28 November 2020

News Flash

समजून घ्या : करोना काळात फोर डेज वीकची मागणी का वाढतेय?

अनेक बड्या नेत्यांचाही या संकल्पनेला आहे पाठिंबा, जाणून घ्या फोर डेज वीकचा इतिहास

करोनामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. जगभरातील लाखो लोकं करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये बेरोजगार झालेत. अनेक कंपन्यांनी फ्लेकजीबल वर्कप्लेस म्हणजेच शक्य असेल तिथून काम करा असं धोरण स्वीकारलं असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बदल केले आहेत. यामुळे कंपन्यांच्या खर्चात कपात झाली असून कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमताही वाढल्याचे चित्र दिसत आहे. अनेक देशांमध्ये तर वर्क फ्रॉम होम हे अगदी नॉर्मल झालं आहे. मात्र आता या वर्क फ्रॉम होमबरोबच अनेक देशांमधील मोठ्या कंपन्या फोर डेज वीक म्हणजेच आठवड्यातून केवळ चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी अशा पर्यायाचा अवलंब करता येईल का याचा विचार करत आहेत.

जगभरातील अनेक नेते, ट्रेड युनियन म्हणजेच कामगार संघटनाही चार दिवसांच्या आवड्याचा विचार करत आहे. रोजगार वाचवण्याबरोबरच अनेक कारणांसाठी चार दिवसांचा आठवडा सर्वांच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार असल्याचे अनेक तज्ज्ञांच मत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये जर्मनीमधील सर्वात मोठी कामगार संघटना असणाऱ्या आयटी मेटॉलने चार दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयाचे स्वागत केलं. कामगार कपात होऊ नये आणि पगारकपातीचा फटका बसू नये म्हणून संघटनेने या निर्णयाला पाठिंबा दिला.

अचूकता आणि प्रभावी काम

कामाचे वेळापत्रक थोडे लवचिक म्हणजेच फ्लेक्जीबल ठेवल्यास कर्मचाऱ्यांची क्षमता वाढते आणि वर्क लाइफ बॅलेन्स म्हणजेच काम आणि खासगी आयुष्य संभाळण्यासही मदत होते असं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे. चार दिवसांचा आठवडा म्हणजे केवळ तास कमी करणे असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. मुळात चार दिवसांचा आठवडा म्हणजे केवळ एक दिवस कमी काम करणं असा नसून चार दिवसांमध्येच दिलेल्या नियोजित वेळेऐवजी शक्य होईल त्याप्रमाणे प्रभावी आणि कंपनीच्या फायद्याचे काम करणं असं अनेक कंपन्यांना अपेक्षित आहे. पूर्ण वेळ म्हणजेच फूल टाइम कर्मचाऱ्यांनी निवांतपणे पण अचूक आणि जास्त प्रभावीपणे काम करावं अशी कंपन्यांची अपेक्षा आहेत.

पगार कापणार नाही

फोर डेज वीकमध्ये आठवड्याभराचा विचार केल्यास कामाचे तास कमी असले तरी कंपन्या कर्मचाऱ्यांना तितकाच पागर देतील. कमी तासांचे अधिक लक्ष देऊन केलेलं काम हे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करतं, तसेच कर्मचाऱ्यांना थोडी मोकळीक दिल्यास त्यांच्याकडून कमी चूका होतात आणि काम अधिक चांगल्या पद्धतीने होते असं अनेक अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे. कर्मचाऱ्यांची क्षमता फ्लेक्जिबल वर्किंग अवर्स आणि कॉम्प्रेस्ड शेड्युलमुळे अधिक वाढते असं वॉशिंग्टन पोस्टमधील एका लेखात नमूद करण्यात आलं होतं. अनेक बड्या कंपन्याचे कार्यकारी अध्यक्ष चार दिवसांच्या आठवडा या संकल्पनेचे पाठीराखे आहेत. ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली पाहिजे असं मत असणाऱ्या प्रभावी व्यक्तींमध्ये गुगलचे सहसंस्थापक असणाऱ्या लेरी पेज यांचाही समावेश होतो.

करोना काळात महत्व का वाढलं?

करोनाच्या साथीच्या काळामध्ये फोर डेज वीकच्या संकल्पनेला अधिक महत्व मिळण्याचं कारण म्हणजे अनेक कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करायला सांगावं लागत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करणे, प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणी या सर्वांवर उपाय म्हणून वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचवेळी करोनाचा आर्थिक फटका बसल्याने अनेक कंपन्या बंद होत असल्याने बेरोजगारी वाढत आहे. मात्र काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कमी करण्याऐवजी कामाचे दिवस कमी करुन कर्मचाऱ्यांना काम वाटून दिलं आहे. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यावरील ताण कमी झाला आहे. घरुनच काम असल्याने कंपन्यांना जागेचे भाडे, विजेचे बील आणि इतर गोष्टींवरील खर्च वाचवता येत असल्याने तो दुसरीकडे वापरता येत आहे.

आठवड्यात केवळ १५ तास काम

चार दिवसांच्या आठवड्याची संकल्पना काही नवीन नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सध्या जगभरात जी पाइव्ह डेज वीकची संकल्पना राबवली जाते ती काही दशकांपूर्वी जन्माला आली आहे. मात्र त्यापूर्वी १९३० च्या दशकामध्ये मोठी आर्थिक मंदी आली होती त्यावेळी आताप्रमाणेच हजारो लोकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी चार दिवसांच्या आठवड्याचा निर्णय राबवण्यात आला होता. २० व्या शतकापासून अनेक तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी कामाचे तास कमी केल्यास कामातील अचूकता आणि अंतिम प्रोडक्ट अधिक चांगला आणि दर्जात्मक दृष्ट्या उत्तम असतो असं सांगितलं आहे. अर्थतज्ज्ञ जोन मेनार्ड केणीज यांनी तर पुढील शतकभरामध्ये आठवड्यात केवळ १५ तास काम करण्याची संकल्पना प्रत्यक्षात येईल असा अंदाज १९२८ साली व्यक्त केला होता.

दिवसाला १० ते १६ तासांवरुन आठवड्याला ४० तास

१९२० आणि १९३० च्या दशकामध्ये उद्योक असणाऱ्या हेनरी फोर्ड यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास कमी केले. त्यांनी दिवसाला १० ते १६ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला ४० तास काम दिलं. आश्चर्याची बाब म्हणजे यामुळे निर्मितीवर सकारात्मक परिणाम दिसून आला. लोकांना खरेदीसाठी वेळ उपलब्ध करुन दिला तर उत्पादनांची मागणी वाढते आणि अधिक जास्त उत्पादन घेता येते, हे फोर्ड यांच्या लक्षात आले. वर्ल्ड्स वर्क या मासिकाला १९२६ साली दिलेल्या मुलाखतीमध्ये फोर्ड यांनी, “ग्राहकांची बाजरपेठ वाढवायची असल्यास त्यांना निवांतपणा देणे आवश्यक आहे. निर्माण केलेल्या उत्पादनांचा वापर करण्यासाठी ग्राहकांकडे मोकळा वेळ असेल तरच माल विकला जाईल. यामध्ये अगदी गाड्यांचाही समावेश होतो,” असं म्हटलं होतं.

जर्मनीत कुत्झार्बीट

२००८ साली आलेल्या आर्थिक मंदीच्या काळामध्ये जर्मनीने कमी कालावधीसाठी काम करण्याची संकल्पना राबवली होती. कुत्झार्बीट असं या संकल्पनेचं नाव होतं. कर्मचारीकपात करुन आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवण्यात आलं. या कालावधीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्या तासांमध्ये काम केलं आहे त्यासाठी पूर्ण तर ज्या तासांमध्ये काम केलं नाही तेव्हा ६० टक्के वेतन देण्यात आलं होतं.

निवडणुकीमध्ये आश्वासन

मागील वर्षी युनायटेड किंग्डममधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लेबर पार्टीने आम्ही फोर डेज वीक आणि आठवड्याला ३२ तास काम करण्याची संकल्पना १० वर्षांमध्ये अंमलात आणू आणि यामध्ये कोणाच्याही नोकरीवर गदा येणार नाही असं म्हटलं होतं. मात्र विरोधकांनी यावरुन लेबर पार्टीवर टीका करत याचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल असं म्हणत टीकास्त्र सोडलं होतं.

सहा तास काम

स्वीडनने मागील बऱ्याच वर्षांपासून सहा तास शिफ्टचे वेळापत्रक स्वीकारले आहे. यामुळे तेथील कर्मचारी वर्गाच्या कामाच्या दर्जात प्रचंड सुधारणा झाल्याचे समोर आले आहे. सहा तास काम केल्याने कर्मचारी अधिक आनंदी, श्रीमंत आणि कार्यक्षम झाल्याचे अनेक अहवालांमधून स्पष्ट झाले आहे.

मायक्रोसॉफ्टने केला होता प्रयोग

मायक्रोसॉफ्ट कंपनीने २०१९ साली ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या दोन हजार ३०० कर्मचाऱ्यांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी तीन दिवस सुट्टी दिली होती. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ४० टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले.

बड्या नेत्यांचा पाठींबा

कामगार संघटनांबरोबरच जागतिक स्तरावरील अनेक बडे नेते चार दिवसाचा आठवडा असणाऱ्या वर्क मॉडेलचं समर्थन करताना दिसतात. यामध्ये न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन आणि रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनाही चार दिवसांच्या आठवड्याचं समर्थन केलं आहे. मे महिन्यामध्ये करोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर टप्प्याटप्प्यात देशातील पर्यटन सुरु करताना न्यूझीलंडमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी आर्डेन यांनी चार दिवसांच्या आठवड्याबद्दल कंपन्यांनी विचार करावा असं आवाहन केलं होतं. देशामधील कंपन्यांनी चार दिवसांचा आठडा ठेवण्यासंदर्भात विचार करावा. पर्यटन हा प्रमुख व्यवसाय असलेल्या न्यूझीलंडमधील कंपन्यांनी चार दिवसांच्या आठवड्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा. यामुळे येथील स्थानिक पर्यटनाला आणि त्यासंबंधित उद्योगांना हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होईल अशी अपेक्षा आर्डेन यांनी व्यक्त केली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 3:00 pm

Web Title: explained the 4 day work week model gaining ground amid the covid 19 pandemic scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 समजून घ्या : आयपीएलमध्ये धोनी अपयशी ठरण्यामागची कारणं…
2 समजून घ्या: एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याचा नेमका भाजपावर काय परिणाम होईल?
3 समजून घ्या : सुट्ट्या पैशांऐवजी दुकानदाराने चॉकलेट हातात टेकवली तर कुठे तक्रार कराल?
Just Now!
X