आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली आहे. मात्र, दुसरीकडे समोर आलेल्या ओपिनियन पोलमध्ये शिंदे गट व अजित पवार गटासाठी अनपेक्षित अंदाज वर्तवण्यात आले आहेत. एबीपी माझा-सी व्होटर ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात सेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीला ३० जागा तर उबाठा-शरद पवार गट-काँग्रेस मविआला १८ जागा मिळतील असा अंदाज आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटासाठी एकही जागा या अंदाजात नमूद करण्यात आलेली नाही!

अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही?

एबीपी माझा-सी व्होटर पोलनुसार, राज्यात महायुतीला ३० जागा मिळतील. त्यात एकट्या भाजपाला २२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. उरलेल्या ८ जागांसाठी शिंदे गट व अजित पवार गट यांना मिळून विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला एकाही जागेवर विजय मिळणार नाही असा सूर या सर्व्हेमधून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द अजित पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंचं पारडं जड असल्याचा निष्कर्ष या अंदाजांवरून काढला जात आहे.

बारामतीमध्ये सध्या पवार कुटुंबात थेट लढत असल्याचं दिसत आहे. एकीकडे या मतदारसंघातून निवडून गेलेल्या सुप्रिया सुळे असून दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार आहेत. अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बारामतीत सभा व बैठकांचा धडाका लावला असतानाच समोर आलेले ओपिनियन पोलचे अंदाज त्यांच्यासाठी धक्का मानले जात आहेत.

भाजपाची जागा कमी होणार?

दरम्यान, गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाची एक जागा या निवडणुकीत कमी होणार असल्याचं या सर्वेमधून अंदाजित करण्यात आलं आहे. मात्र, ती एक जागा नेमकी कोणती असेल, याविषयी स्पष्ट माहिती अद्याप आलेली नाही. त्याचवेळी शिरूरमध्ये पुन्हा एकदा अमोल कोल्हेंच्याच गळ्यात विजयाची माळ पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी व त्यांनी नुकताच पक्षप्रवेश केलेल्या अजित पवार गटासाठी ही चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

Opinion Poll: मुंबईत उद्धव ठाकरेंना झटका? भाजपा आणि शिंदेंची शिवसेना बाजी मारणार? ‘हा’ अंदाज काय सांगतो?

सुनील तटकरेंसाठी रायगड अवघड?

एकीकडे बारामती व शिरूरमध्ये अजित पवार गटाच्या पराभवाचा एबीपी-सी व्होटर पोलचा अंदाज आलेला असताना दुसरीकडे रायगडमध्येही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हे सर्व अंदाज ओपिनियन पोलच्या निष्कर्षांच्या आधारावर वर्तवण्यात आलेले आहेत. अंतिम निकाल ४ जूनला हाती आल्यानंतर ते खरे ठरले की चुकीचे यावर नेमकं शिक्कामोर्तब होऊ शकेल.