1400-Year-Old Hindu Idols Found at Karkoot Nag, Kashmir: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झऱ्याच्या संवर्धंनासाठी सुरू असलेल्या प्रकल्पाच्या उत्खननादरम्यान प्राचीन हिंदू मूर्ती आणि शिवलिंगांचा शोध लागल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.हे अवशेष ऐश्मुकाममधील सालिया भागातील कारकूट नाग झऱ्याजवळ सापडले असून, हे ठिकाण जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थळ काश्मिरी पंडित समुदायासाठी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे आणि हे ठिकाण इसवी सन ६२५ ते ८५५ या कालखंडादारम्यान काश्मीरवर राज्य करणाऱ्या कार्कोट वंशाशी संबंधित असल्याचे मानले जाते, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या झर्याच्या संवर्धनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे.
या शोधानंतर जम्मू-काश्मीर अभिलेखागार, पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळाला भेट दिली आणि मिळालेल्या पुरावस्तू ताब्यात घेतल्या. विभागातील एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, “या मूर्ती आणि शिल्प श्रीनगरमधील एसपीएस संग्रहालयात पाठवण्यात येतील. या संग्रहातील संशोधक आणि विभागातील तज्ज्ञ त्यांचा अभ्यास करून त्यांचा कालावधी आणि ऐतिहासिक संदर्भ निश्चित करतील.”
स्थानिक काश्मिरी पंडितांची भूमिका
स्थानिक काश्मिरी पंडितांनी पीटीआयला सांगितले की, या भागाचा कार्कोट वंशाशी ऐतिहासिक संबंध आहे आणि कदाचित येथे एखादे मंदिर होते किंवा या मूर्ती हेतुपूर्वक येथे सुरक्षेसाठी ठेवण्यात आल्या असाव्यात. त्यांनी हेही नमूद केले की, ज्या तलावात या मूर्ती सापडल्या तो तलाव पवित्र मानला जातो आणि हे ठिकाण तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. “आम्हाला या पुरावस्तू जतन केल्या जाव्यात असे वाटते. आम्ही ऐकले आहे की, येथे एक मंदिर होते. येथे नवीन मंदिर बांधले जावे आणि शिवलिंगांची परत स्थापना व्हावी,” असे त्यांनी सांगितले. अभिलेखागार, पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागाने या स्थळाचा धार्मिक किंवा वारसा पर्यटनासाठी विकास करण्याचे कोणतेही नियोजन अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र, मूल्यमापन पूर्ण झाल्यावर संवर्धनाची प्रक्रिया होणे अपेक्षित आहे.
त्याच पार्श्वभूमीवर कार्कोट वंशाविषयी जाणून घेण महत्त्वाचं ठराव
कार्कोट कोण होते?
कार्कोट (Karkota किंवा Karkoota) हा प्राचीन काश्मीरवर राज्य करणारा एक प्रभावशाली राजवंश होता. अंदाजे इसवी सन ६२५ ते ८५५ दरम्यान या वंशाची काश्मीरवर सत्ता होती. या काळात काश्मीर राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या समृद्ध होते.
कार्कोट वंशाचा उगम आणि इतिहास
- कार्कोट वंशाची स्थापना दुर्लभवर्धन (Durlabhavardhana) नावाच्या राजाने केली.
- या वंशातील सर्वात प्रसिद्ध राजा ललितादित्य मुक्तपीड (Lalitaditya Muktapida) होता, त्याने इसवी सन ७२५ ते ७५३ या दरम्यान राज्य केले.
- ललितादित्याने काश्मीरला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध केले. त्याच्या राज्याचा संबंध चीन, मध्य आशिया आणि तुर्कस्तानाशी होता.
सांस्कृतिक आणि धार्मिक योगदान
- कार्कोट राजांनी हिंदू धर्माला आश्रय दिला आणि शैव तसेच वैष्णव परंपरेला प्रोत्साहन दिले.
- त्यांनी अनेक मंदिरे, विहार आणि सांस्कृतिक स्थापत्य उभारले.
- या वंशाच्या काळात काश्मीरमध्ये कला, शिल्पकला आणि शिक्षण यांचा उत्कर्ष झाला.
कार्कोट वंशाचे महत्त्व
- कार्कोट कालखंडाला काश्मीरचा सुवर्णकाळ मानले जाते.
- त्यांच्या कारकीर्दीत काश्मीर फक्त धार्मिक केंद्रच नव्हे तर व्यापार आणि सांस्कृतिक दुवा म्हणूनही महत्त्वाचे ठरले.
ललितादित्य मुक्तपीड
ललितादित्य मुक्तपीड हा काश्मीरच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि प्रख्यात राजा मानला जातो. त्याच्या कारकीर्दीत काश्मीरने राजकीय सामर्थ्य, आर्थिक संपन्नता आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा सुवर्णकाळ अनुभवला. ललितादित्य मुक्तपीड हा कार्कोट वंशातील एका बलाढ्य राजघराण्यात जन्मला.
साम्राज्यविस्तार आणि लष्करी सामर्थ्य
- ललितादित्य मुक्तपीड केवळ काश्मीरपुरता मर्यादित न राहता तो एक मोठा साम्राज्यविस्तारक ठरला. त्याने काश्मीरच्या साम्राज्याचा विस्तार मध्य आशियापर्यंत केला.
- चीन, तुर्कस्तान, तिबेट आणि मध्य आशियातील अनेक राज्यांशी लष्करी आणि व्यापारी संबंध प्रस्थापित केले.
- राजतरंगिणीत केलेल्या उल्लेखानुसार, त्याने अनेक यशस्वी मोहिमा करून काश्मीरला एक प्रबळ सामरिक शक्ती म्हणून पुढे आणले.
व्यापार आणि सांस्कृतिक संबंध
- ललितादित्यच्या राज्यकाळात काश्मीरचे व्यापारी संबध रेशीम मार्गाशी होते.
- चीन, मध्य आशिया आणि तुर्कस्तानशी व्यापारी देवाणघेवाण वाढली.
- सांस्कृतिक दृष्ट्या बौद्ध, हिंदू आणि मध्य आशियाई परंपरांचा संगम घडला.

कला, स्थापत्य आणि धार्मिक योगदान
- ललितादित्य हा कला आणि स्थापत्यकलेचा मोठा आश्रयदाता होता. त्याच्या काळात मंदिरे, विहार आणि शैक्षणिक केंद्रांची मोठ्या प्रमाणावर स्थापना झाली.
- मार्तंड सूर्य मंदिर हे ललितादित्याने बांधलेले सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. हे आजही काश्मीरच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. हे मंदिर अद्वितीय वास्तुशिल्पाचे उदाहरण आहे आणि भारतीय प्राचीन वास्तुकलेच्या उत्कर्षाचे दर्शन घडवते.
- याशिवाय अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांची निर्मिती त्याच्या काळात झाली, त्यामुळे काश्मीरला एक सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रतिष्ठा मिळाली.
धार्मिक धोरण
ललितादित्य हा हिंदू धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होता, परंतु त्याने बौद्ध आणि इतर धर्मांनाही आश्रय दिला. या सहिष्णु धोरणामुळे काश्मीर धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण केंद्र म्हणून विकसित झाले.
ललितादित्यचा वारसा आणि आजचा संदर्भ
- ललितादित्य मुक्तपीडने काश्मीरला राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या शिखरावर नेले. त्याचा काळ काश्मीरच्या सुवर्णयुगाचा शिखरबिंदू मानला जातो.
- त्याने निर्माण केलेले मार्तंड सूर्य मंदिराचे अवशेष आज भारतीय वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत.
- अलीकडेच कार्कोट वंशाशी संबंधित मूर्ती आणि अवशेषांच्या शोधामुळे त्याचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे.
अनंतनाग जिल्ह्यातील झऱ्याच्या संवर्धनादरम्यान सापडलेल्या या प्राचीन मूर्ती आणि शिवलिंगं केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाहीत, तर काश्मीरच्या ऐतिहासिक वैभवाची जिवंत साक्ष आहेत. या शोधामुळे कार्कोट वंशाच्या सांस्कृतिक वारशावर नव्याने प्रकाश पडतो आणि काश्मीरच्या सुवर्णकाळाची आठवण होते. संवर्धन आणि शास्त्रीय अभ्यासाच्या प्रक्रियेनंतर या अवशेषांमुळे भारताच्या प्राचीन इतिहासातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात हे स्थळ वारसा संवर्धनाच्या दृष्टीने विकसित झाले तर ते केवळ संशोधकांसाठीच नव्हे तर सांस्कृतिक पर्यटनासाठीही महत्त्वाचे केंद्र ठरेल.