कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर विराट कोहली, शमी यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने आश्वासक मारा करत धडाकेबाज विजयाची नोंद केली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेचं पहिल्या डावातील शतक आणि भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा ही टीम इंडियाच्या विजयाची वैशिष्ट्य ठरली.

या विजयानंतर सर्व स्तरातून भारतीय संघाचं कौतुक होत आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताच्या या विजयाला सर्वोत्तम पुनरागमन असं म्हटलं आहे. जाणून घेऊयात मेलबर्न कसोटीतला विजय हा भारतीय संघासाठी खास आणि महत्वाचा का आहे??

अवश्य वाचा – “जन्नत में अब्बा भी मुस्कुरा रहे होंगे…” प्रभावी मारा करणाऱ्या सिराजचं वासिम जाफरकडून कौतुक

नेमकी पार्श्वभूमी काय होती?

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २०२० हे वर्ष सर्वांसाठी विचीत्र ठरलं आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर भारतीय खेळाडू Bio Secure Bubble मधून ऑस्ट्रेलियात दाखल झाले. IPL संपवून ऑस्ट्रेलियात दाखल होणं. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणं. यानंतर लगेच सरावाला सुरुवात, मालिकेदरम्यान कामगिरी चांगली करण्यापासून कोविडचे नियम मोडले जाणार नाहीत याची काळजी घेणं अशा मानसिक द्वंद्वातून सर्व भारतीय खेळाडू जात होते.

अ‍ॅडलेडमधली नामुष्की –

अ‍ॅडलेड कसोटी सामना हा सर्व भारतीय संघासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत सामन्यावर पकड मजबूत बसवणारा भारतीय संघ तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात अवघ्या ३६ धावांत गारद झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने आपली सर्वात निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली. त्यातच पराभव झाल्यानंतर विराट कोहली भारतात परतला. भरवशाचा गोलंदाज मोहम्मद शमीला फलंदाजीदरम्यान हाताला दुखापत झाल्यामुळे त्यालाही आपलं संघातलं स्थान गमवावं लागतं.

अवश्य वाचा – “अजिंक्यमुळे ड्रेसिंग रुममध्ये शांतता आली”, मेलबर्न कसोटी विजयानंतर सहकाऱ्याने केलं कौतुक

भारतीय संघाला याआधीत रोहित शर्मा, इशांत यांची उणीव भासत होती. त्यातच मेलबर्नमध्ये उमेश यादवही दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यामुळे भारतीय संघासाठी अधिकच चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. तरीही भारतीय संघाने या सर्व गोष्टींचं दडपण न येऊ देता आश्वासक खेळ करत सामन्यात बाजी मारली.

सर्व स्तरातून टीकेचा भडीमार, तरीही भारतीय खेळाडूंचा लौकिकाला साजेसा खेळ –

पराभव झाला की साहजिकच टीका ही होणार. भारतात क्रिकेटला असणारं फॅन फॉलोइंग लक्षात घेता…पहिल्या कसोटीतला दारुण पराभव भारतीय चाहत्यांना चांगलाच जिव्हारी लागला होता. सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी, माजी खेळाडूंनी भारतीय संघाची अक्षरशः खरडपट्टी काढली. हे सत्र इथेच थांबलं नाही, दुसऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुलला संघात स्थान नाकारल्यामुळे अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त करत टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला दोषी ठरवलं.

सर्व बाजुंनी टीका होत असताना कोणत्याही खेळाडूंचा आत्मविश्वास सहज कमी होऊ शकतो. परंतू अजिंक्य रहाणेने आपल्या शांत आणि संयमी नेतृत्वाच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवून देत अ‍ॅडलेड कसोटी पराभवाच्या कटू आठवणी विसरायला मदत केली.

अवश्य वाचा – कर्णधार अजिंक्यचा मेलबर्नमध्ये डंका, धोनीसोबत मानाच्या पंगतीत स्थान

कर्णधार अजिंक्यचं महत्वाचं योगदान –

विराट कोहली माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेवर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी येणार हे स्पष्ट होतं. २०२० वर्षात अजिंक्यला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात संधी मिळाली, मात्र इकडे तो आपली छाप पाडू शकला नाही. आयपीएलमध्येही त्याला सातत्याने संघात स्थान मिळालं नाही. त्यातच कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात फॉर्मात असलेल्या विराटला धावबाद करण्याचं बालंट अजिंक्यच्या अंगावर आलं.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणे चतूर कर्णधार, शास्त्री गुरुजींनी केलं कौतुक

परंतू या सर्व नकारात्मक गोष्टींचा आपल्यावर परिणाम न होऊ देता अजिंक्यने अत्यंत शांत डोक्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं. दोन्ही डावांत गोलंदाजीतले बदल, क्षेत्ररक्षणात बदल करुन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जाळ्यात अडकवणं. पहिल्या कसोटीत विहारी, पंत, जाडेजा यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी यामुळे अजिंक्यने कर्णधार म्हणून स्वतःची वेगळी छाप पाडत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अवश्य वाचा – आभाळाएवढं दुःख विसरुन तो लढला आणि यशस्वीही झाला, बॉक्सिंग डे कसोटीवर सिराजची छाप