Muttaqi’s visit and its geopolitical significance: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी भारताला दिलेल्या भेटीनंतर भारत-अफगाणिस्तान यांच्यातील संबंध विशेष चर्चेत आहेत. इतकंच नाहीतर मुत्तकी यांनी भारतात येऊन पाकिस्तानला दिलेल्या इशाऱ्याचीही चर्चा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इतिहासातील एका महत्त्वाच्या प्राचीन परराष्ट्र धोरणाचा घेतलेला हा आढावा, ज्याचा थेट संबंध भारत- अफगाणिस्तानच्या इतिहासाशी आहे.

अफगाणिस्तानही यापासून अलिप्त कसा राहू शकेल?

अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान हे आताचे दोन्ही देश हे एकेकाळी भारताचे भाग होते का, या प्रश्नाचं खरंतर वेगळं उत्तर देण्याची गरज नाही. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार ऐतिहासिक घटनांचा अर्थ लावतो. इतिहास हा काही काल घडलेल्या घटनांचा आढावा नसतो, तर तो अनेक स्थित्यंतरातून गेलेला साक्षीदार आहे. तो आपल्या झोळीत अनेक ज्ञात-अज्ञात घटनांच्या स्मृती सांभाळत चालत राहतो. त्याच्या स्मृतींच्या झोळीत डोकावून पाहताना आपल्या पूर्वग्रहाच्या आवरणाला काही काळ बाजूला सारणच योग्य ठरणारं असतं.

म्हणूनच आजच्या देशांच्या सीमांच्या नियमांप्रमाणे त्या कालखंडातील इतिहास शोधायला गेलं, तर नक्कीच दिशाभूल होऊ शकते. त्यामुळेच सांस्कृतिक नाळेला पकडून मार्गक्रमण करण्यातच खरं शहाणपण आहे. नेपाळ आज स्वतंत्र देश आहे, परंतु त्याचे सांस्कृतिक बंध बरंच काही सांगून जातात. धर्म बदलला तरी तेच तत्त्व पाकिस्तान आणि बांगलादेशलाही लागू आहे. मग, अफगाणिस्तानही यापासून अलिप्त कसा राहू शकेल?

प्राचीन गांधार

भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पर्व म्हणजे सिंधू संस्कृतीचं. या संस्कृतीचा विस्तार आताच्या अफगाणिस्तानपर्यंत होता. त्यामुळे या भागाचा भारताशी असलेला अनुबंध कित्येक हजारो वर्षांचा आहे. आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या भागाचा समावेश गांधार प्रदेशात होत होता, असे संदर्भ वैदिक वाङ्मयात आढळतात. गांधार हे भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक राज्य होते. ते त्यावेळचे लोकप्रिय शैक्षणिक आणि व्यापारी केंद्र होतं. सुप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठ याच प्रदेशात होते. चाणक्य (कौटिल्य), पाणिनी, चरक, विशाखदत्त या विद्वानांनी येथेच शिक्षण घेतले. महाभारतातील शकुनी आणि गांधारी याच प्रदेशातील होते. शिवाय प्राचीन रेशीम मार्गावर असल्यामुळे अलेक्झांडरलाही हाच प्रदेश आपल्या राज्यात हवा होता.

अलेक्झांडर

अलेक्झांडर हा ग्रीसजवळील मॅसेडोनियाचा राजा होता. त्याचे वडील फिलिप दुसरे यांनी ग्रीक राज्यांना एकत्र केलं होतं. अलेक्झांडरने त्यांच्या मृत्यूनंतर इ.स.पू. ३३४ मध्ये पर्शियन साम्राज्यावर आक्रमण सुरू केलं. पर्शियाचा डेरियस तिसरा (Darius III) याला पराभूत केल्यानंतर तो पूर्वेकडील प्रदेश म्हणजे आजचे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान जिंकण्यासाठी निघाला. गांधार हा प्राचीन काळात सांस्कृतिकदृष्ट्या भारताचा महत्त्वाचा भाग होता. तो काबूल नदीच्या खोऱ्यापासून पेशावर आणि टॅक्सिला (तक्षशिला) पर्यंत पसरलेला होता.

वैदिक व बौद्ध प्रभाव

अलेक्झांडरने पर्शियन साम्राज्याचा पराभव केल्यानंतर, अफगाणिस्तानातील अऱाखोसिया (कंदहार), बॅक्ट्रिया (बल्ख) आणि काबूल खोरे या भागांत प्रवेश केला. त्या काळात या भागात अनेक लहान लहान राजे आणि स्थानिक सरदार वेगवेगळ्या भागांवर राज्य करत होते. त्यांच्यावर वैदिक किंवा बौद्ध प्रभाव होता. अलेक्झांडरला कपिसा (आजचं बेग्राम) येथील काही जमातींनी सुरुवातीला विरोध केला. परंतु, त्यांनाही पराभूत व्हावं लागलं. इतर काही स्थानिक राजांनी तह मान्य करून अलेक्झांडरशी मैत्री केली.

गांधारचा तत्कालीन राजा अंभी/अँबस (Ambhi) तक्षशिलावर राज्य करत होता. त्याने अलेक्झांडरशी युद्ध न करता तह केला. अँबसने अलेक्झांडरचं स्वागत केलं, त्याला भेटवस्तू आणि सैन्यसहाय्य दिलं. यामुळे अलेक्झांडरला भारताच्या सीमेत (पंजाबकडे) सहज प्रवेश मिळाला. मात्र सर्वांनीच तह मान्य केला नाही. अस्वक आणि अस्पासियाई नावाच्या स्थानिक जमातींनी शेवटपर्यत लढा दिला. परंतु, शेवटी दुर्दैवाने गांधार प्रदेश पूर्णतः ग्रीक सत्तेच्या अधिपत्त्याखाली गेला.

अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचं विशाल साम्राज्य त्याच्या सेनापतींमध्ये वाटून दिलं गेलं. त्यातील एक सेनापती सेल्यूकस निकेटर याच्या हाती पूर्वेकडील प्रांत म्हणजेच अफगाणिस्तान, इराण, बलुचिस्तान आणि गांधार आले.

सेल्यूकसने इ.स.पू. ३१२ मध्ये आपलं सेल्यूकिड साम्राज्य स्थापन केलं आणि त्याने भारताच्या सीमेकडे लक्ष वळवलं. त्याच कालखंडात चंद्रगुप्त मौर्याने नंद वंशाचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. सेल्यूकसने सिंधू नदी ओलांडून भारताच्या उत्तर-पश्चिम प्रदेशावर पुन्हा दावा सांगण्याचा प्रयत्न केला. परिणामी सेल्यूकस आणि चंद्रगुप्त यांच्यात संघर्ष झाला.

मौर्य साम्राज्य नवीन असलं तरी बलशाली साम्राज्य होतं. त्यामुळे त्यांनी माघार घेतली नाही. शेवटी या संघर्षाचा परिणाम तहात झाला. या तहानुसार सेल्यूकसने गांधार, काबूल, बलुचिस्तान आणि आसपासचे प्रदेश चंद्रगुप्ताला दिले. त्याच्या बदल्यात चंद्रगुप्ताने सेल्यूकसला ५०० युद्धहत्ती दिले आणि सेल्यूकसची कन्या हेलना हिच्याशी विवाह केला. गांधार प्रदेश अलेक्झांडरच्या विजयामुळे प्रथम ग्रीक साम्राज्याच्या ताब्यात गेला आणि अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर तो सेल्यूकस निकेटरच्या अधिकारात आला. पण काही दशकांतच, मुत्सद्देगिरी आणि पराक्रमाच्या बळावर तो पुन्हा भारतीय मौर्य साम्राज्याच्या ताब्यात परत आला.

कराराचे स्वरूप

  • सुरुवातीला दोन्ही सत्तांमध्ये सीमावाद झाला, परंतु मोठ्या युद्धाऐवजी राजनैतिक तह करण्यात आला. तहातील अटी खालीलप्रमाणे होत्या;
    सेल्यूकसने आपल्या साम्राज्याचा पूर्वेकडील भाग म्हणजे आजचा अफगाणिस्तान, बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा काही भाग चंद्रगुप्ताला दिला.
  • त्याच्या बदल्यात चंद्रगुप्ताने सेल्यूकसला ५०० हत्ती दिले.
  • दोन्ही राजघराण्यांमध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले. सेल्यूकसची कन्या हेलना आणि चंद्रगुप्ताचा झाला, असे मानले जाते.

परिणाम आणि महत्त्व

  • या करारामुळे मौर्य साम्राज्याची सीमा अफगाणिस्तानापर्यंत वाढली.
  • चंद्रगुप्ताने पश्चिमेकडील व्यापारीमार्गांवर नियंत्रण मिळवले.
  • दोन्ही साम्राज्यांमध्ये व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि मुत्सद्देगिरी वाढली.
  • ग्रीक राजदूत मेगास्थेनीस याला चंद्रगुप्ताच्या दरबारात पाठवण्यात आले आणि त्याने लिहिलेलं ‘Indica’ हा ग्रंथ आजही त्या काळाच्या इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार ठरतो.
  • चंद्रगुप्त-सेल्यूकस तह हा भारताच्या प्राचीन परराष्ट्र धोरणाचा आरंभ मानला जातो. जिथे युद्धाऐवजी मुत्सद्देगिरी, वैवाहिक संबंध आणि परस्पर फायद्यावर आधारित शांतता प्रस्थापित करण्यात आली.