गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर आज शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. शिवसेनान नेते संजय राऊत यांनी आज पत्रकारपरिषद घेत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये पणजी येथून देखील शिवसेनेने उमेदवार दिला आहे. तर, भाजपाचे दिवंगत नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपाकडून उमेदवार नाकारण्यात आलेली आहे. आतापर्यंत उत्पल पर्रिकरांच्या मुद्य्यावरून शिवसेनेने भाजपावर कायमक निशाणा साधला होता, शिवाय शिवसेना उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देणार असल्याचंही जाहीर केलेलं होतं. मात्र आज उमेदवारी यादीत शिवसेनेकडून पणजीत उमेदवार उभा करण्यात आल्याने माध्यमांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्पल पर्रिकरांना पणजीत शिवसेनेचा पाठिंबा असेल असं तुम्ही म्हणाला होता. परंतु, आज शिवसेनेने पणजीतून उमेदवार दिला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “तुमचं म्हणणं बरोबर आहे, उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारलं आहे. मनोहर पर्रिकर यांचे ते चिरंजीव आहे हे बरोबर आहे आणि त्यांना तिकीट नाकारताना कोणाला तिकीट द्याव, हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचा पक्ष आहे त्यांनी ठरवायचं कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं किंवा मत व्यक्त करणं, हे योग्य नाही. काँग्रेसने कोणाला तिकीट द्यावं, काँग्रेसने कोणाशी युती करावी, तृणमूलने कुठे जावं, कोणाला तिकीट द्याव यावर त्रयस्थ पक्षाने बोलणं बरोबर नाही. परंतु, मनोहर पर्रिकरांच्या बाबतीत गोवेकरांच्या भावना फार वेगळ्या आहेत. उत्पल पर्रिकर यांच्याबाबत मी असं ऐकलं की त्याचं कर्तृत्व काय आहे? आणि असंही माझ्या वाचनात आलं की, ते मनोहर पर्रिकरांचे चिरंजीव आहे. म्हणून घराणेशाही हा निकष लावून त्यांना तिकीट देता येणार नाही. हे जर खरं असेल तर गोव्यात आजची यादी पाहीली तर, वाळपई, पर्रे इथे घराणेशाहीच आहे. त्यानंतर पणजी, ताळीगाव ही घराणेशाहीच आहे. मग उत्पल पर्रिकर यांच्याबाबतीत घराणेशाही कशी आडवी आली?”

Goa election : गोव्यात प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरणार ; शिवसेनेने केली उमेदवारांची पहिली यादी जाहीर

तसेच, “ उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव यांना घराणेशाहीमुळेच तिकडे भाजपाकडून तिकीट मिळालं आहे. त्या मुलायमसिंग यादव यांच्या सुनबाई आहेत म्हणून तिकीट दिलेलं आहे. मग उत्पल पर्रिकरांच्या बाबत असं काय झालं? की त्यांना घराणेशाही आडवी आली त्यांचं कर्तत्व आडवं आलं.” असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “ आमचं असं म्हणणं आहे की जर उत्पल पर्रिकर हे निवडणूक लढणार असतील, स्वतंत्र उमेदवार म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि आम्ही इतर पक्षांचंही मन वळवू की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या. आज आम्ही पणजीतून शैलेंद्र सुभाष वेलीणकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. पण जर उत्पल पर्रिकर यांनी अर्ज भरला आणि तो अर्ज शेवटपर्यंत राहिला त्यांचा आणि ते निवडणूक लढणारच या मताशी ठाम राहीले. तर शैलेंद्र वेलीणकर हे त्यांची उमेदवारी मागे घेतील. हे मी तुम्हाला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सांगतोय. तर ते उमेदवारी मागे घेतील हे नक्की आहे. पण अगोदर उत्पल पर्रिकरांना निर्णय घेऊ द्या. ” असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader sanjay raut criticizes bjp for rejecting utpal parrikars candidature msr
First published on: 21-01-2022 at 14:52 IST