scorecardresearch

विश्लेषण : एकेकाळच्या दुष्काळग्रस्त अशा या गावात आज राहतात ६० करोडपती शेतकरी; जाणून घ्या यामागील रहस्य

१२५० लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल ६० करोडपती शेतकरी राहतात यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही.

विश्लेषण : एकेकाळच्या दुष्काळग्रस्त अशा या गावात आज राहतात ६० करोडपती शेतकरी; जाणून घ्या यामागील रहस्य
हिवरे बाजार | hiware bazaar

टाटा, बिर्ला, अंबानी यांच्याप्रमाणे कोणाला करोडपती व्हायला आवडणार नाही? अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकालाच श्रीमंत व्हायचं असतं, चैन करायची असते, स्वच्छंदी जगायचं असतं. पण आपल्यापैकी किती लोकांना ते शक्य होतं? आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? याचं उत्तर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कम्प्युटरसमोर बसून काम करणारी व्यक्ति नव्हे तर महाराष्ट्राच्या या गावातील ५० ते ६० करोडपती शेतकरी देतील. ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल की, शेतकरी मग तो करोडपती कसा? पण यामध्ये अतिशयोक्ती अजिबात नाही. आज आपण अशाच एका करोडपती गावाबद्दल आणि त्या गावाच्या अविश्वसनीय अशा प्रगतीबद्दल जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्हयाजवळ वसलेल्या हिवरे बाजार या छोट्याश्या गावात एक दोन नाही तर तब्बल ६० करोडपती राहतात. १९८९ च्या आधी हे गावही महाराष्ट्रातील इतर गावांप्रमाणे होतं. इथेही बऱ्याच समस्या होत्या. १९७२ मध्ये तर या गावात भयंकर दुष्काळ पडला होता. पण १९९० नंतर गावामध्ये एक सकारात्मक बदल होत गेला आणि समृद्ध गावाकडे याची वाटचाल सुरू झाली. या गावाला एवढं समृद्ध करण्यात सर्वात मोठा सहभाग होता तो म्हणजे पोपटराव बागुजी पवार यांचा. १२५० लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल ६० करोडपती शेतकरी राहतात यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही.

आणखी वाचा : विश्लेषण : अपयश पचवू न शकलेले गुरु दत्त आणि त्यांच्याभोवती निर्माण झालेले अनुत्तरित प्रश्न, जाणून घ्या

१९८९ मध्ये पोपटराव जेव्हा सरपंच म्हणून निवडून आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम गावामध्ये अवैध दारू, तंबाखू, सिगरेट, गुटखा या पदार्थांच्या सेवनावर बंदी घातली आणि गावकऱ्यांच्या आयुष्यातील पहिली वाईट गोष्ट मुळासकट उखडून फेकली. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पोपटराव यांनी पावसाच्या पाण्याचा साठा कसा करता येईल आणि त्यातून पाण्याचा योग्य वापर कसा करता येईल यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले. याबरोबरच त्यांनी वृक्षारोपणावर भर दिला आणि हजाराहून अधिक झाडं लावली. पाणलोट प्रक्रियेमुळे तिथल्या शेतकऱ्यांना वेगवेगळी पिकं घेण्यात चांगलीच मदत होऊ लागली.

१९९० साली या गावात ९० विहिरी होत्या, आज याच गावात तब्बल २९४ विहिरी तुम्हाला आढळून येतील. हळूहळू शेतीतूनच रोजगार उत्पन्न झाला आणि आता शेतीतूनच इथल्या लोकांचं प्राथमिक उत्पन्न येतं. शिवाय इथल्या शेतकऱ्यांनी हळूहळू जास्त पाण्यावर येणारी पिकं घ्यायचं कमी करून पाणी बचत करून ज्यात पाणी कमी लागतं त्या पिकांची लागवड सुरू केली. मध्यंतरी भारतीय फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मण यानेदेखील पोपटराव यांच्या या कार्याची आणि हिवरे बाजार या गावाच्या प्रगतीची प्रशंसा केली होती.

सद्यस्थितीमध्ये या गावातील लोकं आता पशूपालन आणि डेअरी प्रॉडक्टच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आज तब्बल ४००० लीटर दूध रोज या गावात काढलं जातं. १९९५ मध्ये १८२ पैकी १६८ कुटुंबे ही दारिद्र्यरेषेखाली होती, आज तो आकडा शून्यावर आहे. शिवाय प्रत्येक घरात शौचालय आहे. प्रत्येक घरात बायोगॅसची सोय आहे. संपूर्ण गावात शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या सगळ्या सुव्यवस्थाही पुरवल्या आहेत. इतकंच नाही तर ७० सदस्यांच्या पंचायत समितिमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. शिवाय गावातील प्रत्येक दुसऱ्या मुलीच्या लग्नाचा आणि शिक्षणाचा खर्च संपूर्ण गाव करतं. प्रत्येक गावकरी महिन्याला सरासरी ३०००० रुपये कमावतो आणि सध्या गावातील २३५ कुटुंबांपैकी ६० करोडपती आहेत.

महाराष्ट्र सरकारने या गावाला ‘आदर्श गाव’ म्हणून पुरस्कृतही केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गावाची दखल घेतली आहे. पोपटराव यांच्या या कार्यानंतर अशी आणखीन १०० गावं समृद्ध करण्यासाठी त्यांना एका उपक्रमात सहभागीदेखील करून घेतलं. पोपटराव पवार यांना २०२१ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला होता. गांधीजी म्हणाले होते खेड्याकडे चला, आज पोपटराव यांच्या या कार्यातून खेड्याचं महत्त्व साऱ्या जगाला पटलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या