प्रसिद्ध अभिनेत्री कंगन रणौतला भाजपाने लोकसभा निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. कंगना हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवते आहे. कंगनाने प्रचार सुरु केला असून ती काँग्रेसवर अक्षरशः तुटून पडते आहे. गुरुवारी झालेल्या सभेत तिने राहुल गांधींचा उल्लेख पप्पू असा केला आहे आणि त्यांना आव्हान दिलं आहे. आता संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली आहे.

कंगनाने काय आव्हान दिलं?

मला धमक्या देणाऱ्या, आव्हान देणाऱ्या सगळ्यांना माझं खुलं आव्हान आहे, की राजकारण ही तुमची वडिलोपार्जित संपत्ती नाही. मला घाबरवून, धमक्या देऊन काही होणार नाही. हा नरेंद्र मोदींचा नवा भारत आहे. काही लोक माझ्याबद्दल बोलतात की येते आणि ढिंकचॅक करते. मी त्याला (राहुल गांधी) इथे बोलवू इच्छिते, त्याने माझ्या चित्रपटातला एक सीन मला करुन दाखवावा. तो सीन जर त्याने करुन दाखवला मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन. आपण कलेला निवडत नसतो, कला आपल्याला निवडत असते हे बोलणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असं कंगनाने म्हटलं आहे. मला म्हटलं जातं तुला काय राजकारण येतं का? त्या सगळ्यांना ४ जूननंतर आपोआप उत्तर मिळेल. असंही कंगनाने म्हटलं आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे.

कंगना रणौतचं राहुल गांधींना आव्हान, “…तर राजकारणच काय, मी हा देश सोडून निघून जाईन”

काय म्हणाले संजय राऊत

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर कंगनाला संसदेपर्यंत जाता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे, असं भाकीतच वर्तवलं आहे. त्यामुळे कंगनाच्या विजयाबाबतच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. संजय राऊत म्हणाले, “पप्पू तुम्हाला घरी बसवणार. आम्ही लढणारे लोक आहोत, चाटुगिरी करणारे नाही. देश संकटात आहे, देशाची लोकशाही संकटात आहे. मुंबईला मिनी पाकिस्तान म्हणणारं कुणीही असलं तरीही त्यांचं काय होणार हे ठरलं आहे. “

शिंदे गट आणि भाजपावरही टीका

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना कंगना निवडून येणार नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी राऊत यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांची आजा पालघरच्या बोईसरमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेला महाविकासा आघाडीचे नेते आणि डाव्या पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. पालघरमध्ये महायुतीने उमदेवार दिला नाही. हा उमेदवार कोण येतो याबाबत साशंकता आहे. गावित जरी शिवसेनेत असले तरी त्यांना कमळावर लढण्याची इच्छा आहे अशी परिस्थिती आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये गोंधळाचे चित्र आहे. दिल्लीतील भाजपचे लोक यांचे उमेदवार जाहीर करतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.