Afghanistan-Pakistan Border Conflict Durand Line: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाकिस्तानने काबुलवर हवाई हल्ले केल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला आहे. त्यानंतर १२ ऑक्टोबरला तालिबानने पाकिस्तानच्या फ्रंटियर कोअरच्या तळांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले. इतकच नाही तर, तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानला इशारा दिला आहे की,
“If the opposing side again violates Afghanistan’s territorial integrity, our armed forces are fully prepared to defend the nation’s borders and will deliver a strong response”.
(“जर पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या भौगोलिक अखंडतेचे उल्लंघन झाले, तर आमचे सशस्त्र सैन्यदल राष्ट्राच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहे आणि ते चोख प्रत्युत्तर देतील.”)
या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधली ड्युरंड सीमा नक्की काय आहे आणि अशा प्रकारची गुंतागुंतीची सीमारेषा दक्षिण आशियात तयारच कशी झाली हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ड्युरंड सीमा एक भळभळती जखम
खरं पाहता या संघर्षाच्या मुळाशी असणारी ड्युरंड सीमा म्हणजे १०० वर्षांहून अधिक जुनी असणारी भळभळती जखम आहे किंवा ब्रिटीशांच्या कुटील बुद्धीचे आणखी एक जिवंत उदाहरण आहे, असे म्हटले तरी खोटं ठरणार नाही. ब्रिटिश भारतीय उपखंड सोडून गेले खरे, परंतु त्यांनी या भूमीवर मारलेले चरे आजही ताज्या जखमेप्रमाणे रक्त सांडत आहे.

ड्युरंड सीमा म्हणजे काय?
- ड्युरंड सीमा म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधली एक सीमा. पाश्चिमात्य देशांकडून आणि अमेरिकेकडून या सीमेला मान्यता देण्यात आलेली असली तरी ही सीमा नेमकी कुठे आहे हा आजही वादग्रस्त प्रश्न आहे.
- सुमारे २,६४० किलोमीटर (१,६४० मैल) लांब असलेली ही सीमा आग्नेय अफगाणिस्तान आणि वायव्य पाकिस्तानमधून जाते. हा प्रदेश डोंगराळ, कोरडा आहे. या भागात रस्त्यांचे बांधकाम झालेले नाही.
- हा प्रदेश सध्याच्या फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाज (FATA) अर्थात केंद्रीय नियंत्रणाखालील आदिवासी भागांमध्ये मोडतो. या भागात खैबर, बाजौर, मोहम्मद, ओरकझई, कुर्रम, उत्तर वझिरिस्तान आणि दक्षिण वझिरिस्तान अशा सात आदिवासी एजन्सी आहेत. आदिवासी एजन्सी म्हणजे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील, पण स्थानिक आदिवासी पद्धतीने चालणारा अर्ध-स्वायत्त प्रशासकीय प्रदेश.
- याशिवाय या भागात सहा सीमावर्ती प्रदेश (फ्रंटियर रीजन्स) तसेच बन्नू, कोहाट आणि डेरा इस्माईल खान हे जिल्हेही समाविष्ट आहेत. एकूणच या भागावर पिढ्यांपिढ्या स्थानिक जमातींचा प्रभाव आहे. ड्युरंड रेषेमुळे या भागात राहणार्या लोकांवर दूरगामी परिणाम झाले आहेत.
- हेन्री मॉर्टिमर ड्युरंड यांच्या काळात ड्युरंड रेषा आखली गेली. १८८४ ते १८९४ या कालखंडा दरम्यान हेन्री मॉर्टिमर ड्युरंड हे भारतातील ब्रिटिश सरकारचे परराष्ट्र सचिव होते.
- याच कालखंडात ब्रिटिश सरकार आणि रशिया यांच्यात मध्य आशियावर वर्चस्व मिळविण्यासाठी चाललेली स्पर्धा शिगेला पोहोचली होती. याच स्पर्धेला ‘द ग्रेट गेम’ असे म्हटले जाते.
- त्याच काळात ब्रिटिशांनी अफगाणिस्तानच्या सीमांवर आपला प्रभाव वाढवण्यासाठी ड्युरंड यांच्यामार्फत वाटाघाटी सुरू केल्या. त्या वाटाघाटींचेच फलित म्हणजे आजची ड्युरंड रेषा होय.
- ड्युरंड रेषा कशी अस्तित्त्वात आली हे समजून घेण्यासाठी तत्कालीन अफगाणिस्तानमधली राजकीय परिस्थिती जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

तत्कालीन अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थिती
- १८७० च्या दशकाच्या अखेरीस अफगाणिस्तान हे राजकीय अस्थिरता, परकीय दबाव आणि अंतर्गत संघर्ष या भोवर्यात अडकले होते.
- अफगाणिस्तानच्या इतिहासात दोस्त मोहम्मद खान हे महत्त्वाचं नाव आहे. दोस्त मोहम्मद खान याने १८२६ साली दुर्रानी वंशातील (Sadozai) शेवटच्या शासकाला गादीवरून हटवून काबुलवर ताबा मिळवला होता.
- त्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तान एकत्र करून एक केंद्रशासित राज्य निर्माण केले. याच कालखंडात ब्रिटिश भारत आणि रशिया या दोन महासत्तांमध्ये मध्य आशियात प्रभाव वाढवण्याची चढाओढ सुरुवात झाली.
- शेर अली खान हा दोस्त मोहम्मद खान यांचा मुलगा होता. त्याने आपल्या राज्यकाळात अफगाणिस्तान स्वायत्त ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ब्रिटिश भारत आणि रशिया या दोन महासत्तांमध्ये तोल सांभाळावा लागत होता.
- या काळात रशियाने मध्य आशियात आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली. तर दुसर्या बाजूला रशियन सैन्य अफगाणिस्तानमार्गे भारतात शिरकाव करेल, अशी भीती ब्रिटिशांना होती.
- त्यामुळे ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केले आणि ब्रिटिश सैन्य काबुलपर्यंत आत गेले. यावेळी शेर अली खान याला रशियाकडून मदतीची अपेक्षा होती. परंतु, ती मिळाली नाही.
- त्यामुळे तो देश सोडून पळून गेला. कालांतराने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मुलगा याकुब अली खान सिंहासनावर बसला, पण त्याचे शासन दुर्बल होते. त्याने ब्रिटिशांशी गंडामक करार (Treaty of Gundamak, १८७९) केला. या कराराअंतर्गत अफगाणिस्तानचा मोठा भाग ब्रिटिशांच्या प्रभावाखाली गेला आणि ब्रिटिश प्रतिनिधीला (Resident) काबुलमध्ये ठेवण्याची अट मान्य करण्यात आली.

काबुल उठाव
- याच काळात काबुलमध्ये ब्रिटीशांविरोधात उठाव झाला. ब्रिटिश दूतावासावर हल्ला करण्यात आला. यात ब्रिटिश प्रतिनिधी ठार झाला. त्यामुळे ब्रिटिशांनी पुन्हा सैन्य पाठवले आणि देशात पुन्हा एकदा अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत याकुब अली खानला पदत्याग करावा लागला आणि सिंहासन रिकामे झाले.
- त्यावेळी दोस्त मोहम्मद खान यांचा दूसरा नातू अब्दुर रहमान खान हा रशियन साम्राज्यातील समरकंद (आजचे उझबेकिस्तान) येथे निर्वासित म्हणून राहत होता.
- इंग्रज-अफगाण युद्धानंतर (१८७८–१८८०) अफगाणिस्तान पूर्णपणे अस्थिर झाला होता. सिंहासन रिकामे होते. त्यामुळे १८८० मध्ये अब्दुर रहमान खान अफगाणिस्तानात परतला. त्याने स्वतःला सिंहासनाचा योग्य वारसदार म्हणून जाहीर केले. ब्रिटिशांनी स्थैर्यासाठी त्याला अमीर म्हणून मान्यता दिली. अब्दुर रहमान खान याने देशात केंद्रीकृत सत्ता प्रस्थापित केली.
अब्दुर रहमान याचे शासन
- अब्दुर रहमानने ब्रिटिशांच्या मदतीने १८८० साली अमीरपद स्वीकारले. परंतु, काबुलमध्ये ब्रिटिश रहिवासी (British Resident) नेमण्यास ठाम नकार दिला.
- मात्र त्याने १८७९ च्या गंडामक करारातील इतर अटी मान्य केल्या. या करारानुसार खैबर दर्रा, तसेच कुर्रम, पेशीन आणि सिबी या सीमावर्ती जिल्ह्यांवरील नियंत्रण अफगाणांकडून काढून घेण्यात आले.
- हा धक्का थोडा सौम्य वाटावा म्हणून ब्रिटिशांनी अब्दुर रहमानला दरवर्षी ६ लाख रुपये (त्या वेळी सुमारे £६०,०००) अनुदान स्वरूपात मदत मंजूर केले. १८९३ मध्ये ड्युरंड कराराच्या बदल्यात हे अनुदान दुप्पट करण्यात आले.
- १८८८ पर्यंत अब्दुर रहमानने कंदहार आणि हेरात या महत्त्वाच्या प्रांतांवर पुन्हा नियंत्रण मिळवले. हे प्रदेश पूर्वी ब्रिटिश व्हॉइसरॉय लॉर्ड लायटन यांच्या योजनेनुसार अफगाणिस्तानापासून वेगळे करण्यात आले होते, जेणेकरून रशिया किंवा इतर कोणताही शत्रू देश सहजपणे अफगाणिस्तानवर कब्जा करू शकणार नाही.

ड्युरंड करार आणि पख्तून प्रश्न
- १८८५ साली रशियन सैन्याने अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील पंजदेह या सीमावर्ती गावावर हल्ला केला होता. या घटनेमुळे युद्धाचा धोका निर्माण झालेला असला, तरी राजनैतिक प्रयत्नांमुळे परिस्थिती ताणली गेली नव्हती. मात्र, अफगाणिस्तान आणि ब्रिटिश भारताच्या वायव्य सीमेबाबतचा वाद मात्र कायम राहिला.
- १८९३ साली अफगाणिस्तानचे अमीर अब्दुर रहमान खान याने त्या वेळचे भारताचे व्हाइसरॉय असलेल्या लॅन्सडाउन यांना एक प्रस्ताव दिला. या प्रस्तावात, काबुलमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची बैठक (परिषद) घेऊन अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील स्पष्ट सीमा ठरवावी, असे सूचित करण्यात आले होते.
या वाटाघाटींसाठी हेन्री मॉर्टिमर ड्युरंड यांना काबुलला पाठवण्यात आले.
- अमेरिकन इतिहासकार हेरॉल्ड ई. रॉफ जूनियर यांनी त्यांच्या Afghanistan at War (२०१७) या पुस्तकात लिहिले आहे की, व्हाइसरॉय लॅन्सडाउन यांनी अब्दुर रहमान खान याचे वर्णन “कठोर आणि फारच संशयी स्वभावाचा म्हातारा शासक” असे केले होते.
- वाटाघाटी मात्र लवकरच पूर्ण झाल्या. कारण ड्युरंड यांनी अमीरला दरवर्षी मिळणाऱ्या अनुदानात £३,००,००० ची वाढ देण्याचे आश्वासन दिले होते.
- १२ नोव्हेंबर १८९३ रोजी, अमीर अब्दुर रहमान यांनी करारावर स्वाक्षरी केली आणि शिक्का मारला.
- या करारानुसार त्यांनी हिंदू कुश पर्वतरांगेपासून ते बलुचिस्तानच्या पश्चिम टोकापर्यंतच्या भूभागावर असलेला आपला सर्व हक्क सोडला.
- या प्रदेशात बाजौर, दिर, स्वात, बुनर, तिराह, कुर्रम खोरे आणि वझिरिस्तान या भागांचा समावेश होता. या करारानंतर, त्या भागातील सीमावर्ती जमातींना ‘ब्रिटिश संरक्षित नागरिक’ असा कायदेशीर दर्जा देण्यात आला.
- हा भाग मूलतः पख्तून लोकांच्या वस्तीचा आहे. या रेषेने पख्तून समुदायाला दोन भागात विभागले. सीमेच्या दोन्ही बाजूंवरील जमाती आपसात विवाह करतात, व्यापार करतात आणि त्यांची संस्कृती आणि परंपरा समान आहेत.
- अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत एकूण किमान ३५ दशलक्ष (३.५ कोटी) पश्तून राहतात असा संदर्भ द ड्युरंड लाइन (२०१०) या पुस्तकात सतींदर कुमार लांबा यांनी दिला आहे. अफगाणिस्तानमध्ये पश्तून लोकसंख्या सुमारे ४२% असून हा देशातील सर्वात मोठा समुदाय आहे. तर पाकिस्तानमध्ये पश्तून लोकसंख्या सुमारे १५% आहे. हा पाकिस्तानमधील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय आहे.
- दक्षिण आशियातील इतर सीमांपेक्षा ड्युरंड रेषा वेगळी होती. ही एक वसाहतकालीन (colonial) सीमा होती. या रेषेमुळे पश्तून आणि बलूच प्रदेश दोन भागांत विभागले गेले आणि स्थानिक जमातींच्या नैसर्गिक एकतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. या कराराद्वारे ब्रिटिश आणि रशियन प्रभावक्षेत्रांदरम्यान एक ‘बफर झोन’ तयार केला गेला. पण त्याचवेळी सामाजिक आणि राजकीय भूभाग कृत्रिमपणे तोडण्यात आला.
पाकिस्तानची निर्मिती आणि अफगाणिस्तानचा विरोध
- १९४७ साली पाकिस्तान तयार झाल्यानंतर अफगाणिस्तानने एक मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, “पाकिस्तानात राहणाऱ्या पश्तून लोकांना हवे असल्यास त्यांना अफगाणिस्तानमध्ये सामील होण्याचा अधिकार मिळायला हवा.”
- इतिहासकार डेव्हिड हार्म्स होल्ट यांच्या मते, जर ही मागणी मान्य झाली असती, तर अफगाणिस्तानची सीमा आताच्या पाकिस्तानात पुढे सरकली असती. पण ही मागणी ब्रिटन आणि पाकिस्तान दोघांनीही नाकारली. यानंतर अफगाणिस्तानने ड्युरंड रेषेला अधिकृत सीमा मानण्यास नकार दिला.
- त्यांनी ड्युरंड रेषा आणि सिंधू नदीदरम्यानचा पश्तूनबहुल प्रदेश आपला आहे, असा दावा करायला सुरुवात केली. यामुळे १९५० आणि १९६० च्या दशकात दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले गेले आणि या भागात राजकीय अस्थिरता आणि संघर्ष वाढला.
- १९५० च्या दशकात शीतयुद्ध सुरू असताना, अमेरिका आणि पाकिस्तान यांनी शस्त्रास्त्र पुरवठ्याचा करार केला. यामुळे पाकिस्तानला अमेरिकेचे पाठबळ मिळाले आणि अफगाणिस्तानची स्थिती दुर्बल झाली. अफगाणिस्ताननेही अमेरिकेकडे मदतीची विनंती केली. पण अमेरिकेने अट ठेवली की, “अफगाणिस्तानने आधी पाकिस्तानशी आपले संबंध सुधारावेत आणि मग सोव्हिएत संघाला रोखण्यासाठी तयार केलेल्या ‘सेंटो’ (CENTO) नावाच्या संघटनेत सामील व्हावे.” अफगाणिस्तानला ही अट मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी १९५३ साली थेट सोव्हिएत संघाकडे (रशियाकडे) मदत मागितली.
इतिहासकार डेव्हिड हार्म्स होल्ट लिहितात,
“या निर्णयामुळे जग एकीकडे सोव्हिएत संघाच्या मदतीने उभे राहिलेले अफगाणिस्तान आणि दुसरीकडे अमेरिकेच्या पाठिंब्यावर असलेले पाकिस्तान अशा दोन गटांत विभागले गेले.”
आजचे तणाव आणि पश्तूनिस्तानचा प्रश्न
- आजही पश्तून समाजात मतभेद कायम आहेत. काहींना अजूनही स्वतंत्र पश्तूनिस्तान नावाचे स्वतंत्र राष्ट्र हवे आहे, तर काहींना त्यांच्या पूर्वजांनी पाकिस्तानला दिलेला प्रदेश पुन्हा अफगाणिस्तानात विलीन व्हावा असे वाटते.
- अफगाणिस्तानचे सध्याचे सरकार ड्युरंड रेषेला पाकिस्तानबरोबरची अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मानत नाही.
- २०१७ साली पाकिस्तानने या सीमारेषेवर कुंपण बांधायला सुरुवात केली. २०२३ पर्यंत सुमारे ९८% काम पूर्ण झाल्याचे सांगितले गेले. या कुंपणामुळे सीमेजवळ राहणाऱ्या लोकांचे दैनंदिन जीवन, रोजगार आणि नातेसंबंध उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक कुटुंबे आपल्या नातेवाईकांपासून वेगळी पडली आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान आणि स्थानिक पश्तून लोकांना हे कुंपण असंतोष वाढवणारे आणि अनावश्यक वाटते.
शेवटी, ब्रिटिशांनी ड्युरंड रेषेच्या नावाखाली अफगाणिस्तानचा भूभाग वेगळा केला आणि पाकिस्तानने त्या रेषेला आपली सीमा म्हणून स्वीकारून तो भाग कायमस्वरूपी ठेवला.