Balochistan Liberation Army Terrorist Organization अमेरिकेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि तिची सशस्त्र शाखा असलेल्या ‘माजीद ब्रिगेड’चा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या यादीत केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा पाकिस्तानला सर्वाधिक फायदा होणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान दहशतवादाचा सूत्रधार नसून, स्वतःच त्याचा बळी आहे, हा इस्लामाबादचा दावा अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहेत. महिनाभरात असीम मुनीर यांना दोनदा अमेरिकेत आमंत्रित केल्यानंतर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी (११ ऑगस्ट) बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि तिच्या ‘माजीद ब्रिगेड’ या गटाचा समावेश ‘परदेशी दहशतवादी संघटनां’च्या (FTO) यादीत केला आहे. पाकिस्तानला अमेरिकेच्या या कृतीचा मोठाच फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार आहे.

माजीद ब्रिगेडचाही समावेश

” बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि तिची शाखा असलेल्या माजीद ब्रिगेडला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच, BLA च्या पूर्वीच्या ‘विशेष जागतिक दहशतवादी’ (SDGT) यादीत माजीद ब्रिगेडचा समावेश करण्यात येत आहे,” असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (११ ऑगस्ट) जाहीर केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या “दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या” वचनबद्धतेचे हा निर्णय प्रतीक आहे, असेही मंत्रालयाने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या दोन्ही संघटना नेमक्या काय आहेत, त्यांना दहशतवादी का घोषित करण्यात आले आणि याचा पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना कसा फायदा होईल, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याचा उद्देश

सन २००० च्या दशकाच्या सुरुवातीस बलुच लिबरेशन आर्मीची (BLA) स्थापना करण्यात आली. पाकिस्तान सरकारने बलुचींना आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या विकासापासून वंचित ठेवल्याचा त्यांचा आरोप असून त्यामुळेच बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याचा उद्देश त्यांच्या आंदोलनामागे आहे. बलुच चळवळीच्या अभ्यासकांच्या मते, प्रखर राष्ट्रवादी विचारांचे बलुची नेते नवाब खैर बख्श मरी यांचा मुलगा बिलाच मरी याने या चळवळीचे नेतृत्त्व केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, सध्या बशीर झेब हा BLA चा प्रमुख आहे. या संघटनेत बलुचिस्तानातील मरी, बुगती आणि मेंगल या जमातींमधील तरुणांचा समावेश आहे. काही विश्लेषकांच्या मते, BLA ची सध्याची सदस्य संख्या ६,००० असली तरी, बलुचिस्तान स्वतंत्र व्हावा, अशी इच्छा असणाऱ्या व चळवळीस समर्थन देणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी अधिक आहे. सद्यस्थितीत सोशल मीडियावर सक्रिय असलेली आणि बलुच विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडलेली तरुण आणि सुशिक्षित बलुच पिढी या संघटनेचा मुख्य आधारस्तंभ आहे.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी

कोळशाच्या खाणींतून मिळतो निधी

BLA ला मिळणारा निधी हा खंडणी, तस्करी आणि अमली पदार्थांच्या व्यापारातून येतो, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर, या चळवळीला भारताकडून निधी पुरवला जातो, असा पाकिस्तानचा आरोप आहे. पाकिस्तानचा हा आरोप भारतानेच नव्हे तर या क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनीही फेटाळून लावला आहे. इस्लामाबादस्थित ‘द खोरासान डायरी’चे इम्तियाज बलोच सांगतात, बलुचिस्तानातील कोळशाच्या प्रचंड खाणींमधून मिळणारे उत्पन्न हा या संघटनेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे.

विशेष जागतिक दहशतवादी

स्थापनेपासून BLA ने पाकिस्तानी सुरक्षा दले, सरकारी इमारती आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत येणाऱ्या चिनी प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. यामुळेच पाकिस्तानने २००६ मध्ये या संघटनेला दहशतवादी घोषित केले होते, तर अमेरिकेने २०१९ मध्ये या संघटनेचा समावेश ‘विशेष जागतिक दहशतवादी’ (SDGT) या यादीत केला.

माजीद ब्रिगेड

माजीद ब्रिगेडला BLA ची ‘विशेष सैनिकी तुकडी’ मानले जाते. या ब्रिगेडचे नाव माजीद लंगोवे सिनियर आणि माजीद लंगोवे ज्युनियर या दोन भावांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. १९७४ मध्ये क्वेट्टा दौऱ्यावर असताना तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या हत्येच्या प्रयत्नात सिनियर माजीद मारला गेला, तर २०१० मध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत सहकाऱ्याला वाचवताना ज्युनियर माजीदचा मृत्यू झाला. या दोन्ही भावांच्या सन्मानार्थ, BLA ने एक आत्मघातकी पथक स्थापन करून त्याला ‘माजीद ब्रिगेड’ असे नाव दिले.

अमेरिकन शस्त्रे मिळाली

माजीद ब्रिगेडकडे आत्मघातकी हल्ल्यांसाठी लागणारी C4 सारखी अत्याधुनिक स्फोटकेही उपलब्ध आहेत. RFEL अहवालानुसार, २०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्यानंतर BLA व माजीद ब्रिगेडला अमेरिकन शस्त्रे मिळाली. तज्ज्ञांच्या मते, माजीद ब्रिगेडमध्ये महिलांसह सुमारे सव्वाशे कडव्या सदस्यांचा समावेश आहे.

पाकिस्तानी सुरक्षा दले लक्ष्य

गेल्या काही वर्षांमध्ये, BLA आणि माजीद ब्रिगेडने पाकिस्तानी सुरक्षा दले आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर अनेक हल्ले केले आहेत. यंदा मार्च महिन्यात करण्यात आलेले जाफर एक्सप्रेसचे अपहरण अधिक चर्चेत होते. या ट्रेनमध्ये डझनभर सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सुमारे ४०० प्रवासी होते. बोलन खिंडीतील धादर भागातून ट्रेन जात असताना रेल्वे रुळावर स्फोट घडवून किमान १० सुरक्षा कर्मचाऱ्यांना ठार करण्यात आली. काही तासांनंतर BLA च्या सर्व हल्लेखोरांना ठार केल्याचे पाकिस्तानी लष्कराने जाहीर केले होते. त्याहीपूर्वी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी, कराची विमानतळ रस्त्यावर झालेल्या स्फोटाची जबाबदारी BLA ने स्वीकारली होती, त्यात दोन चिनी नागरिक ठार तर १० पाकिस्तानी नागरिक जखमी झाले होते. २०२२ मध्ये, माजीद ब्रिगेडने एका ३१ वर्षीय महिलेचा वापर आत्मघातकी हल्ल्यासाठी केला होता तिने २६ एप्रिल रोजी कराची शहरातील कॉन्फ्युशियस इन्स्टिट्यूटसमोर तीन चिनी नागरिक आणि त्यांच्या पाकिस्तानी ड्रायव्हरला स्फोट घडवून ठार केले.

मुनीर यांचा राजनैतिक विजय

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना BLA आणि माजीद ब्रिगेडला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा निर्णय आला, त्यामुळे असीम मुनीर यांचा हा राजनैतिक विजय मानला जात आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे पाकिस्तान दहशतवादात गुंतलेला नाही तर तोच दहशतवादाचा बळी ठरलेला देश आहे, असे भासवण्यात पाकिस्तानला यश आले, असे मानले जात आहे.

बलुचिस्तान विक्रीसाठी नाही

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एका बलुच नेत्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक खुले पत्र लिहून इशारा दिला होता की, पाकिस्तानमधील “प्रचंड तेल साठ्यांबद्दल” मुनीर यांनी त्यांची दिशाभूल केली आहे. तेल, नैसर्गिक वायू, तांबे आणि दुर्मीळ खनिजांचे साठे हे मूळ पाकिस्तानात नसून ते ‘बलुचिस्तान प्रजासत्ताक’च्या मालकीचे आहेत. त्यांनी पुढे म्हटले होते की, “बलुचिस्तान विक्रीसाठी नाही. बलुच लोकांच्या स्पष्ट संमतीशिवाय आम्ही पाकिस्तान, चीन किंवा इतर कोणत्याही विदेशी शक्तींना आमची जमीन किंवा संसाधने बळकावू देणार नाही.”