Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगाची तयारी जोरात सुरू आहे. या वेळी कर्नाटकच्या २२४ विधानसभा मतदारसंघापैकी ११२ मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत हेच प्रमाण ६७ मतदारसंघात अधिक असल्याचे आढळून आले होते. मात्र या वेळी महिलांची संख्या ११२ मतदारसंघात अधिक असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांच्या डेटावरून लक्षात आले. यासोबतच मतदार याद्यांतील महिला मतदारांचे प्रमाण या वेळी वाढल्याचे दिसून आले आहे. मागच्या पाच वर्षांत १००० पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या वाढून ९७३ ते ९८९ पर्यंत पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने जी अंतिम यादी तयार केली आहे, त्यानुसार पुरुष उमेदवारांची संख्या २.६७ कोटी तर महिला उमेदवारांची संख्या २.६४ कोटी असल्याचे आढळून आले आहे. मंगळुरु शहरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आढळून आले आहे. या ठिकाणी १००० पुरुष मतदारांमागे १,०९१ महिला मतदारांची संख्या आहे. तर महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात हे प्रमाण सर्वात कमी आहे. या ठिकाणी हे प्रमाण १००० : ८५८ असे आहे.

हे वाचा >> Karnataka Election: “…तर मला विषारी साप बनणं मंजूर”, पंतप्रधान मोदी यांचं विधान!

कर्नाटकचे विशेष निवडणूक अधिकारी ए.व्ही. सूर्या सेन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, लोकसंख्येमधील लिंग गुणोत्तराच्या प्रमाणाचे प्रतिबिंबच मतदार याद्यातील गुणोत्तरावर दिसते. तसेच स्थलांतर आणि आयोगाने मागच्या काळात मतदार याद्या दुरुस्तीची जी मोहीम हाती घेतली होती, त्यावरून हे लिंग गुणोत्तर दिसत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, दक्षिण मंगळुरु मतदारसंघातून पुरुषांचे परदेशात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले आहे, त्यामुळेच या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक दिसत आहे.

त्याचबरोबर दोन ते तीन वेळा नोंदणी झालेले एकच नाव काढून टाकण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली होती. यामध्ये पुनःपुन्हा नोंदणी झालेली, तसेच जे लोक परदेशात गेलेले आहेत, त्यांची नावे वगळण्यात आली आहेत, असेही विशेष अधिकाऱ्यांनी सांगितले. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी आणि मतदान केल्यामुळेदेखील ही संख्या वाढलेली दिसत आहे.

हे वाचा >> वॉरंटी संपलेली काँग्रेस गॅरंटी कसली देणार? कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ७०.४७ टक्के महिलांनी मतदान केले होते. २०१८ च्या निवडणुकीत हे प्रमाण वाढून ७१.५३ टक्के झाले. याच प्रमाणाची तुलना पुरुष मतदारांशी केल्यास २०१३ साली ७२.४० टक्के असलेले प्रमाण २०१८ साली ७२.६८ टक्के झाले. २००८ च्या निवडणुकीत पुरुष आणि महिला उमेदवारांचे प्रमाण हे अनुक्रमे ६६.२ आणि ६३.१ टक्के होते.

कर्नाटकमधील बागलकोट, बंगळुरु ग्रामीण, बेळगाव, बेल्लरी, विजापूर, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, चित्रदूर्ग, दक्षिण कन्नड, दावणगेरे, धारवाड, गडग, गुलबर्गा, हसन, कोडागू, कोलार, कोप्पल, मंड्या, म्हैसूर, रायचूर, रामनगरम, शिमोगा, तुमकूर, उत्तर कन्नड, विजयनगर आणि यादगीर या जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या वाढलेली आहे. ११२ मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांच्या १००० या संख्येपेक्षा अधिक आहे. तर १०८ मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या ९०० च्या आसपास आहे. तर चार मतदारसंघात हा आकडा ९०० च्या खाली आहे. दक्षिण बंगळुरु ८९७, दसराहळ्ळी ८७७, बोम्मनहळ्ळी ८६७ आणि महादेवापुरा ८५८ असे लिंग गुणोत्तर आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More women voters than men in half of karnataka assembly seats kvg
First published on: 01-05-2023 at 18:03 IST