Soldier body found after 43 years इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी रविवारी (११ मे) महत्त्वाची माहिती दिली. इस्रायलच्या सैन्याला तब्बल ४३ वर्षांनंतर बेपत्ता मृतदेह शोधण्यात यश आले आहे. रविवारी इस्रायली सैन्याने (आयडीएफ) सांगितले की, बेपत्ता सैनिकाचा मृतदेह सीरियाच्या मध्यभागी सापडला. लष्कर आणि मोसाद या गुप्तचर संस्था यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या एका विशेष ऑपरेशनमध्ये हे यश मिळाले आहे. लष्कराने एका निवेदनात म्हटले, “आयडीएफ आणि मोसाद यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष ऑपरेशनमध्ये सार्जंट फर्स्ट क्लास त्झविका फेल्डमनचा मृतदेह सीरियाच्या मध्यभागी सापडला आणि तो मृतदेह इस्रायलमध्ये परत आणण्यात आला,” असे वृत्त ‘एएफपी’ने दिले आहे. ४३ वर्षांनंतर सैनिकाचा मृतदेह कसा सापडला? नेमके प्रकरण काय?
सैनिक बेपत्ता कसा झाला?
१९८२ मध्ये सीरियाच्या सीमेजवळील पूर्व लेबनॉनच्या बेका प्रदेशात इस्रायली आणि सीरियन सैन्य एकमेकांविरोधात भिडले होते. त्या घटनेला सुलतान याकूबची लढाई म्हणूनही ओळखले जाते. ही लढाई लेबनॉन युद्धाचा एक भाग होती. युद्धादरम्यान बेका व्हॅलीजवळील एका खिंडीवर इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या (आयडीएफ) बख्तरबंद वाहनांच्या एका ताफ्यावर सीरियन लोकांनी हल्ला केला. या हल्ल्याला इस्रायली गुप्तचराचे अपयश मानले गेले.

सुलतान याकूबच्या लढाईत फेल्डमन यांच्यासह इतर दोन सैनिक बेपत्ता झाले होते. इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, त्झविका फेल्डमनचा मृतदेह जीनोमिक आयडेंटिफिकेशन सेंटर फॉर फॉलन सोल्जर्स ऑफ द मिलिटरी रब्बीनेटने ओळखला होता. परंतु, सैन्याच्या निवेदनात त्यांचे अवशेष सीरियाच्या आत कसे आले, याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध होती.
त्झविका फेल्डमन कोण होते?
त्झविका फेल्डमन हे इस्रायली सैन्यात एक टँक सैनिक होते. फेल्डमन हे युद्धादरम्यान सार्जंट फर्स्ट क्लास येहुदा काट्झ आणि सार्जंट फर्स्ट क्लास झाचेरी बौमेल यांच्याबरोबर बेपत्ता झाले होते. लेबनॉनच्या बेका व्हॅलीमध्ये इस्रायली संरक्षण दल (आयडीएफ) आणि सीरियन सैन्य यांच्यात ही चकमक झाली होती. या लढाईत तब्बल २१ इस्रायली सैनिक मारले गेले होते आणि ३० हून अधिक जण जखमी झाले होते. ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, २०१९ मध्ये मृतांपैकी एक असणारे झाचेरी बौमेल यांचे अवशेष सापडले आणि ते इस्रायलला परत आणण्यात आले.
“सार्जंट फेल्डमन यांचा मृतदेह परत आणणे एका गुप्त आणि कठीण ऑपरेशनद्वारे शक्य झाले. या ऑपरेशनमध्ये अचूक बुद्धिमत्ता, चातुर्य व धैर्य दाखविणाऱ्या ऑपरेशनल क्षमतांचा वापर करण्यात आला,” असे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी फेल्डमनचा मृतदेह शोधण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, त्यांचा आणि त्यांच्या साथीदारांचा म्हणजेच झकारिया बाउमेल व येहुदा काट्झ यांचा शोध अनेक दशकांपासून सुरू होता.
इस्रायली मंत्रिमंडळाने संपूर्ण गाझा ताब्यात घेण्याच्या योजनेला दिली मान्यता
५ मे २०२५ रोजी इस्रायली मंत्रिमंडळाने संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याच्या आणि अनिश्चित काळासाठी त्या प्रदेशात राहण्यास मान्यता दिली, असे वृत्त अधिकाऱ्यांच्या माहितीने ‘असोसिएटेड प्रेस’ने दिले आहे. इस्रायलच्या मते, नवीन योजना देशाला पॅलेस्टिनी प्रदेशात मोठ्या प्रमाणात कारवाया वाढविण्यास मदत करील.
या ऑपरेशनविषयी मोसाद (इस्रायलची एक गुप्तचर संस्था) आणि आयडीएफमधील संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, अवशेष शोधण्याचे ऑपरेशन बिगर-इस्रायली मोसाद एजंट्सनी केले होते. मोसादच्या गटाने इस्रायली सीमेपासून काही सीरियामध्ये काम केले आणि त्यांचे जीव धोक्यात घालून हा मृतदेह मिळवला. मोसादच्या वतीने काम करणाऱ्या एजंट्सची एक कव्हर स्टोरी होती आणि ते अनेक वर्षांपासून सीरियामध्ये होते. बशर अल-असद राजवटीच्या पतनानंतर गेल्या पाच महिन्यांत या प्रकरणात यश मिळेल, अशी आशा दिसून आली आणि फेल्डमनचे अवशेष मिळवण्याची संधी मिळाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पथकाने मोहिमेदरम्यान गोळीबार होत असतानादेखील काम केले. कारण- त्यांनी अनेक वेळा स्मशानभूमीला भेट दिली आणि ओळख पटविण्यासाठी इस्रायलला पाठविण्यासाठी विविध अवशेष मिळवले. अखेर अवशेष फेल्डमन यांच्या डीएनएशी जुळले आणि मृतदेहाचा शोध लागला. फेल्डमन यांचे अवशेष गुंतागुंतीच्या स्थितीत होते आणि सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ओळख पटविण्यासाठी त्यांना इस्रायलला आणण्यात आले होते.
ओळख प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवारी सकाळी फेल्डमन यांच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली. लष्कराने सांगितले की, मृतदेह शोधण्याचे प्रयत्न अनेक दशकांपासून सुरू होते. मुख्य म्हणजे ११ मे २०२५ रोजी आयडीएफने १९८२ मध्ये बेपत्ता झालेल्या सार्जंट फर्स्ट क्लास झ्वी फेल्डमन यांचे अवशेष असलेली शवपेटी सैन्याने वाहून नेल्याचे एक छायाचित्र पोस्ट केले, तेव्हादेखील या विषयाची चर्चा झाली होती.