News Flash

समजून घ्या: BECA करारामुळे अमेरिकेकडून मिळू शकतात घातक F-15EX फायटर विमाने

एअर स्ट्राइकसाठी घातक प्रीडेटर-बी ड्रोन मिळण्याचा मार्गही मोकळा....

भारताने काल अमेरिकेबरोबर ऐतिहासिक ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट’ म्हणजे ‘बीइसीए’ करारावर स्वाक्षरी केली. ‘टू प्लस टू’ बैठकीसाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ व संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर टू भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी संरक्षणाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

या करारामुळे संरक्षण उद्दिष्टांसाठी आता नकाशे आणि उपग्रह फोटोंची देवाण-घेवाण करता येणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2+2 च्या तिसऱ्या आवृत्तीत समकक्ष माईक पॉम्पिओ व मार्क टी एस्पर यांच्यासोबत चर्चा केली.

काय म्हणाले राजनाथ सिंह
करारावर स्वाक्षरी केल्यानंतर राजनाथ सिंह यांनी प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वादबद्दल बोलले. “महत्त्वाच्या मुद्यावर आम्ही व्यापक चर्चा केली. अमेरिकेसोबत BECA करार करणे, हे महत्त्वाचे पाऊल आहे. अमेरिकेबरोबर आमचे लष्करी संबंध चांगल्या प्रकारे विकसित होत आहेत” असे राजनाथ सिंह म्हणाले. “संरक्षण उत्पादनांच्या संयुक्त विकासासाठी आम्ही काही प्रकल्प निवडले आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

काय म्हणाले माईक पॉम्पिओ
“जगातील सर्वात मोठया लोकशाहीच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सैन्यदलातील शूर पुरुष आणि महिला सैनिकांच्या सन्मानार्थ आम्ही राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. अमेरिका भारतासोबत भक्कमपणे उभी आहे” असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ म्हणाले.

BECA करारापासून काय आहे फायदा
BECA करारामुळे भारताला अमेरिकेचे भू-स्थानिक नकाशे वापरण्याची मुभा मिळणार आहे. या करारामुळे भारताला जो डाटा वापरता येणार आहे, त्यातून क्षेपणास्त्र आणि सशस्त्र ड्रोनद्वारे अचूकतेने हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे. या करारामुळे क्रूझ आणि बॅलेस्टिक मिसाइलद्वारे अचूकतेने हल्ला करण्यासाठी भारताला अमेरिकेच्या भू-स्थानिक नकाशांचा वापर करता येणार आहे.

दोन्ही देशांच्या एअर फोर्स टू एअर फोर्स सहकार्यामध्ये सुद्धा हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सहकार्य आणि देवाण-घेवाण प्रक्रियेमध्ये उच्च क्षमतेचे उपग्रह फोटो, टेलिफोन इंटरसेप्ट तसेच चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्याची आणि शस्त्रास्त्रांची तैनाती कुठेय, याची अचूक माहिती मिळेल.

BECA करारामुळे भारताचा अमेरिकेकडून सशस्त्र ड्रोन आणि फायटर विमाने विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताला जास्तीत जास्त ड्रोन आणि फायटर विमाने विक्रीची योजना आहे, असे एस्पर म्हणाले. पण त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली नाही. भारत निशस्त्र ड्रोनऐवजी अमेरिकेकडून प्रीडेटर-बी ही सशस्त्र ड्रोन खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. यापूर्वी लॉकहीड मार्टिन या आघाडीच्या अमेरिकन कंपनीने F-16 आणि F-18 फायटर विमानांची भारताला विक्री करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण भारताची नजर बोईंगच्या F-15EX फायटर विमानांवर आहे.

F-15EX विमानाची निर्मिती करणाऱ्या उत्पादकाला अद्यापी या विमानांच्या विक्रीचा परवाना मिळालेला नाही. “दोन देशांच्या सरकारांमध्ये F-15EX विमानांच्या विक्रीचा करार होऊ शकतो” असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले.

चीनचा तिळपापड
भारत-अमेरिकेमधल्या BECA करारामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. चिनची चिंता वाढली आहे. भारत आणि चीनमध्ये मागच्या आठवडयात आठव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक होणार होती. पण चीनने जाणीवपूर्वक या बैठकीला विलंब केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 11:19 am

Web Title: beca agreement india could get f 15ex fighter jet from america dmp 82
Next Stories
1 समजून घ्या : चीनमधून येणारी Yellow Dust म्हणजे काय?; यातून होतो का करोनाचा प्रसार?
2 समजून घ्या : अंबानी विरुद्ध बोझस… २५ हजार कोटींचा वाद नक्की आहे तरी काय?
3 Onion Price : भारतीय महिन्याला किती कांदा खातात?; जाणून घ्या उत्पादन, खपाचे गणित
Just Now!
X