महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता सुटलाय असंच दिसतं आहे. दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता ठाणे आणि कल्याण आपल्याकडे राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाण्यातून नरेश म्हस्के हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एक्स या हँडलवरुन याची माहिती देण्यात आली आहे. ठाण्याच्या जागेसाठी भाजपा इच्छुक आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. तसंच कल्याणमध्येही काय घडतं त्याबाबत चर्चा होत होत्या. अखेर शिवसेनेचे दोन्ही बालेकिल्ले आपल्याकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं आहे.

कल्यामधून लढणार श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा आजपर्यंत झाली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील याचे संकेत दिले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. त्यात ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नरेश म्हस्केंची लढत राजन विचारेंशी असणार आहे तर श्रीकांत शिंदेंची लढत वैशाली दरेकरांशी असणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली बैठक

ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. या बैठकीत नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे यांचा सहभाग होता. उमेदवार निवडण्याची चर्चा या बैठकीत पार पडली. त्यानंतर नरेश म्हस्केंच्या नावाबाबत एकमत झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे लोकसभेसाठी अनेक नावांची चर्चा सुरुवातीपासून होत होती. प्रताप सरनाईक, मिनाक्षी शिंदे अशी अनेक नावे समोर आली आहे. भाजपाकडून देखील संजय केळकरांचे नाव चर्चेत होते. या जागेसाठी एकनाथ शिंदेंनी अनेक बैठका घेतल्या. अखेर ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश मिळाले आहे. भाजपचा आग्रह मोडत एकनाथ शिंदेंनी ही जागा आपल्याकडे ठेवली आहे.