भाजपाने उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकिट कापलं आहे. पूनम महाजन यांच्या ऐवजी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांना तिकिट दिल्यानंतर भाजपाने उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांनी पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूनम महाजन यांची पोस्ट काय?

“खासदार म्हणून मी मागची १० वर्षे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देते. खासदार म्हणून नाही तर मुलीप्रमाणे मला त्यांनी स्नेह दिला. मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबीयांची, जनतेची ऋणी राहिन, तसंच आशा करते की आपलं नातं कायम टिकून राहिल. माझे दैवत, माझे दिवंगत वडील प्रमोद महाजन यांनी मला राष्ट्रप्रथम मार्ग दाखवला. तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल.” या आशयाची पोस्ट पूनम महाजन यांनी केली आहे.

पूनम महाजन यांचं तिकिट भाजपाने नाकारलं

पूनम महाजन यांना त्यांच्याच मतदारसंघात विरोध असल्याने भाजपाने त्यांचं तिकीट कापल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रख्यात वकील आणि अनेक मोठ्या खटल्यांत सरकारचे वकील असणाऱ्या उज्जल निकम यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. उज्जल निकम यांचा सामना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी असणार आहे. निकम यांच्या रुपाने भाजपाने नवा चेहरा मैदानात उतरवला आहे.

हे पण वाचा- उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया, “भारताची प्रतिमा मोदींमुळेच जगात उंचावली”

भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, ही चर्चा आता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे. १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. ही सर्व पार्श्वभूमी पाहता निकम यांना उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam mahajan first reaction after bjp cut her ticket from north central mumbai for loksabha scj
First published on: 27-04-2024 at 23:46 IST