कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेसच्या या विजयानंतर कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे दोन नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. यावेळी शिवकुमार यांनी खरगेंकडे मुख्यमंत्रीपदाबाबतची त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांनी खरगे यांच्याकडे पुढील मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच २०१९ मध्ये काँग्रेस सरकार कोसळल्यानंतर राज्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यात मदत केली, असं डीके शिवकुमार यांनी खरगेंना सांगितलं. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

हेही वाचा- कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार; दोघांचा राजकीय इतिहास जाणून घ्या

खरं तर, विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर कर्नाटकात सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या दोघंही काँग्रेस नेतृत्वाला भेटण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले.

हेही वाचा- “हिंदू कुंभकर्णाचे बाप…”, कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर शरद पोंक्षेंची आगपाखड!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी शिवकुमार यांनी खरगे यांना सांगितलं की, सिद्धरामय्या यांना आधीच मुख्यमंत्री बनण्याची संधी देण्यात आली होती. आता मुख्यमंत्री बनण्याची माझी पाळी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याची संधी मला मिळायला हवी. मला मुख्यमंत्री करा, अन्यथा मी केवळ आमदार म्हणून पक्षात काम करणं पसंत करेन, असंही शिवकुमार म्हणाले.