उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या आई आशाताई पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माझी आई माझ्या बरोबर आहे असं म्हटलं आहे. तसंच याची नोंद सगळ्यांनी घ्यावी असंही स्पष्ट केलं. माझी आई माझ्या बरोबर आहे हे अजित पवारांचं वक्तव्य दिवार सिनेमातील संवादाशी जोडलं जातं आहे. अशात अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांच्यावर पु्न्हा एकदा टीका केली आहे.

आज मतदानाचा हक्क बजावल्यानंतर काय म्हणाले अजित पवार?

“आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब माझ्या विरोधात असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबात सगळ्यात ज्येष्ठ माझे वडील अनंतराव पवार होते. आज माझी आई माझ्या बरोबर आहे. याची नोंद सगळ्यांनी घ्यावी. आज आम्ही मतदान केलं. महायुतीचा उमेदवार यावा या दृष्टीने प्रचार केला होता. आरोपांचा धुरळा माझ्या विरोधात उठवला आहे. मी मात्र या आरोपांकडे लक्ष दिलेलं नाही. माझ्या शेवटच्या सभेपर्यंत बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. आता अंतिम गोष्टी मतदारांच्या हातात आहेत. आज मतदान होणार आहे. आम्हाला एक विश्वास आहे की बारामतीत केलेलं काम आणि नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत केलेलं काम हे सगळं बारामतीकर लक्षात घेतील. जनतेने मला साथ दिली आहे आताही मला साथ देईल अशी मला खात्री आहे.”

Ajit Pawar: “बाबा तूच वस्तरा घेऊन ये, आणि..”, मिशी काढण्याच्या टीकेवरुन अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना उत्तर

श्रीनिवास पवार काय म्हणाले?

माझी आई माझ्या बरोबर आहे याची नोंद घ्यावी या अजित पवारांच्या वक्तव्यावर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार भाजपासह गेल्यापासून अशाच प्रकारे बोलत आहेत. अजित पवारांनी ८६ वर्षांच्या आईला राजकारणात ओढायला नको होतं” असं श्रीनिवास पवार म्हणाले. अजित पवार यांनी यावर काहीही उत्तर अजून दिलेलं नाही. मात्र आज त्यांनी हेदेखील सांगितलं की पवार कुटुंब खूप मोठं आहे आणि माझ्या विरोधात फक्त तीन कुटुंब गेली आहेत.

मला अजितची भूमिका पटलेली नाही

सुप्रिया सुळे ही माझी लहान बहीण आहे. ग्रामीण भागात आम्ही कधीही सख्खे चुलत करत नाही. ती माझी बहीण आहे म्हणून मी त्यांच्या बाजूने आहे. पैसे वाटपाचं काय प्रकरण आहे ते रोहित फिरत असेल तर रोहितला माहीत असेल असंही श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे. राजकारणात आम्ही कुणीच नाही. मी त्याचा सख्खा भाऊ आहे. मी वेगळा झालो पण मला त्याची भूमिका पडली नाही त्यामुळे मी उघड भूमिका घेतली आहे. चांगली गोष्ट आहे की आई त्याच्या बरोबर सांगितलं. मोदींच्या आई बद्दल दादा काही दिवसांपूर्वी बोलला होता. तोच प्रकार दादा तिकडे जाऊन शिकला असाही टोला श्रीनिवास पवार यांनी लगावला.

माझ्याविरोधात तीन कुटुंबं गेली पूर्ण कुटुंब नाही

श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची आईही पवार घराण्यातील संघर्षामुळे बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्या आहेत असंही वक्तव्य केले होते. याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकत्र असल्याचे दाखवले. माझी आई सगळ्यात जेष्ठ आहे. माझी आई माझ्याबरोबर आहे. माझी आई कोल्हापूरला होती. माझ्या आत्याच्या मुलाचे लग्न होते. मला तिने सांगितले होते की, मी मतदानाला तुझ्यासोबत येईल. माझी आई माझ्याबरोबर आहे. आमचे कुटुंब फार मोठं आहे. आमच्या विरोधात फक्त तीन कुटुंब आहेत, बाकी कुणी माझ्याविरोधात नव्हते, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.