करोनाचा देशात शिरकाव होऊन आता वर्ष लोटलं आहे. पहिल्या लाटेनंतर देशात दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. यात दिलासा देणारी बाब होती ती म्हणजे करोनावरील लस. करोनावरील लशींच्या आपतकालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आता सगळ्याचं लशीकरण होईल आणि करोना संपेल, अशीच जवळपास सगळ्याचा समज होता. मात्र, हे सगळं अंदाज चुकले. एकीकडे देशात करोनाचे नवनवे म्युटंट आढळून येत असताना लसीकरणाच्या कार्यक्रमाला खिळ बसली आहे. त्यातच सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे नव्या म्युटंटचा धोका ओळखून ब्रिटनने दोन डोसमधील कालावधी कमी केला आहे. त्यामुळे कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणं फायद्याचे की, तोट्याचं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारने भारतातील कोविशिल्ड लशींच्या दोन डोसमधील कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केला आहे. तज्ज्ञांच्या अहवालानंतर हा निर्णय घेतला असल्याचंही सरकाने म्हटलं आहे. ब्रिटनमध्येही कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर १२ आठवड्यानंतर दुसरा डोस दिला जात होता. मात्र, आता तो कालावधी कमी करुन ८ आठवड्यांवर आणण्यात आला आहे. हा कालावधी ५० वर्षांपुढील आणि सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींसाठी कमी करण्यात आला आहे. भारतात आढळून आलेल्या बी.१.६१७ या करोना विषाणूनच्या स्ट्रेननंतर ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे.

ब्रिटनमध्ये देशातील अधिकाधिक लोकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीने दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जेणेकरून नागरिकांना कमीत कमी एका डोसचं संरक्षण मिळू शकेल, असं ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय प्राध्यापक ख्रिस व्हिट्टी यांनी म्हटलेलं आहे. आता करोनाच्या बी.१.६१७ या नव्या स्ट्रेनमुळे करोनाचा उद्रेक होत असून, हा धोका लक्षात घेऊन ब्रिटनने दोन्ही डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय आता घेतला आहे.

कोविशिल्डच्या पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जर जास्त अंतर असेल, तर मधला काळ हा अँटीबॉडीज तयार होण्यासाठी जास्त प्रभावी ठरु शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारने या निर्णयाची माहिती देताना म्हटलेलं आहे. कोविशिल्डचा पहिला डोस ६० ते ८५ टक्के परिणामकारक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचं पटवून देताना नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही.के.पॉल म्हणाले, ब्रिटनने स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला आहे. यात करोना म्युटंट आणि महामारी आदी गोष्टींचा विचार केला गेला आहे. तर भारताने महामारीच्या धोक्याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे,” असं पॉल यांचं म्हणणं आहे.

अंतर वाढवल्याने मृत्यू रोखता येतील का?

वेल्लोर येथील ख्रिचियन मेडिकल कॉलेजमधील व्हायरॉलॉजी विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ.टी. जेकब डोसमधील कालावधी वाढवण्यासंदर्भात बोलताना म्हणतात,”सर्व लशींबद्दलची आजपर्यंतची माहिती बघितली तर पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्यास एका वर्षाचा विलंब झाला, तरी पहिल्या डोस परिणामकारकता कमी होत नाही. त्याचा प्रभाव कायम राहतो. पण, महामारीच्या काळात सुरक्षित राहायचं असेल, तर चार आठवड्यांच्या अंतराने दुसरा डोस देणं अधिक फायदेशीर आहे. सध्याची परिस्थिती बघता चार आठवड्यांचा कालावधी योग्य आहे. जर लशींचा तुटवडा असेल, तर दोन डोसमधील अंतर वाढवणंही ठिक आहे. कारण अधिकाधिक लोकांना पहिला डोस मिळायला हवा. पण, मृत्यू रोखण्यासाठी दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे,” असं जेकब यांनी सांगितलं.