पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. १४ नोव्हेंबर) काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे प्रचाराची धामधूम सुरू आहे. त्यातच राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना “मुर्खांचे सरदार” असल्याचे संबोधले. भारतात वापरले जाणारे मोबाइल हे शक्यतो चीनमधून तयार होऊन आलेले आहेत, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत आता एक लाख कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे मोबाइल निर्यात करणारा देश बनला आहे. काँग्रेस नेते भारताच्या यशाकडे दुर्लक्ष करण्याच्या मानसिक आजाराने ग्रासले आहेत.”

राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काल काँग्रेसच्या काही शहाण्यांनी टीका केली. भारतातील लोक चीनमधून आलेले मोबाइल वापरतात, असे त्यांनी सांगितले. अरे मुर्खांच्या सरदार, तू कोणत्या जगात राहतोस? भारताच्या यशाकडे दुर्लक्ष करण्याच्या मानसिक आजाराने काँग्रेस नेत्यांना ग्रासले आहे. त्यांनी कोणता परदेशी चष्मा घातलाय, ज्यामुळे त्यांना भारत दिसत नाही, याचे मला आश्चर्य वाटते.” काँग्रेसवर टीका करत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारत आता मोबाइल उत्पादन करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश बनला आहे.

Rahul gandhi slams pm modi in karnataka rally
“पंतप्रधान मोदी नैराश्यग्रस्त, कदाचित ते स्टेजवरच…”, राहुल गांधी याचं मोठं विधान
MP Rahul Gandhi On PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचं आव्हान; म्हणाले, “फक्त एवढंच समजून सांगा…”
BJP agenda is polarisation K C Venugopal Congress Loksabha Election 2024
“ध्रुवीकरण हाच नरेंद्र मोदींचा अजेंडा”; भाजपा वास्तवातील प्रश्नांपासून दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
Pm Narendra Modi On Congress Manifesto
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, “जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची…”

“काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत होता, तेव्हा भारतात केवळ २०,००० कोटी रुपयांचे मोबाइल उत्पादन होत होते. आज, भारतातील मोबाइल उद्योग २.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यातही भारतातून एक लाख कोटी रुपयांचे मोबाइल निर्यात होत आहेत”, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

राहुल गांधी यांनी काय म्हटले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका करण्यात राहुल गांधी नेहमीच आघाडीवर असतात. सध्या ते प्रचारात दंग आहेत. सोमवारी एका जाहीर सभेत बोलत असताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष भारताला उत्पादनाचा हब बनवू इच्छित आहे. “तुम्ही तुमच्या मोबाइल फोनच्या मागे पाहा, तुमच्या शर्ट, बुटावर पाहा, तिथे “मेड इन चीन” (Made in China) असे लिहिलेले आढळेल. कॅमेरा किंवा शर्टच्या मागे तुम्ही कधी “मेड इन मध्य प्रदेश” असा टॅग लिहिलेला पाहिला आहे का? आम्हाला नेमके हेच अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आमचा पक्ष प्रयत्न करेल”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडताना भाजपाला टोला लगावला होता.

काँग्रेसला मध्य प्रदेशातून उखडून टाका

मंगळवारी मध्य प्रदेशमध्ये आणखी एका जाहीर सभेत बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी पाहतोय की, सभेला विराट जनसागर जमलेला आहे. सभेसाठी जी व्यवस्था केली, तीदेखील अपुरी पडली असून लोकांना मंडपाच्या बाहेर उन्हात उभे राहावे लागत आहे. जनतेचा हा जनसागर राज्यातील काँग्रेसचा मंडप उखडून फेकेल.”

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता असताना राज्याला लुटण्याचे काम करण्यात आले, असाही आरोप मोदी यांनी काँग्रेसवर केला.

राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी, अमित शाह लक्ष्य

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार चोरले आणि काँग्रेसचे आमदार विकत घेतले, असा आरोप केला. २०१८ साली मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. मात्र २०२० साली जोतिरादित्य सिंदिया यांनी बंडखोरी केल्यामुळे अवघ्या १५ महिन्यातच माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पडले होते.

“पाच वर्षांपूर्वी तुम्ही लोकांनी (जनतेला उद्देशून) काँग्रेसचे सरकार निवडून दिले होते. तुम्ही भाजपाऐवजी काँग्रेसचा पर्याय निवडला होता. पण त्यानंतर भाजपा नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सरकार चोरले. आमचे आमदार त्यांनी विकत घेतले”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपावर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली.

मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.