scorecardresearch

Premium

अपक्ष ‘शिरीषा’चा तेलंगणा विधानसभेसाठी अनोखा प्रचार; म्हशीच्या व्हिडीओपासून झाली राजकारणाची सुरुवात

Telangana Assembly Elections 2023 : कर्ने शिरीषा (वय २६) पदवीधर असूनही बेरोजगार आहे. त्यामुळे म्हशी सांभाळाव्या लागत असल्याचा एक व्हिडीओ तिने तयार केला होता. या व्हिडीओपासून बेरोजगारीच्या विषयाला आपसूकच हात घातला गेला. आता कोल्लापूर विधानसभेतून ती अपक्ष निवडणुकीला उभी राहिली आहे.

telangana barrelakka
तेलंगणामध्ये बर्रेलक्का (barrelakka) या नावाने प्रसिद्ध झालेली शिरीषा (२६ वर्षे) ही मातब्बर नेत्यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत आहे. (Photo – princessbarrelakka Instagram)

Barrelakka Election Campaign : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. पाच राज्यांपैकी आता राजस्थान (२५ नोव्हेंबर) वगळता सर्वच राज्यांतील मतदान पार पडले आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहातील पक्षांनी तेलंगणावर लक्ष्य केंद्रित केले आहे. तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीही अंतिम दिवसांत जोरदार प्रचार करत आहे. मात्र, प्रस्थापित पक्षांच्या प्रचारादरम्यान एका २६ वर्षीय मुलीने अनोखा प्रचार करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. “बर्रेलक्का” या नावाने प्रसिद्ध असलेल्या कर्ने शिरीषा (Karne Shireesha) ही २६ वर्षीय पदवीधर असलेली मुलगी नगरकुर्नूल जिल्ह्यातील कोल्लापूर विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवत आहे. शिरीषाला एका व्हिडीओमुळे “बर्रेलक्का” हे नाव प्राप्त झाले, याचा मराठीत अर्थ होतो ‘म्हशींची बहीण.’ हे नाव पडण्याचा किस्सा मोठा रंजक आहे. या किश्श्याद्वारे शिरीषाने बेरोजगारी या गंभीर विषयाला हात घातला असून तिच्या प्रचारातही हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या तेलंगणामध्ये सोशल मीडिया स्टार झालेल्या शिरीषाच्या प्रचारासाठी मतदार, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था स्वतःहून उतरल्या आहेत.

हैदराबादमधील ओस्मानिया विद्यापीठ आणि काकतिया विद्यापीठातील अनेक विद्यार्थी सध्या कोल्लापूरमध्ये तळ ठोकून आहेत. शिरीषाच्या प्रचारासाठी स्वयंसेवकाची भूमिका बजावताना या विद्यार्थ्यांनी प्रचारात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शिरीषाच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत असताना लोकांचे लक्ष वेधून घेणारी गाणी तयार करणे, प्रचाराचे व्हिडीओ बनविणे आणि ते सोशल मीडियावर पसरविण्याचे काम हे स्वयंसेवक करत आहेत. शिरीषाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काही दिवसांतच तिच्या princessbarrelakka या इन्स्टाग्राम हँडलला पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स प्राप्त झाले आहेत. फेसबुक, यूट्यूबवरही फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे.

Inauguration of unfinished home platform opposition party is aggressive in badalapur
अपूर्ण होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनाचा घाट; बदलापुरात विरोधी पक्ष आक्रमक, उद्घाटनाला विरोध
Mayawati in loksabha
मायावतींच्या बसपाने गोंडवाना पक्षाशी तोडली युती; लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार
kolhapur, Eknath Shinde, lok sabha electyion, shiv sena
शिंदे गटाचे कोल्हापूरमध्ये अधिवेशन, दोन्ही जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान
Vijay Thalapathi
तमिळ स्टार ‘थलापथी’ विजयची राजकारणात एंट्री; विजयच्या राजकारणातील प्रवेशामागे कारण काय?

शिरीषाच्या मित्रांनी बनवलेली ‘Pedalikiakka, barrelakka’ (गरिबांची बहीण, आपली बर्रेलक्का) आणि ‘Nuvu whistle este vinapadtadi Andhra daka, barrelakka’ (शिटी वाजवली तर आंध्रामधूनही एकच आवाज येईल, बर्रेलक्का…) ही दोन गाणी सध्या खूपच लोकप्रिय झाली आहेत.

म्हशी चरायला नेण्यातून झाली राजकारणाची सुरुवात…

वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेली शिरीषा नोकरी न मिळाल्यामुळे आपल्या कुटुंबीयांचा पशुपालनाचा छोटासा व्यवसाय करत होती. एकदा म्हशींना चरायला नेले असताना शिरीषाने सहज व्हिडीओ तयार केला. यात ती म्हणते, “मी बी.कॉम होऊनही मला नोकरी नाही. हे बघा, मला म्हशी चरायला न्याव्या लागत आहेत.” शिरीषाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. शिरीषालाही हा व्हिडीओ इतका व्हायरल होईल, याची कल्पना नव्हती.

“मी फक्त वाणिज्य शाखेतून पदवीधर आहे. पण, माझे काही मित्र एम.फिल किंवा पीएचडी धारक आहेत, तरीही त्यांना नोकरी मिळालेली नाही. मी त्याच युवकांचा आवाज पुढे नेत आहे, जे उच्चशिक्षित असूनही बेरोजगार आहेत”, व्हिडीओ व्हायरल होण्यामागे काय कारण असावे, हे सांगताना शिरीषाने बेरोजगारीच्या समस्येला हात घातला.

यानंतर शिरीषाने निवडणुकीत उतरून युवकांचे, गरिबांचे प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला. आपल्या प्रचारादरम्यान तिने सांगितले, “माझ्या गावाची परिस्थिती अजूनही तशीच आहे. यासाठी भारत राष्ट्र समिती पक्ष जबाबदार आहे. तेलंगणाची निर्मिती झाल्यापासून हा पक्ष सत्तेत आहे. मात्र त्यांना युवक, गरिबांचे प्रश्न सोडवता आलेले नाहीत.”

शिरीषाच्या कुटुंबात शिक्षण घेणारी ती पहिलीच व्यक्ती आहे. तिचे कुटुंबीय पशुपालन करून आणि दूध विकून घर चालवितात. शिरीषाने सांगितले की, तिच्या बँक खात्यात सध्या फक्त ६,५०० रुपये आहेत. पण, तिच्या समर्थकांनी तिच्यासाठी पैसे गोळा केले. प्रचारासाठी वाहनाची व्यवस्था केली. माजी आमदार आणि पुद्दुचेरीचे माजी मंत्री मल्लाडी क्रिष्णा राव यांनी प्रचारासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. अनेक स्वयंसेवी संस्था जसे की, रायथू स्वराज वेदिका या शेतकरी संघटनेनेही मदत दिली असून शिरीषाला पाठिंबा जाहीर केला आहे.

काही विद्यार्थ्यांनी घरातच एक छोटासा स्टुडिओ उभारला असून शिरीषासाठी व्हिडीओ आणि गाण्याच्या स्वरूपात प्रचार साहित्य तयार केले जात आहे. आर. वेकंटेश या विद्यार्थ्याने सांगितले की, माझ्यासारखे शेकडो विद्यार्थी कोल्लापूर येथे आले असून ते प्रचारात गुंतले आहेत.

कोल्लापूरमधील मातब्बर नेत्यांशी स्पर्धा

शिरीषाची लढत भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) विद्यमान आमदार हर्षवर्धन रेड्डी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार जुपल्ली क्रिष्णा राव यांच्याशी आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये या दोन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत झाली आहे. २०१४ साली जुपल्ली राव (तेव्हा बीआरएस) यांनी रेड्डी (तेव्हा काँग्रेसमध्ये होते) यांचा पराभव केला. २०१८ साली रेड्डी (काँग्रेस) यांनी राव यांचा (बीआरएस) पराभव केला होता.

जुपल्ली क्रिष्णा राव यांना जेव्हा शिरीषाच्या प्रचाराबाबत विचारले, तेव्हा ते कुत्सितपणे हसले आणि म्हणाले, “व्हिडीओ बनवून मते मिळत नसतात. तुम्हाला निवडणुकीला उतरण्यासाठी लोकांची नाडी माहीत असावी लागते. मी पाचवेळा आमदार राहिलो आहे, मला माहितीये लोकांना काय हवे आहे. राजकारणात नवशिके येत राहतात. त्यांना वाटते की आपण सोशल मीडियावर स्टार आहोत म्हणून निवडणूक जिंकू, तर त्यांना राजकारणाबाबत काहीच माहीत नाही, असे मी म्हणेन. फार फार ते प्रचारात रंग भरतात, बाकी काही नाही.”

मंगळवारी (दि. २१ नोव्हेंबर) कोथापल्ली येथे प्रचार करत असताना एका अज्ञात व्यक्तीने शिरीषाचा भाऊ के. चिंटूला मारहाण केली. मारहाणीनंतर पेड्डाकोथापल्ली येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. याचदरम्यान भावाला मारहाण झाल्यानंतर रडत असलेल्या शिरीषाने पोलिसांना फोन केल्याचे आणि त्याच वेळी पोलिस एका वाहनात लपून बसल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या नव्या व्हिडीओमुळे शिरीषाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Independent shirisha unique campaign for telangana assembly election powered by volunteers and social media kvg

First published on: 23-11-2023 at 12:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×