प्रसूतीनंतर महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. आता एका नव्या संशोधनातून दर तीनपैकी एका महिलेला प्रसूतीनंतर दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याची बाब उघड झाली आहे. जगभरात दरवर्षी सुमारे चार कोटी महिलांना हा त्रास सुरू होत असल्याची धक्कादायक आकडेवारीही संशोधनातून समोर आली आहे. लॅन्सेट ग्लोबल हेल्थमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या संशोधनाबद्दल माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे या गंभीर विषयाकडे आता लक्ष वेधले गेले आहे.

नेमके कारण काय?

दरवर्षी जगभरात १४ कोटी महिलांची प्रसूती होते. मागील तीन दशकांत मातामृत्यूंचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यशही मिळत आहे. मात्र, जन्म दिल्यानंतर मातेला सहा ते आठ आठवड्यापर्यंत वैद्यकीय सेवा मिळते. त्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी वैद्यकीय मदत मिळत नाही. या आरोग्यविषयक समस्या दीर्घकालीन असल्याने त्या सुरू झाल्यानंतर त्यांची तीव्रता वाढण्यास लागणारा कालावधी जास्त असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सिझेरियन शस्त्रक्रियेसह इतर वैद्यकीय प्रक्रियेने होणाऱ्या प्रसूतीनंतर हा त्रास प्रामुख्याने होताना दिसतो, असे संशोधनात म्हटले आहे.

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान
Low back pain: How to fix your posture and straighten your spine
Low back pain: पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! डॉक्टरांनी सांगितले सोपे उपाय
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार

हेही वाचा : विश्लेषण : ‘काशी – तामीळ संगम’… उत्सव की भाजपचा राजकीय कार्यक्रम?

नेमक्या समस्या कोणत्या?

प्रसूतीनंतर महिलांमध्ये काही महिने अथवा काही वर्षे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यात प्रामुख्याने शारीरिक संबंधांवेळी वेदना होण्याचा त्रास ३५ टक्के महिलांना जाणवतो. त्याखालोखाल ३२ टक्के जणींना पाठदुखीची समस्या सुरू होते. मलविसर्जनावर नियंत्रण न राहण्याची समस्या १९ टक्के महिलांमध्ये जाणवते. मूत्रविसर्जनावर नियंत्रण न राहण्याची समस्या ८ ते ३१ टक्के महिलांमध्ये आढळते. याचबरोबर इतर समस्यांमध्ये तणाव ९ ते २४ टक्के, नैराश्य ११ ते १७ टक्के, विटप वेदना ११ टक्के, मूल जन्माला घालण्याची भीती ६ ते १५ टक्के, वंध्यत्व ११ टक्के असे प्रमाण आहे.

आतापर्यंत दुर्लक्ष का?

महिलांमध्ये प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणात आरोग्य समस्या निर्माण होत असल्या तरी त्याबद्दलच्या वैद्यकीय संशोधनाकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आले. प्रसूतीनंतरच्या आरोग्य समस्यांवरील उपचारांबाबत मागील १२ वर्षांत संशोधनाद्वारे उच्चस्तरीय मार्गदर्शक तत्वे जाहीर झालेली नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. त्यात केवळ उच्च उत्पन्न गटातील देशांचा अपवाद आहे. विशेष म्हणजे अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये याबाबत एकदाही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या समस्यांची संबंधित देशांतील आरोग्य यंत्रणांनी दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

हेही वाचा : विश्लेषण: नव्या उपाययोजनांनंतरही नक्षलवाद वाढतो आहे का?

काय काळजी घ्यावी?

या समस्या टाळण्यासाठी प्रसूतीवेळी योग्य काळजी घेण्याची गरज संशोधनात अधोरेखित केली आहे. आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात नसलेल्या भागातील महिलांना या समस्यांचा सर्वाधिक सामना करावा लागतो. प्रसूतीच्या काळात महिलेची योग्य काळजी आणि प्रसूतीनंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास यातील अनेक समस्या कमी होऊ शकतात. कारण प्रसूतीच्या काळात गुंतागुंत झाल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम महिलेच्या आरोग्यावर दिसून येतात, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

मातामृत्यू कमी करण्यात किती यश?

जगभरात अनेक देशांमध्ये आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. याचबरोबर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांचाही महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मागील दोन दशकांत जगभरातील १८५ पैकी तब्बल १२१ देशांना मातामृत्यू प्रमाण कमी करण्यात अपयश आले आहे. यामागे आर्थिक, सामाजिक विषमता हेही कारण आहे. लैंगिक समानतेकडे दुर्लक्ष केल्याने एकूणच महिलांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तवही संशोधनातून मांडण्यात आले आहे.

हेही वाचा : Birthplace of Krishna in Mathura: मथुरेतील कृष्ण जन्मस्थान: इतिहास नेमके काय सांगतो?

तज्ज्ञांचे म्हणणे काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालिका डॉ. पास्कल अलॉटी यांच्या मते, अनेक महिलांना प्रसूतीनंतर दैनंदिन जीवनात त्रासदायक ठरतील अशा अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचतात. असे असूनही याबद्दल फारशी चर्चा होताना दिसत नाही. माता बनण्यापलीकडे महिलांचे आयुष्य असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे. महिलांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसुविधा मिळणे गरजचे आहे. केवळ प्रसूतीदरम्यान मातामृत्यू रोखणे हे उद्दिष्ट न ठेवता त्यानंतरही महिलेचे आरोग्य चांगले राहू शकेल, या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. त्यातून महिलांचे जीवनमान उंचावेल.

sanjay.jadhav@expressindia.com