लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला मागच्याच आठवड्यात सुरुवात झाली आहे. १९ एप्रिलला पहिला टप्पा पार पडला आहे. तर पुढचा टप्पा २६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. मुंबईसह नाशिक, ठाणे या ठिकाणी २० मे रोजी मतदान होणार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष यावेळी शिवसेनेच्या नाही तर काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत. याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार यामागचं गणित काय?

उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब काँग्रेसला मतदान करणार यामागचं गणित काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब उत्तर मध्य मुंबईत राहतात. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या करारानुसार उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला देण्यात आला आहे. काँग्रेसने उमेदवारी कुणाला द्यायची हे जाहीर केलेलं नाही. मात्र काँग्रेसलाच ही जागा लढवायची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय हे काँग्रेसला मतदान करतील हे उघड आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हा उद्धव ठाकरेंचा मित्र पक्ष आहे.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंची शिवसेना लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार?, सुषमा अंधारेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या..

शिवसेना भाजपाची युती होती पण..

१९८९ पासून शिवसेना आणि भाजपाची युती होती. दोन्ही पक्षांनी सर्व निवडणुका एकत्र लढवल्या. त्यामुळे मुंबईतील लोकसभेच्या बहुतांश जागांवर उमेदवार निवडून आणण्यास मदत झाली. मात्र भाजपा आणि शिवसेनेचं भांडण २०१९ मध्ये झालं. त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्या. आता राज्यात शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. तर सत्तेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना (उबाठा) हे तिघेही एकत्र निवडणूक लढवणार असून उत्तर मध्य मुंबईतील जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना तिथे शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करता येणार नाही. तर दुसरीकडे याचप्रमाणे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करता येणार नाही. दोघेही नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे मतदार आहेत. इंडिया आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला ही जागा मिळाली नसून आम आदमी पक्षाकडे ( आप) ही जागा गेली आहे.