140000-year-old submerged world Discover: पुरातत्त्वशास्त्राच्या जगात असे काही क्षण येतात, जे आपल्या इतिहासाच्या धारणेला पूर्णपणे बदलून टाकतात. इंडोनेशियाजवळील मदुरा सामुद्रधुनीत नुकत्याच झालेल्या शोधाने त्यापैकी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सुमारे एक लाख चाळीस हजार वर्षांपासून पाण्याखाली दडलेले जग आता आपल्यासमोर उघड झाले आहे. येथे सापडलेली मानवी जीवाश्मं आणि महाकाय प्राण्यांचे अवशेष यामुळे आग्नेय आशियातील प्रागैतिहासिक जीवनाचा नवा पट समोर आला आहे.
हा शोध क्वार्टनरी एन्व्हायर्नमेंट्स अँड ह्यूमन्स या जर्नलमध्ये २०२५ साली प्रसिद्ध झाला. नेदरलँड्समधील लेडन विद्यापीठाचे हॅरोल्ड बर्घुइस यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय टीमने तब्बल दहा वर्षांच्या संशोधनानंतर याचे निष्कर्ष जाहीर केले. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि जपानमधील संशोधकांचा सहभाग या प्रकल्पात होता. आधुनिक सुरबाया शहराजवळील या जीवाश्म स्थळाने एकेकाळी महाकायवृक्षसंपदा, वाहत्या नद्या आणि आरंभीच्या मानवी वस्तीने समृद्ध असलेली एक वेगळीच परिसंस्था उघड केली आहे. या शहराला समुद्राखाली कायमस्वरूपी जलसमाधी मिळाली आहे.
संशोधनाच्या प्रवासाची सुरुवात
या संशोधनाच्या प्रवासाची सुरुवात २०११ साली झाली. एका व्यापारी वाळू उपसा मोहिमेदरम्यान समुद्रतळातील गाळातून जीवाश्म हाडे वर आली, सुरुवातीला याचे महत्त्व कळले नाही. पण नंतरच्या अभ्यासात दोन कवटीचे तुकडे आढळले. यात एक कपाळाचा आणि एक पार्श्वभागाचा तुकडा होता. हे अवशेष मानवी उत्क्रांतीतील होमो इरेक्टसशी जुळणारे होते. ऑप्टिकली स्टिम्युलेटेड ल्युमिनेसन्स तंत्राने या जीवाश्मांचे वय एक लाख त्रेचाळीस हजार ते एक लाख एकोणीस हजार वर्षांदरम्यान (१,४३,००० ते १,१९,००० वर्षांदरम्यान) असल्याचे सिद्ध झाले.
ही जीवाश्मं एका गाडलेल्या नदीखोऱ्यात सापडली, हे खोरे सोलो नदी प्रणालीचा भाग होते. ही नदी प्रागैतिहासिक काळात सुंडालँड या विस्तीर्ण भूभागावरून वाहत होती. जावामध्ये आतापर्यंत सापडलेली होमो इरेक्टसची स्थळे मुख्यत्वे आतल्या भागात किंवा डोंगराळ प्रदेशात होती. त्यामुळे किनारी भागात लागलेला हा शोध वेगळाच ठरला. बर्घुइस यांच्या मते ही जीवाश्मं एका बुडालेल्या नदीखोऱ्यात जतन झाली होती, खोरे हळूहळू नदीच्या वाळूने भरून गेले.
६ हजार जीवाश्म, ३६ प्रजाती
पण या ठिकाणी केवळ मानवी जीवाश्मच नव्हे तर आणखी मोठा खजिना सापडला आहे. संशोधकांना तब्बल सहा हजार जीवाश्म नमुने मिळाले, जे किमान ३६ वेगवेगळ्या प्रजातींचे प्रतिनिधित्व करतात. त्यात कोमोडो ड्रॅगन, म्हशी, हरणं आणि तब्बल तेरा फूट उंचीचा स्टेगोडॉन यांचे अवशेष होते. स्टेगोडॉन हा हत्तीप्रमाणे दिसणारा पण नष्ट झालेला शाकाहारी प्राणी होता. या प्राण्यांच्या अवशेषांवरून या प्रदेशात प्लायस्टोसीन काळात सजीवांची विलक्षण विविधता होती, हे स्पष्ट होते.
मांस खाणारे शिकारी पूर्वज
याहून महत्त्वाचे म्हणजे काही हाडांवर मानवी हस्तक्षेपाचे पुरावे आढळले. पाणकासवांच्या आणि बोविड्सच्या हाडांवर कापल्याचे ठसे होते. त्यावरून असे दिसते की, होमो इरेक्टस ही मानवी प्रजाती केवळ मृत प्राण्यांचे मांस खाणारी नव्हती, तर ती संघटितपणे शिकार करत होती आणि अस्थिमज्जाही खात होती. या पुराव्यांवरून त्यांचे वर्तन अपेक्षेपेक्षा अधिक गुंतागुंतीचे होते, हे समजते. संशोधनात बर्घुइस यांनी नमूद केले की, पाणकासवांच्या हाडांवरील ठसे आणि बोविड्सच्या मोडलेल्या हाडांचे प्रचंड प्रमाण यावरून या गटाने समुहाने शिकार केली हे दिसून येते.
मानवी उत्क्रांतीचे चित्र अधिक परस्परसंवादी आणि गतिशील
हा शोध आणखी एका महत्त्वाच्या संकल्पनेला आव्हान देतो. आतापर्यंत जावातील होमो इरेक्टस गट इतर मानववंशीय गटांपासून वेगळे होते, असे मानले जात होते. पूर्वी सापडलेल्या जीवाश्म स्थळांवरून त्यांचा बाहेरील लोकांशी मर्यादित संपर्क होता, असे मानले जात होते. मात्र, मदुरा सामुद्रधुनीतून मिळालेल्या पुराव्यांवरून ही कल्पना खोटी ठरते. प्रगत शिकार तंत्र आणि संसाधनांनी समृद्ध अशा वातावरणाचा योजनाबद्ध वापर यावरून या गटाने इतर आशियाई मानववंशीय लोकांशी सांस्कृतिक देवाणघेवाण केली असावी किंवा कदाचित त्यांच्याशी संकरही केला असावा, असे लक्षात येते. यामुळे या प्रदेशातील मानवी उत्क्रांतीचे चित्र अधिक परस्परसंवादी आणि गतिशील दिसते.
हवामानबदलाने पाणीपातळी वाढली
भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या हा शोध तितकाच मौल्यवान आहे. मध्य प्लायस्टोसीन काळात हवामान बदलांमुळे आग्नेय आशियातील भूमीमध्ये मोठे परिवर्तन झाले. समुद्रसपाटी कमी असताना सुंडालँड हा विस्तीर्ण गवताळ प्रदेश होता, जो आफ्रिकन गवताळ प्रदेशांशी अधिक साम्य दर्शवत होता. पण सुमारे १४,००० ते ७,००० वर्षांपूर्वी समुद्रसपाटी वाढली, विशेषतः हिमनद्यांच्या वितळण्यामुळे परिणामस्वरूप सुंडालँडचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला. यामुळे जमिनीवरील परिसंस्था सागरी परिसंस्थेत परिवर्तित झाल्या. गाळच्या थराखाली जीवाश्मं जतन झाली आणि हजारो वर्षांनी ती आपल्यापर्यंत पोहोचली.
पॅलिओइकॉलॉजीसाठी दुर्मीळ संधी
येथे सापडलेला गाळ एका संक्रमणकालीन भूगर्भीय युनिटशी संबंधित आहे, असे संशोधकांना वाटते. हे युनिट नदीमुखी अवस्थेतून सागरी अवस्थेत परिवर्तित झाले होते, ज्यावरून वेगाने घडलेला पर्यावरणीय बदल दिसून येतो. या आदर्श जतन परिस्थितीमुळे संशोधकांना हरवलेल्या जगाच्या पॅलिओइकोलॉजीचा अभ्यास करण्याची दुर्मीळ संधी मिळाली आहे. या शोधामुळे होमो इरेक्टसचा वावर किती विस्तृत होता हेही स्पष्ट झाले आहे. ते नदीखोऱ्यांपासून ते गवताळ मैदानी प्रदेशांपर्यंत वेगवेगळ्या परिसंस्थांना जुळवून घेण्यात कुशल होते. ब्रांतस आणि सोलो नद्या त्या काळात वाहत होत्या आणि हवामानाच्या ताणतणावाच्या काळात प्राण्यांच्या स्थलांतरासाठी तसेच मानवी हालचालींसाठी नैसर्गिक मार्गिका म्हणून काम करत होत्या.
प्लायस्टोसीन काळाचे दर्शन
मदुरा सामुद्रधुनीत सापडलेली जीवाश्मं ही मध्य प्लायस्टोसीन काळातील अखेरच्या टप्प्याचे दर्शन घडवतात. विशेषतः मरीन आयसोटोप स्टेज ६ या हिमयुगीन टप्प्याशी ती संबंधित आहेत, त्यांचा कालावधी १,९०,००० ते १,३०,००० वर्षांदरम्यान होता. या शोधामुळे त्या काळातील जीवनाचा अचूक आणि ठोस कालखंड आपल्या हाती आला आहे. हवामान, भूगोलीय बदल आणि मानवी उत्क्रांती यांना एकमेकांशी जोडून पाहण्याचा नवा दृष्टीकोन यामुळे उपलब्ध झाला आहे.
एकंदरीत, इंडोनेशियाजवळील या शोधामुळे मानवी उत्क्रांती, प्राचीन परिसंस्था आणि हवामान बदल यांचा नवा पट उलगडला आहे. होमो इरेक्टस हे केवळ जगण्यासाठी धडपडणारे आरंभीचे मानव नव्हते, तर ते कुशल शिकारी, संसाधनांचा योजनाबद्ध वापर करणारे आणि बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेणारे होते. त्यांच्या मागे उरलेले हे जीवाश्म आपल्याला सांगतात की, प्राचीन जग कधीही स्थिर नव्हते, ते सतत बदलणारे आणि परस्परांशी जोडलेले होते. हा शोध म्हणजे केवळ हाडांचा खजिना नाही, तर मानवी इतिहासाला नवे रूप देणारा एक जिवंत पुरावा आहे