वाराणसीच्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या होत्या परंतु अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या सरकारने आम्हाला सहकार्य केले नाही असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. आम्हाला वाराणसीमध्ये रिंग रोड बांधायचा होता परंतु अखिलेश यादवने त्याला परवानगी मिळू दिली नाही असे पंतप्रधानांनी म्हटले. वाराणसी हा पंतप्रधान मोदी यांचा हा मतदार संघ आहे. त्या ठिकाणी आज त्यांनी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी काशी विद्यापीठामध्ये भाषण केले.

उत्तर प्रदेशामध्ये ३० लाख लोकांना घराची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. आम्ही राज्य सरकारकडे गरजू लोकांची यादी मागितली परंतु अजूनही राज्य सरकार झोपलेले आहे असे ते म्हणाले. या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष आणि बसपला तर लोक घरचा रस्ता दाखवणार आहे असे ते म्हणाले. या देशात काँग्रेस कधी अस्तित्वात होती की नव्हती याचा अभ्यास पुरातत्व विभागाला करावा लागणार आहे असे ते म्हणाले. समाजवादी पक्ष आणि बसप हा पक्ष दोन्ही सारखेच आहेत, असे ते म्हणाले. जर सरकारने प्रामाणिकपणे काम केले तर अधिकारी प्रामाणिकपणे काम करतील.

जर अधिकारी प्रामाणिकपणे काम करू लागले तर सर्व व्यापारी देखील प्रामाणिकपणे काम करतील असे ते म्हणाले. जे लोक सर्जिकल स्ट्राइकवर संशय आहे त्यांनी जौनपूर येथील हुतात्म्यांच्या पत्नीला, मुलांना भेटावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. याआधी ४० वर्षांपासून एक श्रेणी एक निवृत्ती वेतन (ओआरओपी) ही योजना आम्ही लागू केली असे पंतप्रधानांनी म्हटले. ज्यावेळी नोटाबंदीची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून देशात माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. जनतेच्या आरोग्य सेवेसाठी आम्ही कोट्यवधींचा निधी पाठवला परंतु त्याचा उपयोग काही झाला नाही.

राज्य सरकारने सहकार्य न केल्यामुळे कोणतीही योजना लागू करण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले. याआधी, जौनपूर येथे सभेत मोदींनी महाराष्ट्रातील निवडणुकांचा संदर्भ दिला होता. महाराष्ट्रातील महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस पूर्णपणे साफ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागील सत्तर वर्षांमध्ये भारतीय जनतेकडून जे लुटण्यात आले आहे. ते परत सर्वांना मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ज्या लोकांनी गेली सत्तर वर्षे देशाला लुटण्याचा प्रयत्न केला त्यांना मी कदापिही सोडणार नाही असे ते म्हणाले.