– भक्ती बिसुरे

तब्बल अडीच वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या करोना महासाथीची आणीबाणी संपुष्टात आली आहे. तशी अधिकृत घोषणा नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या महासाथीचे परिणाम जगण्याच्या सर्व पैलूंवर झालेले संपूर्ण जगानेच अनुभवले आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून अशी अधिकृत घोषणा हा एक प्रकारचा दिलासाच असला तरी साथरोगामुळे उद्भवू शकेल अशी आणीबाणी संपली असली तरी विषाणूचा धोका संपलेला नाही हेही दुसऱ्या बाजूला संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यानिमित्ताने या आणीबाणीचा आढावा घेणारे हे विश्लेषण.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
Ajit Pawar, seat allocation
“जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल”, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, “युती असो किंवा महाविकास आघाडी…”

जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस अधानोम घेब्रेयेसस यांनी संपूर्ण जगाला दिलासा देणारी ही घोषणा नुकतीच केली आहे. चीनच्या वुहान प्रांतात २०२० च्या सुरुवातीला सुरू झालेली आणि त्यानंतर जगभर हाहाकार माजवलेली कोविड-१९ नामक महासाथ ही जागतिक आणीबाणी आहे, अशी घोषणा ३० जानेवारी २०२० रोजी संघटनेने केली. त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने ही साथ जगभर पसरली. जागतिक स्तरावर कोट्यवधी नागरिकांना या महासाथीत संसर्ग झाला. लाखो रुग्णांनी करोनाने जीव गमावला. त्या वेळी निर्माण झालेली आणीबाणी सदृश परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे, मात्र, विषाणूचा धोका अद्यापही सरलेला नाही. त्यामुळे भविष्यात गरज भासल्यास पुन्हा आणीबाणी घोषित केली जाईल. फक्त तशी वेळ येऊ नये, यासाठी जगातील देशांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे डॉ. घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे.

महासाथ ही आणीबाणी का?

माणसांच्या एकत्र येण्यातून, श्वसनातून करोनाचे संक्रमण होत असल्याने करोना महासाथीला प्रतिबंध करण्यासाठी जगभरामध्ये टाळेबंदीचा उपाय अवलंबण्यात आला. त्यामुळे उद्योगधंदे ठप्प झाले. देशांनी आपल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा बंद केल्या. व्यापारउदीम थांबला. शाळा, महाविद्यालये असे सर्व काही थांबले. त्याचा परिणाम आर्थिक संकट निर्माण होण्यावरही झाला. एका बाजूला आरोग्यविषयक संकट आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक कोंडी, आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी करावी लागलेली भरीव आर्थिक तरतूद अशा मोठ्या आव्हानात्मक प्रसंगाला जगाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे ही साथ केवळ आरोग्य संकट नव्हे, तर आणीबाणी म्हणून इतिहासात ओळखले गेले. सुरुवातीच्या काळात हा विषाणू, त्याचे परिणाम, त्यावर करायचे उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा अनेक बाबतीत जगातील सर्वच देश अनभिज्ञ होते. त्यामुळे ही साथ कशी हाताळायची याबाबतही मोठा संभ्रम दिसून आला. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यात झाला, हेही विसरून चालणार नाही.

म्हणजे संकट संपले का?

करोना महासाथीला सुरुवात झाल्यापासूनच विषाणूमध्ये सातत्याने होणारे बदल हा साथरोगाची दिशा बदलणारा आणि ठरवणारा घटक ठरला. साथरोगाला सुरुवात झाली त्यानंतर विषाणूच संपूर्ण नवीन असल्यामुळे संसर्गावर उपचार म्हणून अनेक प्रयोग जगभरातील डॉक्टरांकडून करण्यात आले. कालांतराने प्रतिबंधात्मक लशीचा लागलेला शोध आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांना होऊन गेलेला संसर्ग यांमुळे समूहाची रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित झाली. विषाणूला प्रतिसाद मिळेनासा झाला, तसे विषाणूने स्वत:मध्ये बदल करण्यास सुरुवात केली. त्या बदलांचा अनुभव आपण आजही घेत आहोत. करोना, डेल्टा, ओमायक्रॉन, डेल्टाक्रॉन आणि नुकताच काही काळ रुग्णसंख्येचा आलेख हलवून गेलेला एक्सबीबी १.१६ सारख्या विषाणू प्रकारांवरून करोना विषाणूचा स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठीचा चिवट संघर्षच स्पष्ट होतो. असे बदल पुढील कैक वर्षे सुरू राहतील, त्यामुळे विषाणू नाहीसा झालेला नाही, त्याचे उच्चाटन झालेले नाही, म्हणजेच करोना साथीचे संकट अद्याप ओसरलेले नाही, याकडे जागतिक आरोग्य संघटना लक्ष वेधते.

हेही वाचा : करोना महामारीनंतर Plant Pandemic ची जगाला चिंता; बांगलादेशचा गहू उद्ध्वस्त करणाऱ्या रोगाचा भारताला धोका किती?

आता पुढे काय?

करोना महासाथीची सुरुवातीच्या दोन वर्षांमधील तीव्रता गेल्या वर्षभरात काहीशी निवळल्याचे आपण सर्वांनीच अनुभवले आहे. अधूनमधून रुग्णसंख्येचा उंचावणारा मात्र तेवढ्याच वेगाने खाली येणारा आलेख हे मागील वर्षभरातील या साथीचे चित्र आहे. यांपैकी बहुसंख्य रुग्ण हे घरच्या घरी उपचार घेऊन संपूर्ण बरे होत आहेत. रुग्णालय किंवा कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज न भासणे हे या रुग्णसंख्येचे आणि म्हणूनच विषाणूच्या बदललेल्या स्वरूपाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी महासाथ आता ‘पँडेमिक’ राहिली नसून तिचे रूपांतर ‘एंडेमिक’मध्ये (प्रदेशविशिष्ट साथ) होत असल्याचा निर्वाळाही जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. विषाणूच्या स्वरूपातील बदलांमुळे विषाणूचे संक्रमण सुरूच राहील, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि वर्तन – उदा. मुखपट्टीचा वापर, लसीकरण, स्वच्छतेचे नियम पाळणे या बाबी कायमस्वरूपी अमलात आणण्याची गरज राहणार आहे. त्यातूनही गरज पडलीच तर पुन्हा आणीबाणी लागू करू, असे सांगून जागतिक आरोग्य संघटनेने सध्याचे आणीबाणी हटवणे दिलासादायक असले तरी गांभीर्याने घेणेही आवश्यक असल्याचा संदेशही दिला आहे.

bhakti.bisure@expressindia.com