Baltimore Bridge Collapse मंगळवारी (२७ मार्च) अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात मोठी दुर्घटना घडली. पॅटापस्को नदीवरील फ्रान्सिस स्कॉट की पूल एका जहाजाच्या धडकेने कोसळला. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ माध्यमांवर व्हायरल झाले. या व्हिडीओंमध्ये पूल कोसळल्यावर अनेक वाहने नदीत पडल्याचे स्पष्ट दिसते. दुर्घटनेत नेमके काय घडले? दुर्घटनेतील मृत्युमुखींची नेमकी संख्या किती? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

नेमके काय घडले?

मंगळवारी पहाटे सिंगापूरचा ध्वज असलेले ‘डाली’ हे कंटेनर जहाज बाल्टीमोरमधील फ्रान्सिस स्कॉट की पुलाला आधार देणाऱ्या काँक्रीटच्या एका खांबावर धडकले. ‘द असोसिएटेड प्रेस’ (एपी)च्या वृत्तानुसार काही सेकंदांतच संपूर्ण पूल नदीत कोसळला. पुलावरील अनेक वाहने ५० फूट खाली थंड पाण्यात पडल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
Vladimir putin and joe biden
जगात पुन्हा अमेरिका वि. रशिया? युक्रेनच्या मदतीला यूएसचा शस्त्रसाठा; चीन-इराण रशियाला मदत करत असल्याचा दावा!
due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती

पूल तुटून वाहने गोठलेल्या नदीच्या पाण्यात बुडाली, असे वृत्त ‘ईस्टर्न टाइम (ईटी)’ने दुपारी १.३० च्या सुमारास दिले होते. या दुर्घटनेची मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले होते. पूल पाण्यात कसा कोसळला, हे स्पष्ट व्हिडीओमध्ये दिसत आहे. जहाजाचे दिवे एकदा चमकले आणि नंतर जहाज पुलावर आदळले, असे ‘सीएनएन’ने दिलेल्या विश्लेषणात नमूद केले आहे.

दुर्घटनेतील मृत्युमुखींची नेमकी संख्या किती?

सध्या सात लोकांचा शोध सुरू आहे; परंतु बेपत्ता व्यक्तींची संख्या वाढू शकते. बाल्टिमोरच्या अग्निशमन प्रमुखांनी सांगितले आहे. काही वृत्तांनुसार २० लोक पाण्यात पडले असावेत. आतापर्यंत पाण्यातून दोघांना वाचविण्यात यश आले आहे. त्यातील एक व्यक्ती पूर्णपणे सुखरूप असून, दुसरी गंभीर जखमी आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही बाल्टिमोर अग्निशमन विभागाचे प्रमुख जेम्स वॉलेस यांनी सांगितले.

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरचे प्रवक्ते मायकेल श्वार्ट्झबर्ग यांनी ‘सीएनएनला’ सांगितले, “युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरमधील आर ॲडम्स काउली शॉक ट्रॉमा सेंटरमध्ये या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.” पूल कोसळण्याच्या काही सेकंद आधीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुलावर अनेक वाहनांचे दिवे दिसून आले आहेत. त्यावेळी काही कंत्राटदार पुलावर कामही करीत होते, असे मेरीलँडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बोटी, विमाने, पाणबुडे आणि अत्याधुनिक सोनार आणि इन्फ्रारेड उपकरणांचा मदतीने बचावकार्य सुरू आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

अग्निशमन विभागाचे प्रमुख वॉलेस म्हणाले की, पाण्यात बुडालेली वाहने सापडली आहेत. परंतु, या वाहनांची संख्या किती याची माहिती अद्याप त्यांनी दिलेली नाही. बाल्टिमोरमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, किमान सात वाहने पाण्यात पडली. डाली सिनर्जी मरीन ग्रुपच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, जहाजावरील दोन चालकांसह सर्व कर्मचारी सुखरूप आहेत. पुलावर काम करणार्‍या बांधकाम कर्मचार्‍यांपैकी सहा कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यांना शोधण्यासाठी मोठ्या पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

बचावकार्याला वेग

बोटी, विमाने, पाणबुडे आणि अत्याधुनिक सोनार आणि इन्फ्रारेड उपकरणांचा मदतीने बचावकार्य सुरू आहे. अधिकारी सोनार, इन्फ्रारेड उपकरणे व ड्रोन यांचा वापर करून बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत, असे वॉलेस म्हणाले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नदीतील पाण्याचे तापमान लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. पूल कोसळल्याच्या ठिकाणाजवळील बाल्टिमोर हार्बरमधील पाण्याचे तापमान सध्या ४६ ते ४८ अंश फॅरेनहाइट (७.८ ते ८.९ अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले आहे. त्यात बुडालेल्या लोकांसाठी हे तापमान धोकादायक आहे. अचानक एखादे संकट आल्यास त्याचा तुमच्या शरीर आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो, असे नॅशनल वेदर सर्व्हिसच्या वेबसाइटवर सांगण्यात आले आहे, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. सकाळी बचावकार्याने वेग धरला आहे. पाणी अतिशय थंड असल्याने बचावकर्त्यांना अडचण निर्माण होऊ शकते, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.

अपघात कशामुळे झाला?

‘एपी’च्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत दहशतवादाची शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये धडक देण्यापूर्वी जहाजावरील लाईट बंद पडले. त्यामुळे जहाजात काही तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप नेमके कारण समोर आलेले नाही, असे वृत्त ‘एपी’ने दिले आहे. यूएस होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी अलेजांद्रो मेयोरकास यांनी मंगळवारी सांगितले, “धडक ही हेतुपुरस्सर कृती असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. बाल्टीमोरमधील फ्रान्सिस स्कॉट की पुलाला कंटेनरच्या जहाजाने धडक दिल्याने उदभवलेल्या परिस्थितीचे आम्ही बारकाईने निरीक्षण करीत आहोत. आम्ही बेपत्ता आणि जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांसोबत आहोत.” सायबर सिक्युरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी (सीआयएसए) या सरकारी एजन्सीने हे स्पष्ट केले की, जहाजाने नियंत्रण गमावले आणि पुलाच्या खांबाला धडक दिली, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले.

या दुर्घटनेत दहशतवादाची शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

मेरीलँडचे गव्हर्नर मूर म्हणाले की, जहाज पुलाच्या दिशेने अत्यंत वेगाने जात होते. जहाजातील सदस्यांनी सिग्नलही दिला. परंतु, जहाजाचा वेग जास्त असल्याने ही दुर्घटना टाळता आली नाही. ते पुढे म्हणाले, “सिग्नलमुळे काही वाहनांना सतर्कतेचा इशारा मिळाला; ज्यामुळे त्यांनी पूल ओलांडणे टाळले आणि मोठा अनर्थ टळला. या सावध झालेल्या लोकांमुळे काल रात्री अनेकांचा जीव वाचवला.” काही तज्ज्ञांनी सांगितले की, पुलाच्या मुख्य सपोर्ट स्ट्रक्चर्सला एवढ्या मोठ्या जहाजाची टक्कर सहन करण्यासाठी सक्षम केले गेले नसावे.”

‘डाली’ जहाज कोणाच्या मालकीचे?

डॅनिश कंपनीच्या वेबसाइटने सांगितले की, डाली जहाज श्रीलंकेच्या दिशेने जात होते. श्रीलंकेतील मायर्स्क कंपनीला जहाजावरील समान पोहोचवायचे होते. या जहाजावर सिंगापूरचा ध्वज फडकत होता. या जहाजाचे नोंदणीकृत मालक ग्रेस ओशन पीटीई लिमिटेड आणि सिनर्जी मरीन ग्रुप व्यवस्थापक आहेत. हे जहाज ९४८ फूट (२८९ मीटर) लांब आहे, असे ‘रॉयटर्स’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. २०१६ मध्ये बेल्जियममधील अँटवर्प बंदरातही या डाली जहाजाचा अपघात झाला होता, असे अधिकाऱ्यांनी ‘एपी’ला सांगितले.

हेही वाचा : Moscow Terror Attack: दहशतवादी हल्ल्यातील चार संशयितांना अटक; हल्लेखोरांचा हेतू काय होता?

फ्रान्सिस स्कॉट की पूलाचा इतिहास

फ्रान्सिस स्कॉट की पूल नदीपासून १८५ फूट उंचीवर होता. १९७७ साली पॅटापस्को नदी ओलांडण्यासाठी हा पूल तयार करण्यात आला होता. याच ठिकाणी फ्रान्सिस स्कॉट की यांनी १८१४ साली बाल्टिमोरच्या लढाईत ब्रिटिशांचा पराभव आणि फोर्ट मॅकहेन्रीवरील ब्रिटिश बॉम्ब पाहिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रगीत ‘स्टार स्पॅन्ग्ल्ड बॅनर’ लिहिले, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. मेरीलँड ट्रान्स्पोर्टेशन अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार, हा पूल बाल्टिमोरच्या आय-६९५ महामार्गाला जोडलेला होता आणि त्यावरून वर्षाला ११.३ दशलक्ष वाहने जात; ज्याला बाल्टिमोर बेल्टवेदेखील म्हणतात.