– कुलदीप घायवट

भारतीय रेल्वेचे अर्थकारण हे प्रवासी रेल्वे वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीवर जास्त अवलंबून आहे. मालगाड्यांची चाके जितक्या जलदगतीने धावतील, तितके रेल्वेच्या तिजोरीतील उत्पन्न वाढते. मात्र मालगाड्यांमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लोकल, एक्स्प्रेस, पॅसेंजर, मेमू या गाड्यांचा खोळंबा होतो. मात्र आता देशात मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’चे (डीएफसी) जाळे विस्तारण्यात येत असून त्यासाठी ३,३८१ किमी लांबीचे स्वतंत्र लोहमार्ग टाकण्यात येत आहेत. भविष्यात देशातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वेची गती आणि वक्तशीरपणा वाढेल. मालगाड्यांमुळे प्रवासी वाहतूक सेवेला वारंवार दाखविला जाणारा लाल दिवा हिरवा होईल.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) म्हणजे काय?

‘डीएफसी’ हा एक वेगवान आणि उच्च क्षमता असलेला रेल्वे मार्ग आहे. देशात २,८४३ किमी लांबीचा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. कोळसा, सिमेंट, धातूच्या वस्तू, इंधन, खाद्यपदार्थ, बांधकाम साहित्य यांच्या मालवाहतुकीसाठी हा स्वतंत्र रेल्वे मार्ग वापरला जातो. चांगल्या पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा समर्पक मिलाफ यात पाहायला मिळतो. या मार्गाची जास्त वजन पेलण्याची तसेच अधिक उंचीचे किंवा डबल कंटेनर वाहून नेण्याची क्षमता अधिक आहे. प्रत्येक मालगाडीच्या स्थितीची माहिती एकाच ठिकाणी बघता येते. पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील डंकुनीपर्यंतचा १,८७५ किमी ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (ईडीएफसी) आणि उत्तर प्रदेशमधील दादरी ते मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) १,५०६ किमी पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डब्ल्यूडीएफसी) असे ते दोन मार्ग आहेत.

‘डीएफसी’ मार्ग कोणत्या राज्यांतून जातो?

‘ईडीएफसी’द्वारे पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल ही राज्ये जोडली गेली असून हा मार्ग कोळसा खाणी, थर्मल पॉवर प्लांट्स आणि औद्योगिक शहरांमधून जातो. मुख्य मार्गाला उपमार्गिका जोडल्या आहेत. ‘ईडीएफसी’ला जागतिक बँकेद्वारे निधी पुरवला गेला आहे. ‘डब्ल्यूडीएफसी’ प्रमुख्याने बंदरांना जोडला गेला आहे. त्यामुळे समुद्रमार्गे विदेशातून आलेल्या मालाची वाहतूक डीएफसीद्वारे देशभरात केली जाते. ‘डब्ल्यूडीएफसी’ हरयाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून गेला आहे. या मार्गाला जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य एजन्सीद्वारे निधी देण्यात आला आहे.

साधारण लोहमार्ग आणि ‘डीएफसी’वरील मालवाहतुकीत फरक काय?

भारतीय रेल्वे ही अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या खालोखाल जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी रेल्वे व्यवस्था आहे. भारतीय रेल्वेतून वार्षिक १,२३३.८५ हून अधिक टन मालवाहतूक होते. साधारणत: ५०-५० टक्के प्रमाणात प्रवासी आणि मालवाहतूक केली जाते. त्यामुळे दोन्ही व्यवस्थांचे वेळापत्रक कोलमडते. ‘डीएफसी’मुळे प्रवासी आणि मालगाड्यांचा वेग वाढणार आहे. सध्याच्या रेल्वेमार्गावरून ४.२६५ मीटर उंचीची मालगाडी धावू शकते. तर ‘डब्ल्यूडीएफसी’वर ७.१ मीटर आणि ‘ईडीएफसी’वर ५.१ मीटर उंचीची मालगाडी धावते. रेल्वेच्या तुलनेत ६६ टक्क्यांहून अधिक उंची असलेले कंटेनर डीएफसीवरून चालवता येणे शक्य आहे. भारतीय रेल्वेमार्गावरून ३,२०० मिमी रुंदी असलेले कंटेनर धावू शकतात, तर ‘डीएफसी’वर ३,६६० मिमी रुंदीचे कंटेनर धावू शकतात. साधारण मार्गावर ताशी २५ किमी वेगानेच मालगाडी धावू शकते, तर ‘डीएफसी’वर ताशी १०० किमीपर्यंतचा वेग गाठणे शक्य आहे.

‘डीएफसी’चा मुंबईला फायदा काय?

‘जेएनपीटी’वर विदेशातून मोठ्या संख्येने सामग्री येते. तेथून देशाच्या कानाकोपऱ्यात मालवाहतूक केली जाते. ‘जेएनपीटी’वरील डीएफसीचे काम अंतिम टप्प्यात आले असून काम पूर्ण झाल्यानंतर वसई-पनवेल मार्गावरील मालवाहतुकीचा भार कमी होईल. सध्या या मार्गावरून सुमारे २२ मालगाड्या धावतात. ‘डीएफसी’चे काम पूर्ण झाल्यानंतर १८ मालगाड्या तिकडे वळवण्यात येतील. त्यामुळे पनवेलवरून लांब पल्ल्यांच्या गाड्या, लोकलच्या मार्गात अडचण येणार नाही. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या इतर मार्गांवरील रेल्वेही जलदगतीने धावण्यास मदत होणार आहे.

‘डीएफसी’मुळे वंदे भारत एक्स्प्रेसला गती?

भारतीय रेल्वेचे जाळे खूप गुंतागुंतीचे असून मार्ग कायम व्यस्त असतात. तरीही वेळापत्रकात नव्याने वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश करण्यात आला. डीएफसीमुळे वंदे भारत वेळेत आणि वेगात पळविणे शक्य होणार आहे. डीएफसी पूर्ण होत आल्याने ‘वंदे भारत’च्या संख्येत वेगाने वाढ करता येणे शक्य झाल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. कोणत्याही व्यत्ययाशिवाय मालवाहतूक सुरू आहे. भविष्यातही प्रवासी रेल्वेगाड्या वाढवण्यास ‘डीएफसी’ फायदेशीर ठरणार आहे, असा दावा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

किती टक्के मालगाड्या ‘डीएफसी’कडे वळतील?

भारतीय रेल्वे मार्गावर सध्या क्षमतेपेक्षा अधिक मालगाड्या आणि रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यापैकी सुमारे ७० टक्के मालवाहू गाड्या या डीएफसीवर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवासी गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे. मालगाड्यांमुळे धिम्या गतीने धावणाऱ्या रेल्वेगाड्या वेगात धावण्यास शक्य होईल. तसेच डीएफसीवर प्रतिदिन ३०० मालगाड्या ताशी १०० किमी वेगाने धावण्याचे लक्ष्य पूर्णत्वास जाईल.

हेही वाचा : भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलंय रेल्वेचं जाळं! पण ‘या’ राज्यात आहे फक्त एकच रेल्वे स्टेशन, कारण जाणून थक्क व्हाल

डीएफसीचा देशात नवा मार्ग कोणता असेल?

सध्या ‘ईडीएफसी’ आणि ‘डब्ल्यूडीएफसी’ मालगाड्यांसाठी उपलब्ध आहेत. भविष्यात पालघर-भुसावळ-वर्धा-नागपूर-राजखरसवान-खडगपूर-उलुबेडिया-डंकुनी असा २,०३८ किमी लांबीचा पूर्व-पश्चिम काॅरिडाॅर तयार केला जाणार आहे. विजयवाडा-नागपूर-इटासरी असा ८९० किमी लांबीचा उत्तर-दक्षिण कॉरिडॉर तयार केला जाणार आहे.