देशातील करोना रुग्णांच्या गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीनुसार, रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. देशाच्या राजधानीतही करोना आटोक्यात येत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर आता करोना विषाणूच्या पुनरुत्पादनचा दर पुन्हा कमी झाल्याने दिल्लीमध्ये रुग्णसंख्येत घट दिसून आली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये दिल्लीत करोना विषाणूच्या पुनरुत्पादनचा दर ०.५७ जवळ होता. करोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिलच्या मध्यभागी हा आकडा २.३ पर्यंत पोहोचला, म्हणजे एक कोविड-पॉझिटिव्ह व्यक्ती दोन व्यक्तींना संक्रमित करत होती. मात्र नंतरच्या काळात हा आकडा खाली येत गेला. एप्रिलमध्ये चाचणी केलेल्या एकूण व्यक्तींपैकी सकारात्मक चाचणी आलेल्या लोकांची संख्या आणि नवीन रुग्णांची संख्या ही दिल्लीत वाईट परिस्थिती असल्याची सूचना देत होती. मात्र आता पुन्हा करोना विषाणूच्या पुनरुत्पादनचा दर ०.५७ वर आल्याने दिल्लीत रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

देश पातळीवर देखील आठवड्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. १६ मे रोजी सक्रिय असणाऱ्या रुग्णांची संख्या १ लाखाने कमी झाली. दुसऱ्या दिवशी ही संख्या १.६ लाखावर पोहोचली होती. करोना चाचणी पॉझिटिव्ह येण्याचा दर बर्‍याच राज्यांत खाली आला आहे. तसेच करोना विषाणूच्या पुनरुत्पादनचा दर ०.९ पर्यंत खाली आला आहे. जागतिक आरोग्य तज्ञांच्या मते,  विषाणूच्या पुनरुत्पादनचा दर हा १ अंकाने खाली आला तर संसर्ग कमी होत असल्याचे सूचित करते.

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून आपल्याकडे अशी चांगली परिस्थिती आल्याचे कमी वेळा पहायला मिळाले आहे. देशातील बर्‍याच भागात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे करोनाचा प्रसार रोखण्यात यश आले आहे. लसीकरणाचा प्रभावही अलीकडे या आकड्यावरुन दिसत आहे.

देशात १५ मे पर्यंत करोना पुनरुत्पादनचा दर हा ०.९० टक्के इतका होता. तर महाराष्ट्रात ०.७८, दिल्लीमध्ये ०.५७, कर्नाटक ०.९१, उत्तर प्रदेश ०.६४ तर बिहारमध्ये १.०३ टक्के इतका करोनाच्या विषाणूचा पुनरुत्पादनचा दर असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दररोजच्या रोजच्या करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. या तीन राज्यांमध्येच देशातील सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. सरासरी दैनंदिन मृत्यू अजूनही जास्तच आहेत. ७ दिवसांच्या आकडेवारीनुसार मृत्यूचे हे आधीच्या तुलनेत कमी होण्याची आशा आहे.

देशामध्ये ३ मे ते ९ मे दरम्यान रोज आढळणाऱ्या करोना रुग्णांची संख्या ही ३.९२ लाखांच्या आसपास होती. त्यानंतरच्या आठवड्यात ती घसरून ३.२९ लाखांवर गेली. याच काळात सरासरी दैनंदिन मृत्यू ३,८८८ वरून ४,०३८ वर पोचले आहेत.

दिल्लीच्या बाबतीत रोज आढळून येणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत घसरण दिसून आली आहे. ३ मे ते ९ मे दरम्यान १८ हजार असणारी रुग्णसंख्या ही आठवड्याभरात १० हजारांवर आली आहे. महाराष्ट्रात देखील रोज आढळणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत असली तरी मृत्यूदरात वाढ झाली आहे.

दरम्यान, देशात करोना विषाणूच्या पुनरुत्पादनचा दर हा ०.०९ वर आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चिन्ह आहे. परंतु हे सुरुवातीचे आकडे असल्याचे लक्षात ठेऊन अधिक काळजी घेण्याची गरज आहे.