करोना संकटात आज संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागताची तयारी करत आहे. मात्र करोना संकट अद्यापही पूर्ण टळलं नसल्यानं बंधनं पाळावी लागणार आहेत. मुंबईतही नववर्षाचं सेलिब्रेशन करताना काही अटींचं पालन करावं लागणार आहे. मुंबईचे सह-पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईत ३१ डिसेंबरच्या रात्री नेमक्या कोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या अटी पाळाव्या लागणार आहेत यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. याबद्दल जाणून घेऊयात…

रात्री ११ वाजल्यानंतर घरात किेवा गच्चीवर पार्टी करण्याची परवानगी आहे का?
हो रात्री ११ वाजल्यानंतरही तुम्ही पार्टी करु शकता…पण यावेळी कमीत कमी लोकं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. किती लोकं एकत्र येऊ शकतात याबद्दल कोणती अशी संख्या देण्यात आलेली नाही, मात्र गाइडलाइन्सनुसार तुमच्याकडे किती जागा आहे यावर ते अवलंबून आहे.

त्यामुळे तुमच्या घरात गर्दी आणि शारिरीक संपर्क होत नसेल, सहा फुटांचं अंतर पाळलं जात असेल आणि मास्क वापरले जात असतील तर तुम्हाला परवानगी आहे. जर पोलिसांना एखाद्या ठिकाणी गर्दी होत असल्याचा संशय आला किंवा कोणी आवाज होत असल्याची तसंच इतर त्रास होत असल्याची तक्रार केल्यास पोलीस कारवाई करु शकतात.

नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बोट, हॉल तसंच इतर गोष्टी बूक करण्यासाठी परवानगी आहे.

३१ डिसेंबरला रात्री ११ वाजल्यानंतर प्रवासासाठी कार/दुचाकी वापरु शकतो का?
जिथपर्यंत तुमच्या कारमध्ये फक्त चार आणि दुचाकीवर दोन लोकं असतील तुम्हाला ११ नंतरही प्रवासाची परवानगी आहे. पण यावेळी नाकाबंदीमध्ये तुम्हाला अडवून कुठे जात आहात याबद्दल चौकशी केली जाईल याची तयारी ठेवा.

मर्यादित प्रवाशांसोबत पोलीस कोणीही ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह करणार नाही याचीही काळजी घेतील. तसंच वेगाने वाहनं चालवणाऱ्या आणि नियमांचं उल्लंघन कऱणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.

रेस्तराँ, पब, बार सुरु ठेवण्यास परवानगी आहे का? ऑर्डर देऊ शकतो का?
नाही…लॉकडाउनमधील निर्बंधांमुळे ही ठिकाणं लोकांसाठी बंद असणार आहेत. अत्यावश्यक सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. याचा अर्थ स्विग्गी आणि झोमॅटो किंवा इतर रेस्तराँमधून तुम्ही जेवण मागवू शकता.

सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहे का?
सार्वजनिक वाहतुकीवर कोणतीही बंधनं नसणार आहेत. जर तुम्ही टॅक्सी, ओला किंवा उबर बूक केलीत तर चालकासहित चौघांनाच प्रवासाची परवानगी आहे. मात्र यावेळी गेल्यावर्षीप्रमाणे लोकांना घरी पोहोचता यावं यासाठी मध्यरात्रीनंतर विशेष बस किंवा ट्रेन नसणार आहे.

गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, चौपाटी अशा ठिकाणी जाण्यास परवानगी आहे का?
सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे लोकं छोट्या ग्रुपमध्ये असतील आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी जागा असेल तर पोलीस कोणतीही अडवणूक करणार नाहीत. पण जर गर्दी होण्यास सुरुवात झाली तर पोलीस प्रवेश बंद करतील आणि गर्दीही कमी करतील.

लोणावळा, खंडाळा अशा ठिकाणी प्रवास करु इच्छिणाऱ्या मुंबईकरांचं काय?
ही ठिकाणं मुंबई पोलिसांच्या अख्त्यारित येत नसल्याने तेथील स्थानिक पोलिसांकडून माहिती मिळवणं गरजेचं आहे. पण जिथपर्यंत मुंबईत प्रवेश करण्याचा प्रश्न आहे गाडीमध्ये चार किंवा त्यापेक्षा कमी लोक असतील तर कोणतीही अडवणूक होणार नाही.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह करणाऱ्यांची तपासणी कशी होणार?
मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्यांविरोधात पोलीस कडक कारवाई करणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कोणी मद्यप्राशन करत असल्याचा संशय आल्यास जवळच्या रुग्णालयात नेऊन ब्लड टेस्ट करणार आहेत.