scorecardresearch

विश्लेषण : रशिया बेलारुसमध्ये अण्वस्त्रे कशासाठी तैनात करत आहे? युक्रेन युद्ध आणखी भडकणार?

What is Tactical Nuclear Weapons : व्लादिमीर पुतीन यांनी दावा केला आहे की, बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी त्यांच्या देशात अण्वस्त्रे तैनात करण्यासाठी विनंती केली होती. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यापासून बेलारुस आणि रशिया एकमेकांना लष्करी संबंधाबाबत मदत करत आहेत.

russia ukrain war
रशियाकडून बेलारूसमध्ये सामरिक अण्वस्त्रे तैनात करण्यात आली आहेत.

Russia Ukraine War Updates : युक्रेनविरोधात युद्धाची सुरुवात करून एक वर्ष झाल्यानंतरही रशियाला यश मिळालेले नाही. युद्धाची वर्षपूर्ती होऊन एक महिना होताच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक घोषणा केली आहे. युक्रेनचा शेजारी असलेला आणि रशियाचा लष्करी संबंधातील मित्र देश बेलारुसमध्ये रशियाकडून सामरिक अण्वस्त्रे (Tactical Nuclear Weapons) तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे युक्रेन युद्धात पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत. पुतीन यांची ही घोषणा मॉस्कोकडून युक्रेनला नवी धमकी असल्याचे म्हटले जाते. जर रशियन भूमीवर हल्ले कराल तर खबरदार! असा इशाराच पुतीन यांनी अण्वस्त्राच्या माध्यमातून युक्रेनला दिला आहे. यासाठी पुतीन यांनी नुकतीच व्यक्त केलेली भूमिका तपासावी लागेल.

अण्वस्त्रे तैनात करण्याबाबत पुतीन यांनी कोणती कारणे दिली?

ब्रिटनने नुकतेच युक्रेनला सुरक्षाकवच भेदणाऱ्या डिप्लेटेड युरेनियमचा ( Depleted Uranium) समावेश असणारी शस्त्रे देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर रशियानेही आक्रमक भूमिका घेत बेलारुसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा केली. आपल्या घोषणेबाबत अधिक माहिती देताना पुतीन म्हणाले, “अण्वस्त्रे वाहून नेण्याकरिता बेलारुसच्या लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण करण्यासाठी रशिया खूप पूर्वीपासून मदत करत आला आहे. अमेरिका अनेक दशकांपासून इतर मित्र देशांच्या परिसरात अशाच प्रकारे सामरिक अण्वस्त्रे तैनात करत आला आहे. अमेरिकेने बेल्जियम, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि टर्की या देशांमध्ये अण्वस्त्रे तैनात केली होती.” पुतीन यांनी असाही दावा केला की, ते अण्वस्त्रांच्या प्रसाराबाबत आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करणार नाहीत. एवढेच नाही तर, मॉस्कोने उलट अमेरिकेवर आरोप केला आहे. अमेरिकेने नाटोचे सदस्य असलेल्या मित्रदेशांत अण्वस्त्रे तैनात करून आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन केलेले आहे.

पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची काही दिवसांपूर्वी क्रिमलिन येथे भेट झाली. त्या भेटीच्या काही दिवसांनंतर पुतीन यांनी अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा केली. आपल्या देशांच्या सीमेबाहेर अण्वस्त्रे तैनात करून अमेरिकेला खिजवण्याचा प्रकार यातून दिसत आहे.

सामरिक अण्वस्त्रे (Tactical Nuclear Weapons) कशी असतात?

रणनीतिक क्षेपणास्त्रे (Strategic Nuclear Weapons) आणि सामरिक अण्वस्त्रे (Tactical Nuclear Weapons) अशा दोन भागांत अण्वस्त्रांना विभागले गेले आहे. रणनीतिक क्षेपणास्त्रे दूरच्या अंतरावर असलेल्या लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी वापरली जातात. तर सामरिक अण्वस्त्रे ही कमी अंतर असलेल्या लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी वापरली जातात. ज्याचा वापर मर्यादित स्वरूपाचा असतो.

युद्धक्षेत्रावरील शत्रू सेनेच्या छावण्या आणि दारुगोळा साठा उद्ध्वस्त करण्यासाठी सामरिक अण्वस्त्रांचा वापर केला जातो. रणनीतिक क्षेपणास्त्रे ही वजनाने आणि आकारानेदेखील मोठी असतात. एखादे शहर उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यामध्ये असते. उलट सामरिक अण्वस्त्रे ही आकाराने आणि वजनाने लहान असतात. जी हाताळणे आणि त्यांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करणे सोपे असते.

शस्त्रास्त्रे नियंत्रण करारांतर्गत रणनीतिक क्षेपणास्त्रे वापरण्याबाबत मॉस्को आणि वॉशिंग्टनदरम्यान करार झालेला आहे. मात्र सामरिक अण्वस्त्रे या कराराच्या बाहेर आहेत. तसेच रशियाने आजवर अशा अण्वस्त्रांची त्यांच्याकडे असलेली संख्या आणि इतर कोणतीही माहिती बाहेर येऊ दिलेली नाही.

रशियाकडे किती अण्वस्त्रे असतील?

रशियाच्या अण्वस्त्रे तैनात करण्याच्या घोषणेबाबत अमेरिकेनेही आपला अंदाज वर्तविला आहे. रशियाकडे दोन हजारांहून अधिक सामरिक अण्वस्त्रे नसतील असा अमेरिकेचा कयास आहे. या शस्त्रांमध्ये विमानातून वाहून नेता येणारे बॉम्ब, छोट्या अंतरावर डागता येणारी क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे. रणनीतिक अण्वस्त्रे ही जमिनीवरून किंवा सबमरिनवरून डागण्यात येतात आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणून लाँच करण्यासाठी तयार असतात, त्याउलट सामरिक अण्वस्त्रे ही सुरक्षित पेट्यांमध्ये बंदिस्त ठेवलेली असतात. तसेच रशियामधून युद्धक्षेत्रावर अशी अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे युक्रेनच्या शेजारी देश असलेल्या बेलारुसमध्ये ही शस्त्रे तैनात करण्यात आली असल्याचे अनुमान काढले जात आहे.

पुतीन यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बेलारुसच्या १० विमानांना सामरिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी तयार केले आहे, तसेच विमान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुरुवात ३ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्याशिवाय रशिया बेलारुसला गाडीवर वाहून नेता येणारी आणि छोट्या अंतरावर डागता येणारी (Iskander short-range missile) क्षेपणास्त्रे देणार असल्याचेही पुतीन यांनी सांगितले.

बेलारुसमध्ये सामरिक अण्वस्त्रांची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी नव्या सुरक्षित वास्तूची निर्मिती करण्यात येत आहे. १ जुलैपर्यंत या वास्तूचे बांधकाम पूर्ण होईल. मात्र या ठिकाणी किती अण्वस्त्रांची साठवणूक करण्यात येणार? याबाबतचा आकडा पुतीन यांनी सांगितला नाही. अमेरिकेने नाटो देशांत ठेवलेल्या त्यांच्या अण्वस्त्रावर नियंत्रण ठेवले, त्याच प्रकारे बेलारुसमधील अण्वस्त्रांवर केवळ रशियाचेच नियंत्रण असेल असेही पुतीन यांनी जोर देऊन सांगितले.

१९९० नंतरची ही पहिलीच वेळ असेल जेव्हा मॉस्को अशा प्रकारे अण्वस्त्रे रशियाबाहेर पाठवत आहे. सोव्हिएत युनियनचा पाडाव झाल्यानंतर बेलारुस, युक्रेन आणि कझाकस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली अण्वस्त्रे पुन्हा रशियात आणण्यात आली होती.

पुतीन यांच्या निर्णयाचे काय पडसाद उमटणार?

पुतीन यांच्या आवाहनातून ते युक्रेनला अण्वस्त्रहल्ल्याची धमकी देऊन युक्रेनयुद्धाला गती देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. बेलारुस आणि युक्रेन या दोन देशांची सीमा तब्बल १,०८४ किलोमीटर एवढी आहे. त्यामुळे बेलारुसमधून युक्रेनवर छोटी क्षेपणास्त्रे डागण्यासाठी सामरिक अण्वस्त्रांचा चांगला उपयोग होईल, असे मॉस्कोने ठरविल्याचे दिसत आहे. तसेच मध्य युरोप आणि युरोपच्या पूर्वेकडील नाटो सदस्य असलेल्या देशांनाही लक्ष्य करण्याची रशियाची क्षमता यामुळे वाढणार आहे. युक्रेनची राजधानी किवने रशियाने युक्रेनमध्ये ताबा मिळवलेल्या जागांवर पुन्हा दावा सांगण्यास सुरुवात केल्यानंतर रशियाकडून ही नवी रणनीती आखण्यात येत आहे.

रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी मागच्या आठवड्यातच युक्रेनला सज्जद दम दिला होता. युक्रेनने क्रिमियन पेनिनसुला (Crimean Peninsula) वर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. रशियाने २०१४ साली बेकायदेशीररीत्या क्रिमियाला स्वतःच्या हद्दीत सामील केले आहे.

मेदवेदेव पुढे म्हणाले, “पाश्चिमात्य देशांची शस्त्रास्त्रे स्वीकारून युक्रेन दिवसेंदिवस आण्विक शस्त्रे वापरण्याचा पर्याय जवळ करत आहे.” मेदवेदेव यांच्या या दाव्यावर बोलताना युक्रेनचे लष्कर अधिकारी ओलेह (Oleh Zhdanov) म्हणाले, “रशियाचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला पाश्चिमात्य देशांकडून मिळत असलेल्या मदतीत खंड पडावा, यासाठीच पुतीन यांच्याकडून आण्विक शस्त्रांची धमकी दिली जात आहे. बेलारुसमध्ये सामरिक अण्वस्त्रे तैनात करून रशिया फक्त युक्रेनच नाही तर युरोपियन देशांसाठीदेखील धोका निर्माण करत आहेत. युक्रेनच्या युरोपियन मित्रांमध्ये सतत तणाव राहावा, अशी रशियाची योजना दिसत आहे.”

युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांची यावर भूमिका काय?

पुतीन यांच्या घोषणेनंतर युक्रेनने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची तात्काळ बैठक बोलावली. मनुष्य जातीचे भविष्य धोक्यात घालू पाहणाऱ्या रशियाच्या विरोधात संपूर्ण जगाने एकत्र आले पाहिजे, असे आवाहन युक्रेनच्या परराष्ट्र खात्याने केले आहे. तर व्हाईट हाऊसच्या सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, पुतीन यांनी बेलारुसमध्ये अण्वस्त्रे नेण्यासंबंधी घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही हालचाल अद्याप दिसून आलेली नाही.

तर दुसऱ्या बाजूला रशियाने अमेरिकेचे उदाहरण देऊन बेलारुसमध्ये अण्वस्त्रे ठेवण्याबाबतचा दावा नाटोने फेटाळून लावला आहे. अमेरिकेने असा कोणताही प्रकार केलेला नसून पाश्चिमात्य देश हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडण्यासाठी कृती करत आहेत, असे नाटोने स्पष्ट केले. रशियाची आण्विक शस्त्रांची भाषा अतिशय धोकादायक आणि बेजबाबदारपणाची असल्याचेही नाटोचे प्रवक्ते ओना लुंगेस्कू (Oana Lungescu) यांनी म्हटले आहे. तसेच रशियाने आण्विक शस्त्राची भाषा वापरली असली तरी पाश्चिमात्य देशांच्या एकजुटीमध्ये कोणताही बदल होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

बेलारुसच्या सीमेवर असलेल्या लिथुआनिया या देशाने पुतीन यांच्या घोषणेबाबत सांगितले की, रशिया आणि बेलारुस या दोन्ही देशांनी युरोप खंडावर अनपेक्षित हुकूमशाही पद्धत लादली आहे. पुतीन आणि लुकाशेन्को दोघेही युरोपमध्ये तणाव आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बेलारुसच्या परराष्ट्र खात्याने मात्र पाश्चिमात्य देशांचे आरोप फेटाळून लावले आहेत. पाश्चिमात्य देशांत निर्माण होणाऱ्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही अण्वस्त्रे तैनात करण्यात आली आहेत, याचे संपूर्ण नियंत्रण रशियाच्या ताब्यात असणार आहे, असे बेलारुसने स्पष्ट केले आहे. तर रशियाच्या परराष्ट्र खात्याने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अमेरिकेने अण्वस्त्रे युरोप खंडातून माघारी घ्यावीत, या आमच्या आवाहनाकडे वॉशिंग्टनने दुर्लक्ष केले. त्यामुळे मॉस्कोला रशिया आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 18:39 IST

संबंधित बातम्या