लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ११ जागांवरील प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या. या प्रचारकाळात महाविकास आघाडी व महायुती या राज्यातील दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी, टोलेबाजी, कोपरखळ्या, टोमणे असं सगळं मतदारांना पाहायला मिळालं. मात्र, एकीकडे मतदानाच्या आधीच्या या घडामोडी घडत असताना दुसरीकडे निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष दिसणार नाहीत, असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये लोकसभेच्या ४८ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यातील पहिल्या दोन टप्प्यांसाठी मतदान झालं असून ७ मे, १३ मे आणि २० मे या तीन दिवशी अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. ४ जून रोजी देशभरातील सर्व जागांची मतमोजणी होईल. मात्र, त्यानंतर दोन पक्ष लोप पावतील, असं चव्हाण यांनी म्हटल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. हे दोन पक्ष नेमके कोणते? याबाबत त्यांनी भाष्य केलं नसलं, तरी त्यावरून अंदाज बांधले जात आहेत.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली. “सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल एवढा चांगला निकाल मविआच्या बाजूने लागेल. जीएसटी, महागाई, बेरोजगारी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहेत. नेते काय सांगतात यापेक्षा मोदी नकोत ही एक सुप्त लाट आहे. मोदींची तारांबळ झाली आहे. धावपळ होत आहे. जर तुम्ही ४०० पारचा नारा दिला आहे, तुमचं निर्विवाद बहुमत येणार असेल तर तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चौकशी का करत आहात?” असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
“तुमचं सरकार येणार हे निश्चित असेल तर तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगा. त्यांना पराभव डोळ्यांसमोर दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेले विषय घेऊन ते बोलत आहेत. जी भाषा त्यांनी शरद पवार, राहुल गांधींबाबत वापरली, त्यामुळे १० वर्षं सत्तेत असलेली व्यक्ती आपल्या १० वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेत नाहीच. पण अपूर्ण आश्वासनं पूर्ण करणार का? यावरही काही बोलत नाहीत. ते भाजपाच्या जाहीरनाम्याबाबत बोलत नाहीत. फक्त काँग्रेस आली तर तुष्टीकरण होईल, तुमचं मंगळसूत्र घेऊन जातील, तुमच्या घरातली एक खोली घेऊन जातील अशी अनेक न पटणारी, लोक चक्रावून जातील अशी विधानं पंतप्रधान करत आहेत”, असं चव्हाण यावेळी म्हणाले.
“या दोन पक्षांमधली माणसं…”
“महाराष्ट्रात आज सहा पक्ष आमने-सामने आहेत. तीन-तीन दोन्ही बाजूला. या लोकसभा निवडणुकीनंतर दोन पक्ष लोप पावतील. कुठेतरी विलीन होतील, त्यातली माणसं दुसरीकडे जातील. पण दोन पक्ष दिसणार नाहीत. ही माणसं कुठे जातील ते आत्ता मी सांगत नाही. पण दोन पक्ष दिसणार नाहीत”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.