Air India plane crash: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या अपघातात २७४ जणांचा बळी गेला. त्यानंतर टाटा समूहाकडून मृतांच्या नातेवाईकांना एक कोटी आणि जखमींना सर्व वैद्यकीय खर्च देण्याचं आश्वासन देण्यात आलं. दरम्यान, या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई कशी द्यावी याचा निर्णय मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
मॉन्ट्रियल कन्व्हेन्शननुसार, एअरलाईन्स जबाबदार असताना नुकसान भरपाई निश्चित केली जाते आणि लागू केली जाते. १२ जून रोजी एअर इंडियाचे लंडनला जाणारे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर अहमदाबादमध्ये उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले आणि मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर आदळले. एअर इंडिया कंपनीची मालकी असलेल्या टाटा समूहाने मृतांच्या कुटुंबीयांना आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला एक कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली असली, तरी अंतिम रक्कम मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन करारावर अवलंबून असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन म्हणजे काय?
मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन हा विमान अपघातात मृत आणि जखमी झालेल्यांना भरपाई देण्याचे नियमन करणारा आंतरराष्ट्रीय कायदा आहे. या अंतर्गत कोणत्याही प्रवाशाच्या मृत्यू किंवा दुखापतीसाठी विमान कंपनीला एक लाख २८ हजार ८२१ रुपयांपर्यंत स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR)ची भरपाई द्यावी लागते. ऑक्टोबर २०२४ पर्यंत १ एसडीआरचे मूल्य १.३३ डॉलर (सुमारे १११ रुपये) होते. याचा अर्थ प्रत्येक प्रवाशामागे १.४३ कोटी रुपयांपर्यंतची भरपाई (Insurance claim in Ahmedabad plane crash) मागता येईल. शिवाय विमान कंपनीचा निष्काळजीपणा सिद्ध झाला तर आणखी भरपाई मिळू शकते. मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन किंवा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी काही नियमांचे एकीकरण करण्यासाठीचे कन्व्हेन्शन हे ८ मे १९९९ रोजी कॅनडातील मॉन्ट्रियल इथे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) सदस्य राष्ट्रांनी स्वीकारलेला बहुपक्षीय करार आहे. भारत २००९ मध्ये ९१ वा सदस्य म्हणून या करारात सामील झाला.
प्रत्येक प्रवाशाच्या बाबतीत नुकसान भरपाई वेगवेगळी असू शकते. मृत व्यक्तीचे वय, नोकरी, उत्पन्न, कौटुंबिक परिस्थिती आणि अवलंबून असलेल्यांची संख्या या सर्व गोष्टींनुसार भरपाईची रक्कम ठरवली जाते.
नुकसान भरपाई कोणत्या कारणांसाठी
- प्रवासादरम्यान प्रवाशांचा मृत्यू किंवा दुखापत
- सामानाचे नुकसान
- प्रवासासाठी विलंब होऊन गंभीर नुकसान
- स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR)ची भरपाई
मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन प्रवाशांना कशी मदत करते?
मॉन्ट्रियल कन्व्हेन्शननुसार, जेव्हा एअरलाइन कंपनी नुकसानासाठी जबाबदार असते, तेव्हा भरपाई निश्चित केली जाते आणि लागू केली जाते. डिसेंबर २०२४ पर्यंत, प्रवाशाच्या मृत्यू किंवा शारीरिक दुखापतीच्या बाबतीत ते अंदाजे दोन लाख ११ हजार डॉलर्स एवढी रक्कम निश्चित करण्यात आली होती. करारात प्रवाशांच्या वाहतुकीत विलंब झाल्यामुळे झालेल्या नुकसानाच्या बाबतीत प्रत्येक प्रवाशाला सुमारे आठ हजार ७७८ डॉलर्सदेखील निर्दिष्ट केले आहेत. सामानाचं नुकसान, तोटा किंवा विलंब यासाठी प्रति प्रवासी मर्यादा सुमारे दोन हजार ११५ डॉलर्स आहे. कार्गोच्या बाबतीत ही मर्यादा प्रति किलोग्रॅम सुमारे ३६.२१ डॉलर्सपर्यंत वाढवली आहे.
प्रवाशांना दुखापत किंवा मृत्यू (अनुच्छेद १७) : एक लाख २८ हजार ८२१ एसडीआर (विशेष आहरण अधिकार) पर्यंत भरपाई
विलंब (अनुच्छेद १९) : विलंब रोखण्यासाठी सर्व वाजवी उपाययोजना केल्याशिवाय विमान कंपन्या विलंबामुळे झालेल्या नुकसानासाठी जबाबदार आहेत. करारानुसार वाहतुकीत विलंब झाल्यामुळे झालेल्या नुकसानाच्या बाबतीत प्रत्येक प्रवाशाला सुमारे ८,७७८ डॉलर्स म्हणजे सात लाख ५५ हजार ४८३ इतकी रक्कम निश्चित केली आहे.
सामान (अनुच्छेद १७ आणि २२) : हरवलेल्या किंवा खराब झालेल्या चेक केलेल्या सामानाची जबाबदारी १,२८८ एसडीआर (२,११५ अमेरिकन डॉलर्स) किंवा १,८२,०५४ रुपये आहे. चुकीशिवाय चेक न केलेल्या (कॅरी-ऑन) सामानाची जबाबदारी कंपनीची नाही.
या करारामध्ये सहभागी असलेल्या सर्व देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे असलेली भारत आणि युके दोन्हीही या कराराचे सदस्य आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने १३ जून रोजी अपघातानंतर कारवाई करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली. त्या दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला १५ जून २०२५ पासून त्यांच्या सर्व बोईंग ७८७-८/९ विमानांच्या ताफ्याची अधिक तपासणी करण्याचे आदेश दिले. या समितीने अपघाताच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सध्या अस्तित्वात असलेल्या मानक कार्यप्रणाली (SOPs) आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे मूल्यांकन करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती.

१४ जून रोजी संध्याकाळी एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले की, कंपनी मृतांच्या कुटुंबीयांना आणि वाचलेल्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची अंतरिम भरपाई देईल. याशिवाय टाटा समूहाने आधीच जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांची मदतही दिली जाईल. “तात्काळ आर्थिक मदत देण्यासाठी, एअर इंडिया मृतांच्या कुटुंबीयांना आणि वाचलेल्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये देईल. हे टाटा समूहाने आधीच दिलेल्या एक कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त आहे,” असे विल्सन म्हणाले. तसंच ही भरपाई एअर इंडियाच्या कव्हरेजवर अवलंबून असेल असेही त्यांनी सांगितले.
मॉन्ट्रियल कन्व्हेन्शननुसार, एअरलाइनकडून अंतरिम भरपाईची घोषणा केली जाऊ शकते, मात्र प्रवाशांसाठी अंतिम भरपाई १९९९ च्या मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन अंतर्गत निश्चित केली जाईल, असे ब्रोकरेज फर्म हॉडेन (इंडिया) चे एमडी आणि सीईओ अमित अग्रवाल यांनी सांगितले. “भरपाईची गणना स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) वापरून केली जाते, जी ऑक्टोबर २०२४ पर्यंत एक लाख २८ हजार ८२१ एसडीआर होती. प्रत्यक्ष भरपाई एअर इंडियाने खरेदी केलेल्या कव्हरेजवर अवलंबून असेल,” असे अग्रवाल यांनी पीटीआयला सांगितले.