राममनोहर लोहिया यांनी नेहमीच काँग्रेसचा विरोध केला. मात्र, आता त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनीच काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीवर निशाणा साधला. ते शनिवारी उत्तर प्रदेशच्या बदाऊन येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशचे सरकार केवळ राजकीय फायद्यासाठी तरूणांच्या आशा-आकाक्षांशी खेळले. अखिलेश यादव यांनी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी तरूणांच्या भविष्याच्या वाटा बंद केल्या.  स्वातंत्र्याला ७० वर्ष उलटूनही येथील १८ हजार गावांमध्ये अजूनही वीज का पोहचली नाही?, असा सवालही यावेळी मोदींनी विचारला. अखिलेश यांचे काम कमी, कारनामेच जास्त आहेत,असा टोलाही यावेळी मोदींनी लगावला.

दरम्यान, समाजवादी पक्ष राज्यातील गुन्हेगारांना आश्रय देत असल्याचेही मोदींनी सांगितले. काहीही पाप केले तरी मुलायम सिंह ‘लहान आहे, चुका तर होणारच’, असे म्हणतात. त्यामुळे राज्यात महिला असुरक्षित आहेत, त्या घराबाहेरही पडू शकत नाहीत. उत्तर प्रदेश सरकारचा एकुणच कारभार बेजबाबदारपणाचा आहे. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवताच बसप-सपसह सर्वच राजकीय पक्ष माझ्या विरोधात एकवटले आहेत. मात्र, दिल्लीतील माझे सरकार भ्रष्टाचार , काळा पैसा, गरिबीच्या उच्चाटनासाठी आणि गरीबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी मोदी यांनी सांगितले.

येत्या १५ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून त्यामध्ये बदाऊनचा समावेश आहे. तत्पूर्वी आज उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील ७३ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. मागील निवडणुकीत याठिकाणी सपा आणि बसपला प्रत्येकी २४ जागा मिळाल्या होत्या.