लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. तर यावेळी मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीतली महाराष्ट्रातली सर्वात लक्षवेधी लढत होते आहे ती म्हणजे बारामतीत. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे म्हणजेच नणंद विरुद्ध भावजय असा हा सामना आहे. ज्याकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार असंही पाहिलं जातं आहे. बारामतीची ही लढाई दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. अशात बारामतीकर काय करणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. मात्र संजय राऊत यांनी अजित पवार बारामती मतदारसंघात धमक्या देत आहेत असा आरोप केला आहे. सासवडच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“भाजपाने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला, शरद पवारांचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी पक्ष स्थापन केला, मोठा केला आणि वाढवण्यासाठी तुमच्या हाती दिला होता पण तुम्ही काय केलंत? मला आचार्य अत्रेंच्या वाक्याची आठवण येते त्यांना एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तरीही ते म्हणायचे दहा हजार वर्षांत अशी गोष्ट झाली नाही. आज अत्रे असते तर म्हणाले असते असा हरामखोर दहा हजार वर्षांत झाला नाही. हा म्हणजे जे हरामखोर निर्माण झाले आहेत त्यांच्याबद्दल असं म्हटले असते.”

हे पण वाचा- ..तर मला मत मागताना शरम वाटली असती, अजित पवार असे का म्हणाले?

धमक्या दिल्या जात आहेत

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने सांगत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रामाचा अपमान केला. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण असूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे आले नाहीत. ज्यांची घोषणाच रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आहे ते रामाचा अपमान कसा करतील? मी शनिवारपासून पुण्यात आहे. आम्ही आधी बारामतीचा आढावा घेतो. बारामतीत धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आमची शिवसेना सुप्रिया सुळेंच्या मागे ठामपणे उभी आहे. मी आमच्या बैठकांमध्ये सांगतो की बारामतीची लढाई सुप्रिया सुळेंची नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. कुणीतरी ऐरेगैरे लोक येणार गुजरातमधून आणि बारामतीत ठाण मांडून बसणार.” हे कसं चालेल? असं संजय राऊत म्हणाले आहेत.

चंपा अजित पवारांची लाडकी

“एक ते मंत्री आहेत बघा, चंद्रकांत पाटील.. चंपा. हो ही चंपा अजित पवारांची लाडकी आहे. आम्ही शरद पवारांना संपवायला आलो आहोत म्हणाले आहेत. मात्र शरद पवारांच्या नावाचा दरारा अजूनही कायम आहे. भाजपाने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला. पण काँग्रेसयुक्त भाजपा झाली आहे. ही निवडणूक ऐतिहासिक यासाठी आहे की देशात लोकशाही राहणार की हुकूमशाही, चोरांचं राज्य की लोकशाही मानणाऱ्यांचं राज्य हे ठरवण्याची लढाई आहे. अजित पवारांचं भाषण ऐकत होतो, ते जाहीरपणे धमक्या देत आहेत. उद्योजक, मराठी व्यावसायिक यांना धमकावलं जातं आहे. माझं काम कर नाहीतर बघून घेईन. तुम्ही काय बघून घेणार? ४ जूननंतर जनता जनताच तुम्हाला पाहून घेईल. धमक्या देण्याला लोकशाही म्हणतात का? हिंमत असेल तर मैदानात उतरा आणि निवडणूक लढा. तुमच्या धमक्यांना महाराष्ट्र घाबरणार नाही. धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे हे लक्षात ठेवा” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.