INS Tamal in Indian navy भारताने आपली सागरी संरक्षण क्षमता मजबूत करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने भारताकडून महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदल १ जुलै २०२५ रोजी प्रगत स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तमालचा समावेश करण्यास सज्ज आहे. कॅलिनिनग्राडमधील रशियाच्या यंतार शिपयार्ड येथे भारताने रशियाच्या सहकार्याने ही युद्धनौका विकसित केली आहे. ही युद्ध नौका २०१६ मध्ये स्वाक्षरी केलेल्या २१,००० कोटी रुपयांच्या संरक्षण कराराचा एक भाग आहे. हिंद महासागर क्षेत्रातील वाढत्या सुरक्षा आव्हानांमध्ये आपल्या नौदलाच्या ताफ्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारताने रशियाबरोबर हा करार केला होता. काय आहे आयएनएस तमाल? काय आहेत या युद्धनौकेची वैशिष्ट्ये? भारतीय नौदलासाठी याचे महत्त्व काय? जाणून घेऊयात.
‘आयएनएस तमाल’चे महत्त्व काय?
१ जुलैला हा समारंभ पार पडणार आहे. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल संजय जे. सिंग यांच्यासह वरिष्ठ भारतीय नौदल अधिकारी या समारंभाला उपस्थित राहतील. भारत-रशिया करारा अंतर्गत देण्यात येणाऱ्या चार स्टेल्थ फ्रिगेट्सपैकी आयएनएस तमाल ही दुसरी युद्धनौका आहे. या युद्धनौकेचा समावेश चीनच्या वेगाने वाढणाऱ्या नौदलाच्या उपस्थितीशी जुळवून घेण्याच्या भारताच्या प्रयत्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष आणि इस्रायल आणि इराणमधील वाढत्या शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मदृष्ट्या या युद्धनौकेचा समावेश होणे महत्त्वाचे मानले जात आहे. जगभरातील देश आता त्यांचे संरक्षण क्षेत्र अधिक बळकट करत आहेत आणि भारतही त्याला अपवाद नाही. पश्चिमेला पाकिस्तान, उत्तर आणि पूर्वेला चीन आणि त्याच्या सभोवताली अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर असल्याने, भारताच्या भौगोलिक आणि भूराजकीय स्थितीसाठी मजबूत बहुआयामी संरक्षण क्षमतांची आवश्यकता आहे.
चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारताला आपली सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी निर्णायक पावले उचलणे महत्त्वाचे आहे. आयएनएस तमाल ही याचाच एक भाग आहे. आयएनएस तमाल ही एक स्टेल्थ गाईडेड-मिसाईल फ्रिगेट आणि एक आधुनिक किर्वाक-क्लास युद्धनौका आहे. डिसेंबर २०२४ मध्ये आयएनएस तुशीलचा नौदलात समावेश करण्यात आला होता. ही त्याचीच प्रगत आवृत्ती आहे. शत्रूला या जहाजाचा शोध घेता येणार नाही, असे तंत्रज्ञान वापरून हे जहाज विकसित करण्यात आले आहे. त्यासाठी यात अत्याधुनिक इन्फ्रारेड स्टेल्थ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तसेच भारतातील विकसित शस्त्रे तैनात करण्यासाठी याला डिझाईन करण्यात आले आहे.
‘आयएनएस तमाल’ची वैशिष्ट्ये
- लांबी : १२५ मीटर
- विस्थापन : ३,९०० टन
- वेग : ५५ किलोमीटर प्रतितास
- शस्त्रे : २९० ते ४५० किलोमीटर मारक श्रेणी असलेल्या ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राने सुसज्ज
- युद्धनौकेवर कामोव-२८ आणि कामोव-३१ पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर तैनात केले जाऊ शकतात.
- ही युद्धनौका शत्रूची लढाऊ विमाने, पाणबुड्या आणि ड्रोन, F-16, F-35, राफेल आणि चीनच्या J-35A सारख्या धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.
- यात २५० नौसैनिक राहू शकतात.
- आयएनएस तमाल हवेत, पाण्याखाली आणि पाण्याच्या पृष्ठभागावर एकाचवेळी हल्ला करण्यास सक्षम आहे.
अरबी समुद्रात या युद्धनौकेचे महत्त्व
आयएनएस तमाल ही नौदलाच्या पश्चिम कमांड अंतर्गत अरबी समुद्रात तैनात केली जाईल. हा प्रदेश धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या प्रदेशात भारत आणि पाकिस्तानमधील सागरी सीमा आहे. हा प्रदेश पाकिस्तानचे व्यावसायिक आणि नौदल केंद्र असलेल्या कराचीच्या जवळ असल्याने आयएनएस तमालची तैनाती महत्त्वाची ठरते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारताच्या पश्चिम ताफ्याने याच क्षेत्रात पाकिस्तानवर हल्ला करून त्याला कमकुवत केले होते. आता आयएनएस तमाल तैनात होणार असल्याने पुन्हा एकदा ऐतिहासिकदृष्ट्या संवेदनशील प्रदेशात भारताची ताकद दिसून येईल.
भारत अन् रशियाचा २१,००० कोटी रुपयांचा करार
रशियाबरोबरच्या २१,००० कोटी रुपयांच्या करारात किर्वाक-३ श्रेणीतील चार स्टेल्थ फ्रिगेट्सचा समावेश आहे. त्यापैकी दोन युद्धनौका म्हणजेच आयएनएस तुशील आणि आयएनएस तमाल रशियात तयार करण्यात आल्या आहेत. त्यांची एकत्रित किंमत ८,००० कोटी रुपये आहे. उर्वरित दोन युद्धनौका रशियन तांत्रिक मदतीने गोवा शिपयार्डमध्ये स्वदेशी पद्धतीने तयार केल्या जातील. हे केंद्राच्या ‘मेक इन इंडिया’ संरक्षण मोहिमेसाठी महत्त्वाचे ठरेल, त्यासाठी १३,००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
आयएनएस तमालला इतर युद्धनौकांच्या तुलनेत आणखी वेगळे करणारी एक गोष्ट म्हणजे, त्यात २६ टक्के स्वदेशी सामग्री वापरण्यात आली आहे. ही संरक्षण स्वावलंबनाकडे भारताची वाटचाल दर्शवते. दक्षिण चीन समुद्रापासून हिंदी महासागरात चीनच्या नौदल हालचाली वाढत असताना, भारत समुद्री संरक्षणाला बळकटी देण्यासाठी एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. त्यासाठी आतापर्यंत भारताने आयएनएस तमालसारख्या स्टेल्थ फ्रिगेट्सचा समावेश केला आहे आणि विमानवाहू क्षमताही मजबूत केल्या आहेत.