“मी काल एक विधान केलं, त्यानंतर ते व्हायरलं झालं. आता मला प्रश्न पडला की, गद्दारांना गद्दार नाही म्हणायचं तर महात्मा म्हणायचं का?”, असा सवाल करत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका केली. महाविकास आघाडीची भाईंदर पूर्व येथे नवघर मैदानावर जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदींची नक्कल करत त्या म्हणाल्या, “मित्रो क्या ये सही है! गद्दारांना गद्दार नाही म्हणायचं हे आपल्याला (जनतेला) मंजूर आहे का? गद्दारांना गद्दार नाही म्हणायचं हे महाराष्ट्रातील जनतेला मंजूर नाही. कोणाला काय म्हणायचं हे महत्वाचं नाही. मात्र, गद्दारांना गद्दार म्हणणारच. जो कलंक त्यांनी लावला, हा सात पिढ्यांना भोगावा लागेल. त्यामुळे आता आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. राजन विचारे यांना एवढ्या मोठ्या मताने विजयी करायचं की, जेव्हा आपण ईव्हीएमचे बटण दाबताच त्याचा आवाज थेट दिल्ली आणि गुजरातपर्यंत गेला पाहिजे. मतदान केल्यानंतर त्याचा आवाज गुजरात मध्ये का गेला पाहिजे? याचे कारण महाराष्ट्रातील अनेक गोष्टी गुजरातला जात आहेत”, असा हल्लाबोल प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपावर केला.

हेही वाचा : “संविधान बदलाच्या चर्चेचा निवडणूक प्रचारात महायुतीला फटका”, मंत्री उदय सामंत स्पष्टच म्हणाले…

प्रियांका चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, “अबकी बार मोदी सरकार तडीपार, अशी म्हणण्याची वेळ या २०२४ च्या निवडणुकीत आली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झाला, दोन कोटी रोजगार देणार होते त्याचं काय झालं? त्यामुळे यांना आता अबकी बार मोदी सरकार तडीपार, असे म्हणण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटे आश्वासन दिले”, अशी टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली.

प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या होत्या?

शिवसेना ठाकरे गटाचे ईशान्य मुंबई मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ मुंबईच्या घाटकोपरमध्ये आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना प्रियांका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, “एकनाथ शिंदे गद्दार आहेत. ‘एकनाथ शिंदे गद्दार हैं”, अशा घोषणा देत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती.

प्रियांका चतुर्वेदी यांनी यावेळी ‘दिवार’ या चित्रपटाचा उल्लेख केला. चतुर्वेदी म्हणाल्या, दिवार चित्रपटात अमिताभ बच्चन एका प्रसंगात त्यांचा हात दाखवतात. त्यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असं लिहिलेलं असतं. असंच वाक्य श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलेलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर ‘मेरा बाप गद्दार हैं, असं लिहिलंय, अशी खोचक टीका चतुर्वेदी यांनी केली होती.