हृषिकेश देशपांडे

गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेले नाट्य शरद पवार यांच्या घोषणेनंतर थांबले. पवार यांनी अचानक पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होती. प्रमुख नेतेही भांबावले होते. शरद पवार यांचे पुतणे व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच फक्त निर्णयाला पाठिंबा दिला होता. आता पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याने अजित पवार काय करणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यांनीही पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले असले, तरी अजितदादा गेले काही दिवस अस्वस्थ असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून जाणवते. शरद पवार यांच्या निर्णयाने पक्षावरही त्यांची मांड अधिक घट्ट झाली आहे. पक्षात वेगळा काही विचार करू पाहणाऱ्यांना फारसे पाठीराखे नाहीत हेच या चार ते पाच दिवसांच्या घडामोडींतून स्पष्ट झाले.

अजित पवार अस्वस्थ?

‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या आत्मकथनाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी पवार यांनी एकाएकी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. ८२ वर्षीय शरद पवार गेली जवळपास पाच दशके राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. सत्तेत नसले तरी पवार यांचे महत्त्व अबाधित आहे. सहकारधुरीणांचा एक मोठा गट त्यांच्या पाठीशी नेहमी आहे. पवार यांच्या राजीनाम्यावर अपेक्षेप्रमाणे देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीही पवार यांना पदावर कायम राहण्यासाठी आर्जव केले. वयपरत्वे नव्या नेत्याला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी नमूद केले. अजित पवार यांनीच फक्त आपल्या काकांना पाठिंबा दिला. बाकी सारे नेते शरद पवार यांनीच नेतृत्व करावे या मताचे होते. ६३ वर्षीय अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते समजले जातात. पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे असे मानले जाते. मात्र गेल्या पाच दिवसांतील घडामोडींचा पट पाहिला तर मोजके आमदार वगळता इतरांनी फारसा पाठिंबा अजित पवार यांना दिलेला नाही. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याने तर उघडपणे आपले मत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात टाकले. याखेरीज इतर नेत्यांनी शरद पवार यांनाच ठाम पाठिंबा दिला. यातून अजितदादांच्या जवळचे अस्वस्थ असणार. रोखठोक स्वभाव, तातडीने कार्यकर्त्यांचे काम मार्गी लावण्याची धडाडी असा दादांचा लौकिक. त्यामुळे त्यांना मानणारेही मोठ्या संख्येने आहेत. मात्र अलीकडचे काही प्रसंग पाहता त्यांना पक्षात पाठिंबा कमी होत आहे काय, अशी शंका येते.

पुन्हा हिरमोड…

२००४मध्ये मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिल्याची सल अजूनही अजित पवार यांना आहे. त्यावेळी राष्ट्रवादी जादा जागा मिळुनही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्यात आले. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अजित पवार यांचा शपथविधी अजूनही चर्चेत आहे. त्यावेळी त्यांना कोणाचा पाठिंबा होता हा अजूनही औत्सुक्याचा विषय आहे. या शपथविधी वेळी राष्ट्रवादीतून दोन ते तीन आमदार वगळता इतर आमदार पुन्हा पक्षाकडे परतले. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा लगेच द्यावा लागला. आताही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी अजित पवार यांचे अध्यक्षपदासाठी फारसे समर्थन केले नाही. त्यामुळे या नेत्यांना अजितदादांच्या नेतृत्वात अस्वस्थ वाटते काय, हा कळीचा मुद्दा आहे. पक्षात नवे नेतृत्व आकाराला आले तर काय हरकत आहे अशी भावना अजित पवार यांनी उघडपणे बोलून दाखवली. शरद पवार यांनी खुद्द पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरात नेतृत्वबदलाचे सूतोवाच केले होते. मात्र आता या साऱ्या घडामोडींनंतर पुन्हा शरद पवार हेच पदावर राहणार असले तरी कार्यकारी अध्यक्ष किंवा तत्सम एखादे पद निर्माण होणार काय ते पाहावे लागणार आहे. हे पद कुणाकडे सोपवणार? विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांना कोणती जबाबदारी मिळणार काय? याची उत्तरे मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

दादा काय करणार?

अजित पवार भाजपबरोबर जातील अशी अलीकडे सातत्याने चर्चा सुरू असते. अजित पवार यांनी त्याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे. मात्र चर्चा थांबत नाही, कारण अप्रत्यक्षपणे अजित पवारच त्याला वर्तनातून खाद्य पुरवतात. आताही पवार यांच्या या घोषणेबाबतच्या पत्रकार परिषदेला ते अनुपस्थित होते. त्याला खुलासे काहीही असू देत, गैरहजेरीची चर्चा होणारच. आता शरद पवार तसेच अजित पवार हे दोघेही राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दादांना दौऱ्यात किती पाठिंबा मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या चार ते पाच दिवसांतील राजकीय घटनांमधून पक्षातील कोण नेता कोणाच्या पाठीशी आहे हे उघड झाले आहे. पक्षात व्यापक पाठिंबा असल्यासच इतर पक्ष दादांकडे आकर्षित होतील. हा नेता आपल्याबरोबर हवा अशी भावना दृढ होईल. त्यासाठी दादांना नेतृत्व व्यापक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.