्यानंतर तिसऱ्यांदा भाजपाला सत्ता मिळणार नाही, असे वाटत असताना आधीपेक्षाही मोठा विजय भाजपाने प्राप्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सत्ता मिळवली असली तरी भाजपाच्या जागा घटल्या होत्या. त्यामुळे पक्षाला उतरती कळा लागली असल्याचे बोलले गेले. आताही हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक भाजपा नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपाचा मोठा विजय झाल्यामुळे आगामी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी ‘बुस्टर’ मिळाल्याचे बोलले जात आहे.

हरियाणामधील भाजपाच्या विजयाचा अर्थ काय?

हरियाणामधील विजयामुळे भाजपाला देशपातळीवर पराभवाची मरगळ झटकून काम करणे सोपे जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीत ४०० पारची घोषणा सत्यात उतरवणे आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर भाजपाला टीडीपी आणि जेडीयूचा पाठिंबा घ्यावा लागला होता. तर काँग्रेसने ५२ खासदारांवरून ९९ वर मजल मारली. तब्बल दशकभरानंतर लोकसभेला राहुल गांधी यांच्या रुपाने विरोधी पक्षनेता लाभला. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा उतरल्याची चर्चा विरोधकांनी सुरू केली होती.

हे वाचा >> विरोधात वातावरण, तरीही भाजपानं सत्ता कशी खेचून आणली? हे ‘पाच’ मुद्दे ठरले कळीचे

भाजपाचा पराभव करण्याचा राजमार्गच विरोधकांना मिळाला असल्याचे बोलले गेले. मोफत घोषणा, जातनिहाय जनगणना आणि जात समूहांना चुचकारून हिंदुत्वाच्या मुद्द्याचा प्रतिवाद करता येऊ शकतो, हा विरोधकांचा विश्वास होता.

हरियाणामध्ये आतापर्यंत सलग तिसऱ्यांदा एकाही पक्षाला सरकार स्थापन करता आलेले नाही. त्यातच शेतकरी आंदोलन, कुस्तीपटूंचे आंदोलन यामुळे भाजपा सरकारच्या विरोधात असंतोष पसरला होता. यामुळेच भाजपाने माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना बाजूला सारले आणि ओबीसी नेते नायब सिंह सैनी यांना १२ मार्च २०२४ रोजी मुख्यमंत्रीपदावर बसवले. काँग्रेसचे नेते भुपिंदरसिंह हुड्डा यांच्या एवढी नेतृत्वाची उंची आणि लोकप्रियता नसूनही नायब सिंह सैनी यांनी हळुहळु राज्यावर पकड घेत भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यास मदत केली.

हरियाणामधील विजयामुळे लोकसभेनंतर गमावलेला आत्मविश्वास भाजपाने पुन्हा मिळविला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाली, असेही बोलले जात होते, यालाही भाजपाने आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हे ही वाचा >> Haryana Assembly Election 2024 Result: हरियाणामध्ये काँग्रेसचं काय चुकलं? ही आहेत पराभवाची ५ कारणं

महाराष्ट्र आणि झारखंडवर काय परिणाम होईल?

हरियाणाच्या विजयाचा परिणाम महाराष्ट्र आणि झारखंडवर होईल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास तर दुणावला आहे, त्याशिवाय जागावाटपातही आता भाजपाला वरचष्मा ठेवता येणार आहे. इंडिया आघाडीसमोर आणखी ताकदीने आता भाजपाला उभे राहता येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हरियाणात जर काँग्रेसचा विजय झाला असता तर त्यांना इंडिया आघाडीत वजन प्राप्त झाले असते. जेणेकरून इंडिया आघाडीला आणखी मजबूती मिळाली असती. आता काँग्रेसचाच पराभव झाल्यामुळे इंडिया आघाडीच्या जागावाटपात वरचढ होता येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरियाणामध्ये भाजपाचने जाट वगळून ओबीसी, दलित मतदारांना जवळ करण्यात यश मिळविले. या रणनीतीचा फायदा त्यांना महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात नक्कीच होईल. हरियाणाप्रमाणेच भाजपाने महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विविध अनुदान आणि मोफत देण्याच्या घोषणा केल्या आहेत. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि वीज बिलात माफी दिल्यामुळे ग्रामीण भागातून मोठा जनाधार भाजपाला मिळण्याची शक्यता आहे.