लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी महायुतीच्या नेत्यांनी, उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी आरोप केला आहे की, महायुतीच्या नेत्यांनी अहमदनगर आणि नाशिकमध्ये पैसे वाटले आहेत. आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरमधील काही संशयास्पद व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पोलिसांच्या मदतीने पैसे वाटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला नुसतं ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी कायद्याचा आदर राखायला हवा आणि या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहायला हवं. राधाकृष्ण विखे पाटलांचा चिरंजीवांना म्हणजेच सुजय विखे पाटलांना अहमदनगरमध्ये खुलेआम पैसे वाटताना पकडलं आहे. त्यांनी मतदारसंघात लाखो रुपये वाटले ते आता समोर आलं आहे, हीच स्थिती नाशिक आणि रायगडची देखील आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या विरोधी पक्षांमधील नेत्यांची वाहनं, हेलिकॉप्टर तपासले जात आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे हेलिकॉप्टर तपासण्यात आलं. मी सांगलीला गेलो तेव्हा माझं हेलिकॉप्टर तपासण्यात आलं. आमची झाडाझडती होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे मंत्री आणि आमदार हे मोठमोठ्या बॅगा, बॉक्स घेऊन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरत आहेत. पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, त्यांची झाडाझडती होत नाही. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आम्हाला लोकांचा पाठिंबा आहे. अरे जर तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे, तर मग तुमच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना अशा पैशांच्या बॅगा घेऊन का फिरावं लागतंय? हे सगळं चालू असताना निवडणूक आयोगाच्या डोळ्यांवर झापड आहे का? राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला, ज्या आमचे फोन रेकॉर्ड करत होत्या, त्या आता काय डोळ्याला गॉगल लावून बसल्या आहेत का?

हे ही वाचा >> “महाराष्ट्रात भाजपाप्रणीत एनडीएच्या २० जागा कमी होणार”, योगेंद्र यादव यांनी वर्तवला अंदाज; म्हणाले, “४८ जागांपैकी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राऊत म्हणाले, मतदानाच्या आदल्या दिवशी बारामतीत पैशाचं वाटप झालं. अजित पवारांच्या ताब्यातील बँका पहाटेपर्यंत उघड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यावर निवडणूक आयोगाने काय केलं? निवडणूक आयोगाचं लक्ष केवळ आमच्यावर आहे. हे लुटारू पैसे वाटत आहेत, दरोडे टाकत आहेत. नाशकातला व्हिडिओ हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. मी तो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.