काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी हिमाचलमधील एका सभेला संबोधित करताना दावा केला की “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने त्यांच्या प्रचारसभांमधून हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडण्याच्या घोषणा करत आहेत. मोदी भ्रष्टाचार आणि पैशाच्या बळावर हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडतील.” काँग्रेसचे वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी आज (२६ मे) हिमाचल प्रदेशच्या मंडी या लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या हिमाचल प्रदेशमधील आधीच्या प्रचारसभांमधील वक्तव्यांचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच मंडी येथे एनडीएच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं होतं. या प्रचारसभेचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदी दावा करत आहेत की हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचं सरकार टिकणार नाही.”

गेल्या महिन्यात हिमाचल प्रदेशच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारारांची काँग्रेसने हकालपट्टी केली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी या सहा आमदारांना अपात्र ठरवलं होतं. सहा आमदार अपात्र ठरल्यामुळे हे मतदारसंघ आता रिकामे झाले आहेत. निवडणूक आयोगाने या सहा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपाचे वरिष्ठ नेते सातत्याने हिमाचल प्रदेशचे दौरे करत आहेत. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी अनेकवेळा हिमाचल प्रदेशचा दौरा केला आहे. यावेळी मोदी यांनी दावा केला होता की “हिमाचल प्रदेशमधील सुखविंदर सिंह सुक्खी यांचं सरकार जास्त दिवस टिकणार नाही.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच दाव्याचा उल्लेख करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दावा केला आहे की “पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशमधील सुक्खू सरकार पाडण्याच्या तयारीत आहेत.”

हे ही वाचा >> “सपाचा कायदा-सुव्यवस्थेशी ३६ चा आकडा, त्यांनी दहशतवाद्यांना…”, मिर्झापूरमधून पंतप्रधान मोदींचा टोला

राहुल गांधी यावेळी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मित्राच्या म्हणजेच उद्योगपती गौतम अदाणीच्या मदतीने देशातील लहान आणि मध्यम व्यवसाय नष्ट केले आहेत. जीएसटी लागू करून देशातील बेरोजगारी वाढवली आहे.” हमीरपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सतपाल रायजादा यांच्य प्रचारार्थ आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. राहुल गांधी यांनी यावेळी अग्निवीर योजनेवरूनही केंद्र सरकारवर टीका केली. तसेच ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास आम्ही ही अग्निवीर योजना फाडून कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ. ही योजना पूर्णपणे रद्द करू.” हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील अनेक तरुण भारतीय सैन्यात आहेत. या जिल्ह्याला राज्यात सैनिकाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. याच ऊनाच्या भूमीवरून राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना रद्द करण्याचं आश्वासन दिलं.