मुंबई : महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांना प्रत्येकी ८५ जागांचे वाटप निश्चित करण्यात आले. उर्वरित ३३ जागांसाठी पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या मनमानीमुळे काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला नसून २५-३० जागांच्या वाटपाबाबत भाजप पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे नवी दिल्लीत असून गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची रात्री उशिरा चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. काँग्रेस ८५, शिवसेना ८५ तर राष्ट्रवादीला ८५ असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. तिघांना प्रत्येकी ८५ म्हणजे २५५ संख्याबळ होत असताना संजय राऊत यांनी २७० जागांवर एकमत झाल्याचा दावा केला. काँग्रेसला हे जागावाटपाचे सूत्र पसंत पडलेले नाही. मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत काँग्रेस १०५, शिवसेना ९५ तर राष्ट्रवादीला ८५ जागांचे सूत्र ठरले होते. मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याबाबत उद्या चर्चा करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. समाजवादी पक्ष, शेकाप, माकप, भाकप आदी मित्रपक्षांबरोबर गुरुवारी बैठक घेऊन या जागा अंतिम केल्या जाणार आहेत.

भाजपच्या दुसऱ्या यादीची प्रतीक्षा

शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना हव्या असलेल्या जागांवर भाजपचा दावा असून या दोन्ही पक्षांनी ठरविलेल्या काही उमेदवारांबाबतही आक्षेप आहेत. अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसल्याने शिंदे-पवार गटात नाराजी असून शिंदे गटाने ४५ व पवार गटाने ३८ उमेदवारांचीच यादी जाहीर केली आहे. त्यांच्या उर्वरित जागांसाठी इच्छुक असलेले उमेदवार आणि त्या जागा कोणी लढवायच्या, याबाबत भाजपचे काही आक्षेप आहेत. भाजपने केलेले सर्वेक्षणाचे अहवाल, उमेदवार जिंकून येण्याची क्षमता आणि उमेदवाराविषयीचे जनमत आदी मुद्द्यांवर चर्चा होत आहे. उर्वरित जागावाटपाबाबत शहा यांच्या भेटीतच तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा निर्णय होत नसल्याने भाजपची दुसरी यादी रखडली असून ती बुधवारी रात्री किंवा शक्यतो गुरुवारी जाहीर होईल, असे सूत्रांनी नमूद केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बुधवारी नवी दिल्लीला जाण्याची शक्यता असून भाजपची दुसरी यादी बुधवारी रात्री किंवा गुरुवारी जाहीर होईल, असे सांगण्यात आले.

काँग्रेसला १०० जागा मिळण्यावर प्रश्नचिन्ह

काँग्रेसला १०५ जागा मिळतील असा दावा महाविकास आघाडीत केला जात होता. मात्र सध्या तरी काँग्रेसला ८५ जागांवरच रोखण्यात आले आहे. उर्वरित जागांतून काही जागा मिळाल्यात तरी काँग्रेसला १०० जागा तरी मिळतील का, याबाबत शंका असल्याचे आघाडीतील एका नेत्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेच्या यादीवर आक्षेप

बैठक सुरू असतानाच अखेरच्या क्षणी शिवसेनेकडून ६५ जागांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीवरून बैठकीत पुन्हा नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाली. या यादीत रामटेकची जागा विशाल बरबटे यांना दिल्याचे जाहीर करण्यात आले होते. अखेर पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी ही यादी अंतिम नसल्याचे जाहीर केले. या यादीतील काही जागा या मित्रपक्ष शेकाप तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही जाऊ शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गणित कच्चे

पत्रकार परिषदेत ८५-८५-८५ जागांचे सूत्र ठरले असून २७० जागांवर सहमती झाल्याचे संजय राऊत व नाना पटोले यांनी सांगितले. प्रत्यक्षात २५५ जागांचाच निर्णय अंतिम झाला असताना २७० जागांचा दावा करण्यात आला. सहमती झालेल्या जागांपैकी १५ जागांचे वाटप कसे होणार हे गणित मात्र मांडण्यात आले नाही.