एका ठिकाणी दडलंय सुमारे २ कोटी टन सोनं, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कागदोपत्री या साठ्याची किंमत तब्बल २ क्वॉड्रिलियन डॉलरपेक्षा अधिक होऊ शकते. पण, त्यात एक अडथळा आहे. हे सोनं ढेकळं किंवा नगेटच्या स्वरूपात नाही. ते अतिसूक्ष्म कणांमध्ये विखुरलेलं आहे, हे सोनं इतकं बारीक आहे की, प्रत्यक्षात ते कधीच आपल्या आवाक्यात येऊ शकणार नाही… तरीदेखील प्रश्न कायम आहे, माहसागराच्या लाटांच्या तळाशी इतकं सोनं असताना, भविष्यातील तंत्रज्ञानाच्या मदतीने ते काढणं शक्य होईल का? की, निसर्गाने ते कायमच बंदिस्त करून ठेवलेलं एक चमत्कारी स्वप्न ठरणार आहे?
सोनं समुद्रात आलंच कसं?
समुद्राच्या पाण्याखाली असलेलं सोनं, हा काही कोणत्या जादूचा भाग नाही. तर, हे लाखो वर्षे चाललेल्या नैसर्गिक प्रक्रियांचं फळ आहे. मातीची झीज आणि हायड्रोथर्मल वेंट्स या नैसर्गिक प्रक्रिया प्रामुख्याने त्यासाठी कारणीभूत आहेत. Land erosion म्हणजे मातीची झीज होणे. पाऊस आणि नद्या हळूहळू खडकांची झीज घडवून आणतात. त्यामुळे या खडकांच्या आत अडकलेल्या सोन्याचे कण पाण्याबरोबर वाहून जातात आणि शेवटी समुद्रात जाऊन मिसळतात.
सोन्याचे अतिसूक्ष्म कण हळूहळू समुद्रात साठत गेले
समुद्राच्या तळाशी टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना भिडतात, त्या ठिकाणी Hydrothermal vents (हायड्रोथर्मल वेंट्स) आढळतात. हे वेंट्स प्रचंड तापमानाचे, खनिजांनी समृद्ध द्रव बाहेर टाकतात. कधी कधी या द्रवांमध्ये सोनं विरघळलेल्या स्वरूपात असतं. जे आजूबाजूच्या समुद्राच्या पाण्यात मिसळतं. म्हणजेच, पावसापासून पर्वतांपर्यंत आणि समुद्राच्या गाभ्यातील वेंट्सपर्यंत अनेक प्रक्रियांच्या माध्यमातून सोन्याचे अतिसूक्ष्म कण हळूहळू समुद्रात साठत गेले आहेत. वादळाचाही याला हातभार लागतो. वाऱ्यामुळे सोन्याचे अतिसूक्ष्म कण दूरवर उडत जातात आणि शेवटी समुद्रात साचतात. पण, अडचण अशी आहे की, समुद्रातील सोन्याची सांद्रता अतिशय क्षीण आहे. ते शोधण्यासाठी अत्यंत संवेदनशील उपकरणांची गरज असते.
सांद्रतेतील सोनं
‘अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात, ध्रुवीय प्रदेशांमध्ये काम करणारे वैज्ञानिक केली फॉल्कनर यांनी म्हटले आहे की, समुद्राच्या पाण्याखालील सोन्याचे प्रमाण फेम्टोमोल्स प्रति लिटर या एककात मोजले जाते. म्हणजेच, ते फक्त ट्रिलियनथ ग्रॅम इतकं अत्यंत सूक्ष्म प्रमाण आहे. अटलांटिक महासागरात आणि ईशान्य पॅसिफिकमध्ये ही सांद्रता सुमारे ५० ते १५० फेम्टोमोल्स प्रति लिटर इतकी आहे. म्हणजेच सोनं इतकं पातळ आणि विखुरलेलं आहे की प्रत्यक्षात ते काढणं जवळपास अशक्यच आहे.
१० कोटी मेट्रिक टन पाण्यात एक ग्रॅम सोन
थोडक्यात सांगायचं तर, प्रति लिटर समुद्राच्या पाण्यात सोन्याचे फक्त काही ट्रिलियनथ ग्रॅमच अंश असतात. केवळ १ ग्रॅम सोनं गोळा करण्यासाठी तब्बल १० कोटी मेट्रिक टन समुद्राचं पाणी लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे आकडे बघितले की, महासागरांच्या प्रचंड आकारामुळे ते साठे अफाट वाटतात, पण प्रत्यक्षात विचार केल्यास एका बादलीनं पाणी काढून सोनं वेगळं करण्याचा प्रयत्न म्हणजे जवळजवळ अशक्य मोहिमच आहे.
समुद्रातून सोनं खणता का येत नाही?
१. मोजमापाची अडचण
सर्वात मोठी अडचण म्हणजे मोजमाप. समुद्रातील सोन्याचं प्रमाण इतकं बारीक आहे की, ते शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना अगदी स्वच्छ प्रयोगशाळा आणि खास धातूच्या शुद्ध बाटल्या वापराव्या लागतात. अगदी क्षुल्लक धुळीचा कण किंवा भांड्यावर राहिलेला छोटासा अवशेषसुद्धा संपूर्ण निकाल बिघडवू शकतो.
२. जुन्या पद्धती आणि नवीन तंत्रज्ञान
प्रगत उपकरणे जसे की, मास स्पेक्ट्रोमीटर उपलब्ध होण्यापूर्वी, संशोधक सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन या पद्धतीवर अवलंबून होते, ज्यात नॅनोग्रॅम स्तरावर सोनं शोधलं जाई. पण हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात सोनं काढण्यासाठी पुरेसं नव्हतं. अलीकडे, २०१८ साली जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटी मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात स्पंजसारखा पदार्थ सुचवला होता, हा पदार्थ समुद्राच्या पाण्यातून सोनं शोषून घेऊ शकतो. ही कल्पना रोचक होती, पण ती अजून व्यावहारिक स्तरावर नफा देणारी पद्धत ठरलेली नाही.
३. अर्थशास्त्र
थोडक्यात सांगायचं तर समुद्रात सोनं आहे, पण ते इतकं विखुरलेलं आणि सूक्ष्म आहे की, ते खणून काढणं आर्थिकदृष्ट्या अजिबात परवडणारं नाही. म्हणजेच, विज्ञानाने सोनं कुठे आहे हे दाखवलं आहे, पण ते मिळवणं म्हणजे खर्चिक मोहिमेपेक्षा जास्त काहीच ठरणार नाही.
समुद्राच्या तळाशी काय स्थिती आहे?
सोनं केवळ समुद्राच्या पाण्यात विरघळलेलं नसून, ते समुद्रतळाशी अधिक सांद्र स्वरूपातही सापडतं. हे सोनं प्रामुख्याने सल्फाइड खनिजांचे थर आणि खनिजांच्या आवरणांमध्ये (mineral crusts) अडकलेलं असतं. असे साठे बहुधा हायड्रोथर्मल व्हेंट्सजवळ तयार होतात, जिथे खनिजे शेकडो वर्षांच्या दीर्घ प्रक्रियेत हळूहळू साचत जातात. परंतु, समस्या अशी की, हे साठे एक ते दोन मैल खोल, कठीण खडकांमध्ये दडलेले असतात.
विज्ञान व पर्यावरणाशी झुंज
समुद्रतळाशी सोन्याचा खजिना दडलाय, पण तो काढणं म्हणजे एकाच वेळी विज्ञान आणि पर्यावरण या दोघांशी झुंज देण्यासारखं आहे. ROVs (Remotely Operated Vehicles) खोल समुद्रात उतरतात, पण ते फक्त अभ्यासासाठी मोजकेचं नमुने वर आणतात. खडकांच्या थरांमध्ये अडकलेलं हे सोनं बाहेर काढणं तांत्रिकदृष्ट्या अवघडच नाही, तर त्यासाठी समुद्राच्या परिसंस्थेला मोठा धोका पत्करावा लागेल. थोडक्यात, समुद्रतळाशी सोनं आहे हे खरं, पण त्यासाठी मोहीम हाती घेणं म्हणजे तांत्रिक आव्हानं, पर्यावरणीय संकटं या दोन्हींचा विस्फोटक संगम आहे.
तब्बल १.४ कोटी किलोग्रॅम सोनं
अनेक अडथळ्यांनंतरही शास्त्रज्ञ या रहस्याचा गाभा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. Earth.com ने दिलेल्या माहितीनुसार, संशोधक अजूनही नद्या, हायड्रोथर्मल वेंट्स आणि गाळ यांच्यामार्गे समुद्रात किती सोनं मिसळतं, ते किती वेगाने फिरतं आणि अखेरीस किती साठून राहतं याचा मागोवा घेत आहेत. एका विश्लेषणानुसार, समुद्रात विरघळलेलं सोनं तब्बल १.४ कोटी किलोग्रॅम इतकं आहे. त्याचा आयुष्यकाल सुमारे २२० वर्षे मानला जातो. म्हणजेच, एकदा सोनं समुद्रात आलं की, ते शतकानुशतकं तिथेच राहातं आणि मगच हळूहळू समुद्रतळाशी साचतं. विशेष म्हणजे, हायड्रोथर्मल वेंट्समधून निघालेलं सोनं फार काळ त्या परिसरात राहत नाही. त्यातील बहुतांश सोनं खोल समुद्रात वाहत जातं आणि अखेरीस सूक्ष्म कणांबरोबर समुद्रतळात साचतं.