एकनाथ शिंदे गद्दार आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. तसंच गद्दार तर गद्दारच राहणार. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ईशान्य मुंबई मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ मुंबईच्या घाटकोपरमध्ये आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी चतुर्वेदी यांनी ‘एकनाथ शिंदे गद्दार हैं’ अशा घोषणा दिल्या. तसेच सभेला उपस्थित लोकांना म्हणाल्या, आपल्या या घोषणा ठाण्यापर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. असंही त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी दिवार सिनेमाचा उल्लेख करत श्रीकांत शिंदेंवर टीका केली. ज्यानंतर आता एकनाथ शिंदे गटातील नेत्याने त्यांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या होत्या प्रियांका चतुर्वेदी ?

प्रियांका चतुर्वेदी यांनी यावेळी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘दिवार’ या हिंदी चित्रपटातील संवादाचा उल्लेख केला. त्यांनी या चित्रपटातील एक प्रसंग सांगितला. खासदार चतुर्वेदी म्हणाल्या, दिवार चित्रपटात अमिताभ बच्चन एका प्रसंगात त्यांचा हात दाखवतात. त्यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असं लिहिलेलं असतं. असंच वाक्य श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलेलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलंय, ‘मेरा बाप गद्दार हैं.’ प्रियांका चतुर्वेदी यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र या टीकेनंतर आता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी तर मग आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार है असं लिहिलं पाहिजे असं म्हटलं आहे.

“पराभव दिसताच भाजपाकडून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला जातो”, आदित्य ठाकरे यांची टीका; म्हणाले, “४ जून रोजी…”

काय म्हणाले संजय निरुपम?

“बाळासाहेब ठाकरे काँग्रेसच्या लोकांना किन्नर म्हणाले होते. अशा नामर्द, धोकेबाज लोकांबरोबर मी कधीच जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर जाऊन महागद्दारी केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार है असं लिहिलं पाहिजे. जे नरेटिव्ह उबाठावाले जनतेत पसरवू पाहात आहेत ते चुकीचं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी आमदार त्यांनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या गद्दारीचा बदला घेतला.”

गद्दारांनी आम्हाला गद्दार म्हणू नये

“जे स्वतः गद्दार आहेत त्यांनी आम्हाला गद्दार म्हणू नये, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी तुम्ही महागद्दारी केली आहे. त्यामुळे गद्दार आम्ही तर तुम्ही गद्दार आहात. ” असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी आहेत का?

उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत की मुस्लिमवादी आहेत हे त्यांनी सांगावं. कारण मशिदीतल्या मौलानांवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मतदान झालं पाहिजे म्हणून दबाव टाकला जातो आहे. व्होट जिहाद केला जातो आहे. मौलाना, मौलवींना हे सांगत आहेत की मुस्लिमांना भडकवा. धर्माच्या नावावर मतं द्या असं सांगितलं जातं आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतलं हिंदू -मुस्लिम यांच्यातलं चांगलं वातावरण आहे ते बिघडवण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. याची नोंद निवडणूक आयोग आणि पोलिसांनी याची दखल घ्यावी. उद्या मुंबईत काही दंगे भडकले तर त्याची जबाबदारी ही फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेची असेल. असंही निरुपम यांनी म्हटलं आहे.