महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेचं ठरलं आहे की बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवायची आणि विजयाची तुतारी फुंकायची असं म्हणत आज अमोल कोल्हे यांनी रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठीचं भाषण सुरु केलं. पुण्यात आज महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्या सभेत टोकदार भाषण करत अमोल कोल्हे यांनी त्यांच्या खास शैलीत भाजपावर टीका केली आणि अजित पवारांना शाब्दिक चिमटे काढले.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

माझ्यासारखा शेतकरी कुटुंबातला मुलगा जेव्हा लोकभेत गेला तेव्हा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंनी मोठ्या बहिणीप्रमाणे संसदेत पाऊल ठेवताना सांगितलं की इथे पाऊल ठेवतोस ते शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या आशीर्वादाने. जेव्हा जनतेच्या धोरणांविषयी चर्चा होईल तेव्हा तुझा आवाज लोकांच्या हक्कासाठी गरजला पाहिजे असं सुप्रियाताईंनी सांगितलं होतं. महायुतीला पराभव समोर दिसू लागला आहे तेव्हा देशाच्या धोरणांबद्दल बोललं जात नाही. वैयक्तिक टीका सुरु झाली आहे. मग प्रश्न विचारले जातात तुझ्या आवाजात किती निधी दिला. मला तर प्रश्नच पडतो की लोकसभेची निवडणूक आहे की ग्रामपंचायतीची निवडणूक आहे असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांनी मिमिक्रीही केली.

वैयक्तिक टीका केली जाते आहे

मला प्रश्न विचारला जातो तू तुझ्या गावात किती वेळा येऊन गेला? वैयक्तिक टीका करतात, कुणीतरी म्हणालं नटसम्राट पाहिजे की कार्यसम्राट पाहिजे. मी विनम्रतेने त्यांना सांगितलं नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो. पण धोकेसम्राट, खोकेसम्राट आणि पलटी सम्राट चालत नाही असं म्हणत अजित पवारांना अमोल कोल्हेंनी टोला लगावला. त्यादिवशी कुणीतरी असंही म्हणालं की पाहिजे तेव्हा निधी देतो पण कचाकचा बटण दाबा. सत्तेचा हा उन्माद आणि मस्ती आहे दुसरं काय? जो निधी देणार आहात तो तुमच्या खिशातला निधी नाही. आम्ही औषधं, कपडे घेतो तेव्हा जो जीएसटी भरतो तो निधी म्हणून येतो. असंही अमोल कोल्हेंनी सुनावलं आहे.

शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही सगळी मस्ती आणि उन्माद येतो कुठून? शेतकरी काबाडकष्ट करतो मात्र शेतकऱ्यांची कर्जं माफ केली जात नाहीत. खास उद्योजकांची कर्जं माफ केली जातात. यांनी इलेक्ट्रॉरल बाँडच्या माध्यमातून जो निधी उभा केला त्यातून सरकारं पाडली. आता निवडणूक लोकांनी हाती घेतली आहे. मतदान केंद्रावर जाऊन मत द्यायला पाच मिनिटं लागतात. ते मत देण्याआधी पाच वर्षांमधल्या गोष्टींचा हिशोब आठवा. असं आवाहन अमोल कोल्हेंनी केलं आहे.