देशात एकीकडे करोनाने कहर केलेला असताना गंगा नदीच्या पात्रात मृतदेह आढळत असल्याने देशात खळबळ माजली आहे. नदीच्या पाण्यात मृतदेह तरंगतानाचे फोटो अनेकांना विचलित करत आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीच्या पात्रातून आतापर्यंत ७० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान १०० हून अधित मृतदेह गंगा नदीत फेकून देण्यात आल्याचा असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

एकीकडे करोनाचं संकट असताना गंगेच्या पात्रातील मृतदेहांनी अनेकांची चिंता वाढवली आहे. यानिमित्ताने दोन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. पहिला म्हणजे, मृतदेहांमधून करोनाचा प्रसार होतो का? आणि दुसरा म्हणजे नदीमधून करोनाचा प्रसार होणं कितपत शक्य आहे?

मृतदेहांमधून करोनाचा संसर्ग होतो का?
करोना रुग्णांच्या मृतदेहांमधून कोरोनाचा प्रसार होतो की नाही याबाबत अद्याप ठोस अशी काही माहिती नाही. याचं कारण म्हणजे जगभरातील अनेक तज्ज्ञांनी करोना रुग्णाच्या मृतदेहातून संसर्ग होत असल्याची शक्यता नाकारली आहे. मात्र प्रशासनाने करोनाच्या नियमांचं पालन करतच मृतदेहाची विल्हेवाट लावली जात आहे.

भारतात आरोग्य यंत्रणांना करोना रुग्णांचे मृतदेह हाताळताना अत्यंत काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एम्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करोनाबाधितांचे मृतदेह हाताळताना करोनाचा धोका होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. करोनाबाधितांचे मृतदेह हाताळताना पीपीई कीट, सॅनिटायझर, मास्क इ. गोष्टींचा वापर करणं बंधनकारक आहे.

ब्रिटनमध्ये करोनाबाधित किंवा संशयित रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पालिका अधिकारी, रुग्णांचे नातेवाईक किंवा कुटुंबीयांसाठी विस्तृतपणे माहिती देण्यात आली आहे. ‘मृतदेहाची हाताळणी संवेदनशीलता, आदर आणि सन्मानाने केली जावी असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. भारतात मात्र गंगा नदीत आढळलेले मृतदेह पाहिल्यानंतर असं होताना दिसत आहे. “ज्या व्यक्तींना मृतदेहाच्या संपर्कात यावं लागत असेल किंवा मृतदेहांसंबंधी सेवा द्यावी लागत आहे, त्यांचं संरक्षण करण्यात यावं.,” याचाही त्यात उल्लेख आहे.

मात्र ब्रिटनपेक्षा अमेरिकेत करोना रुग्णांच्या मृतदेहांबाबतचे नियम काहीसे वेगळे आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह हा इबोला या रोगाच्या संसर्गापेक्षाही अधिक धोकादायक मानला जातो. अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंद केंद्राचं (सीडीसी) असं म्हणणं आहे की, करोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहापासून संसर्ग होण्याची थोडी शक्यता असते.

दरम्यान त्यांनी अंत्यविधीवेळी कुटुंबातील सदस्य मृतदेह पाहू शकतात, मात्र त्यांना मृतदेहापासून किमान एक मीटरच्या अंतरावर थांबणं बंधनकारक आहे. पूर्वकाळजी घेतल्याशिवाय मृतदेहाला हात लावू नये असंही सीडीसीने सांगितलं आहे. सीडीसीने जर कोणी व्यक्ती मृतदेहांच्या संपर्कात येत असेल तर हातमोजे, मास्क, गॉगल किंवा क्लोरिन सोल्यूशन वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

पाण्यामधून कोरोनाचा प्रसार होतो का?
आरोग्य विषयक तज्ज्ञांच्या मते, करोनाचा प्रसार हा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकला, शिंक , संभाषण, कफ-सर्दी किंवा श्वासोच्छवासाच्या वेळी निर्माण होणाऱ्या सूक्ष्म थेंबांमधून पसरतो. या काही सूक्ष्म थेंबांना वैद्यकीय भाषेत एरोसोल्स असंही संबोधलं जातं. हे थेंब सुमारे 2 मीटरच्या परिसरात असणाऱ्या जागेत हवेच्या मार्फत पसरू शकतात.

याचाच अर्थ असा की संसर्गजन्य व्यक्तीमधील करोनाचा विषाणू पाण्यातही सुरक्षित राहू शकतो. काही अभ्यासकांच्या मते संक्रमित व्यक्तींच्या मलाद्वारेही करोनाचा प्रसार होऊ शकतो. निरोगी व्यक्तीला त्याचा संसर्ग कितपत होईल याबाबत निश्चित माहिती नसली तरीही शरीरातील द्रवाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होतो हे निश्चित आहे.

वाहते पाणी किंवा जलतरण तलावांच्या माध्यमातून करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा अजून तरी कोणता पुरावा हाती लागलेला नाही. करोनाबाधिताशी संपर्क आल्यास हवेच्या माध्यमातूनच संसर्ग होतो. काही संशोधनात करोना विषाणी नदी आणि सांडपाण्यातही आढळून आल्याचं दिसलं आहे, पण याद्वारे संक्रमण होतं का ते अजून सिद्ध होऊ शकलेलं नाही.

WHO ने सांगितल्यानुसार, पाण्यात पोहताना करोनाचा संसर्ग होत नाही. मात्र जेव्हा करोनाबाधिताच्या संपर्कात इतर व्यक्ती येते तेव्हाच त्याचा संसर्ग होऊ शकतो.

मात्र नदीत मृतदेह टाकल्याने करोनाचं संक्रमण होईल का? तर याचं उत्तर आहे की, यावर पुरेशा संशोधनाची आवश्यकता आहे. कारण, सध्या तरी नदीच्या पाण्यातून संक्रमणाची शक्यता स्पष्ट नाही. जलजीवांनाही एकमेकांपासून संसर्ग होईल का यावरही संशोधन आवश्यक आहे. मात्र तरीही मृतदेहांमध्ये मोठ्या प्रमाणात विषाणूंचा धोका असतो त्यामुळे गंगेच्या पाण्यामध्ये अशाप्रकारे मृतदेह सोडणे ह्यामधून गंगेचं प्रदूषण तर होतंच मात्र गंगेच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो सजीवांच्या जीवालाही यामुळे धोका निर्माण होतो.