महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाप्रकरणी भाजपा खासदार आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आज आरोप निश्चित करण्यात येणार होते. परंतु, आजचा आदेश दिल्ली कोर्टाने पुढे ढकलला आहे. ब्रिजभूषण यांनी या प्रकरणी पुढील म्हणणे मांडण्यासाठी राऊस अव्हेन्यु न्यायालयात नवीन अर्ज दाखल केला होता. ज्यावेळी पीडितेवर अत्याचार झाला तेव्हा मी भारतातच नव्हतो, असं या अर्जात म्हटलं आहे.
आरोपनिश्चितीला उशीर व्हावा याकरता ही युक्ती करण्यात येत असल्याचं पीडितांकडून म्हटलं जात आहे. त्यामुळे त्यांनी या अर्जाला विरोध केला. दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व करणारे सहाय्यक सरकारी वकील अतुल श्रीवास्तव म्हणाले की, “अर्ज उशिराने दाखल करण्यात आला आहे आणि पुढील चौकशीची मागणी केली आहे.” त्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी प्रियंका राजपूत यांनी हा आदेश पुढे ढकलला आणि तो २६ एप्रिलसाठी राखून ठेवला.
लैंगिक अत्याचाराविरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन
महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याविरोधात देशात मोठं आंदोलनही झालं. देशपातळीवरील कुस्तीपटू या आंदोलनात उतरले होते. परंतु, ब्रिजभूषण यांनी त्यांच्यावर आरोप नाकारले. आंदोलन अधिक चिघळत गेल्याने अखेर ब्रिजभूषण शरण सिंह यांचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलं.
ब्रिजभूषण सिंह यांना पुन्हा उमेदवारी
तसंच, ब्रिजभूषण, सहआरोपी माजी भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्याविरोधात प्राथमिक दृष्ट्या पुरावे असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं होतं. तर, डिसेंबर झालेल्या निवडणुकीत भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड करण्यात आली आहे. तर, भारतीय जनता पक्षाने ब्रिजभूषण यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.