उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष प्रचारामध्ये गुंतले आहे. भाजपासुद्धा जोरदार प्रचार करत आहे. त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज उत्तर प्रदेशातल्या वृंदावन इथं आले होते. त्यांनी बांके बिहारी मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेत पूजा केली. योगी सरकारच्या काळात दरोडे ७० टक्क्यांनी तर चोऱ्या ७२ टक्क्यांनी कमी झाल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच देशातल्या आणि उत्तर प्रदेशातल्या परिवर्तनाचं श्रेय उत्तर प्रदेशातल्या जनतेचं आहे, असंही शाह म्हणाले आहेत.
बांके बिहारी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी आसपासच्या बाजारातल्या लोकांना भाजपाला मत देण्याचं आवाहन केलं. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, त्यानंतर ते मथुरेकडे रवाना झाले. मथुरेत पोचल्यावर अमित शाह यांनी घरोघरी जाऊन मतं मागण्याच्या Door to Door Campaign ला सुरूवात केली. त्यानंतर अमित शाह यांनी प्रभावी मतदाता संवाद या कार्यक्रमांतर्गत उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “मी २०२२ च्या निवडणुकांमध्ये मथुरेतल्या सगळ्या भाजपा उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी मतं मागण्यासाठी आलो आहे. मथुरेचं भव्य दिव्य रुप तिला पुन्हा मिळवून देणं हाच आमचा संकल्प आहे”.
उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारच्या कामगिरीबद्दल बोलताना अमित शाह म्हणाले, “अखिलेश सरकारच्या तुलनेत योगी सरकारमध्ये दरोडे ७० टक्क्यांनी आणि चोऱ्या ७२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. खूनाच्या प्रकरणांमध्ये २९ टक्क्यांनी तर अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ३५ टक्क्यांची घट झाली आहे”.
उत्तरप्रदेशातल्या परिवर्तनाचं श्रेय जनतेचंच
अमित शाह म्हणाले, “मी या परिसरातल्या सगळ्या नागरिकांचे हात जोडून आभार मानतो. निवडणुका २०१४ च्या असो, २०१७ त्या असो किंवा २०२२ च्या, इथले नागरिक कायमच भाजपाला भरघोस मतं देतात. मी या जनतेला सांगू इच्छितो की गेल्या साडेसात वर्षांत देशात आणि उत्तर प्रदेशात जो बदल घडला आहे त्याचं सगळं श्रेय उत्तर प्रदेशातल्या महान जनतेला जातं. उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या सरकारांनी केवळ जातिवाद आणि परिवारवादाला प्राधान्य दिलं. भ्रष्टाचार त्यांच्या काळात बोकाळला”.