विजयाची खात्री असेल आणि तुमच्याकडे चांगले प्रचारक असतील तर तुम्हाला रोड शोसारख्या दिखाव्याची गरजच काय असा प्रश्न उपस्थित करत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा मोदींना घरचा आहेर दिला आहे.

उत्तरप्रदेश निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा हा मोदींसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. शेवटच्या टप्प्यात मोदींच्या मतदारसंघातही मतदान होणार असून या मतदारसंघातील उमेदवारांचा विजय हा भाजपसाठी महत्त्वाचा आहे. शनिवारनंतर रविवारीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील रोड शोमध्ये सहभाग घेतला. मोदींचा रोड शो यशस्वी व्हावा यासाठी भाजपने अथक मेहनत घेतली आहे. रोड शोमध्ये अलोट गर्दीही झाली होती. याशिवाय पुष्पवृष्टीही केली जात होती. मोदींचा रोड शो म्हणजे दिखावा असल्याची अप्रत्यक्ष टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मोदींच्या रोड शोविषयीच्या प्रश्नावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, जर तुम्हाला विजयाची खात्री आहे, तुमच्याकडे स्टार प्रचारक आहेत. मग ऐवढ्या दिखाव्याची गरजच काय ?. आता शत्रुघ्न सिन्हांच्या विधानावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदींवर टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी मोदी आणि भाजपवर वेळोवेळी टीका केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीही वाराणसीमध्ये रोड शोमध्ये सहभाग घेतला. वाराणसीमधील पांडे पूरा चौकात मोदी दाखल होताच हर हर मोदी, घर घर मोदी या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. वाराणसी लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील लोकसंख्येपैकी ८० टक्के लोक हिंदू असल्याचे लक्षात घेऊन या पवित्र शहरात मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्याचे शक्य ते प्रयत्न मोदी यांनी केले. गेली १५ वर्षे सत्तेबाहेर असलेल्या उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी हा पक्ष प्रामुख्याने मोदी यांच्यावर विसंबून आहे. या हिंदुबहूल शहरातील मतदारांचा विचार करून मोदी यांनी शनिवारी प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर व कालभैरव मंदिरात जाऊन प्रार्थना केली, तसेच हिंदुत्ववादी विचारवंत पंडित मदनमोहन मालवीय यांना आदरांजली वाहिली.