पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमध्ये भाजपाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत शरद पवार यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. “लोकसभा निवडणुकीनंतर छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार म्हणत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे आमच्याबरोबर यावे. त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होतील”, असा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी दिला होता. यावर आता शरद पवार यांनी आपली प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी विचारले की, पंतप्रधान मोदी हे कुठे म्हणाले? पत्रकारांनी नंदुरबारचा उल्लेख करताच शरद पवार म्हणाले की, आजकाल ते महाराष्ट्रात वारंवार येत आहेत.

पंतप्रधान मोदींची शरद पवारांना खुली ऑफर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या, तुमची सर्व…”

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार पुढे म्हणाले, “आज देशामध्ये संसदीय आणि लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली गेली. केंद्र सरकारचा यात सहभाग असल्याशिवाय एवढी मोठी कारवाई होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वासच नाही. हा समज आता लोकांमध्येही पक्का झाला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही.”

“गांधी-नेहरूंची विचारधारा आम्हाला प्रिय आहे. ती सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात मुस्लीम समाजाबद्दल काहीतरी भाष्य केल्याचे आम्ही ऐकले. हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर सर्वधर्मीयांना एकत्र घेऊन जावेच लागेल. एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही. पंतप्रधान मोदी अलीकडे वारंवार एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, अशी भूमिका मांडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही”, असे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या विचारांविरोधात जनमत तयार होत आहे. यामुळे त्यांच्यात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते अशी संभ्रम निर्माण करणारी विधाने करत आहेत, अशीही टीका शरद पवार यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.