भारत आणि आर्मेनियामध्ये संरक्षण सहकार्य वाढीला लागले आहे. अजरबैजानला पाकिस्तान आणि चीन करीत असलेल्या संरक्षण सहकार्याच्या पार्श्वभूमीवर, त्या देशाचा कट्टर शत्रू आर्मेनिया भारताकडून विविध संरक्षण सामग्री खरेदी करीत आहे. आर्मेनियाने सुखोई-३० विमानांच्या खरेदीसाठी पसंती दर्शविल्याची चर्चा आहे. त्याविषयी…
अझरबैजानने पाकिस्तानबरोबर ४० ‘जेएफ-१७ थंडर ब्लॉक ३’ लढाऊ विमानांची खरेदी करण्यासाठी ४.६ अब्ज डॉलरचा करार केल्यानंतर शेजारी देश आर्मेनियाने भारत वापरत असलेल्या ‘सुखोई-३० एमकेआय’ विमानांच्या खरेदीसाठी पसंती दर्शविली आहे. ‘डिफेन्स सिक्युरिटी एशिया’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. चीन-पाकिस्तान युतीतून तयार होणाऱ्या ‘जेएफ-१७’ विमानांना भारत-रशिया मैत्रीचे प्रतीक असलेल्या ‘सुखोई’चे प्रत्युत्तर देऊन हवाई शक्तीमध्ये वरचढ राहण्याचा आर्मेनियाचा विचार या विमानांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील चांगली प्रतिमा दाखवून देतो.
पार्श्वभूमी काय?
आर्मेनिया, अझरबैजान हे देश युरेशियाच्या टापूत दक्षिण कॉकेशस भागात येतात. या दोन्ही देशांत नागोर्नो-करबाक भागावरून वाद आहे. त्यावरून दोन्ही देशांत दीर्घकालीन संघर्ष सुरू आहे. सुरक्षेच्या संदर्भात आर्मेनिया रशियावर मोठ्या प्रमाणात निर्भर होता. रशियापुरस्कृत ‘सामूहिक सुरक्षा करार संघटने’चा (सीएसटीओ) आर्मेनिया एक भाग आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सुरक्षेच्या बाबतीत रशियाकडून होणारे दुर्लक्ष पाहता आर्मेनियाने सुरक्षा रणनीतीमध्ये बदल केला आहे. भारतासह फ्रान्स आणि इतर देशांकडून आर्मेनिया शस्त्रे घेत आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी आर्मेनिया उदयोन्मुख बाजारपेठ तयार झाली आहे. आर्मेनियाशी आपले संबंध चांगले असून, संरक्षण सहकार्य वाढत आहे.
भारत-आर्मेनिया संरक्षण संबंध
आर्मेनिया भारताकडून पिनाका रॉकेट प्रणाली, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे, तोफा, दारुगोळे, ड्रोनविरोधी यंत्रणा, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, स्वाती रडार यंत्रणा खरेदी करीत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला यातून मोठ्या प्रमाणावर गती मिळत असून, भारताची संरक्षण निर्यात वाढते आहे. अझरबैजानने ‘जेएफ-१७’ विमाने खरेदीचा करार केल्यानंतर या प्रदेशातील हवाई वर्चस्वाचे संतुलन अझरबैजानकडे झुकण्याची शक्यता होती. त्याला प्रतिशह देण्यासाठी आर्मेनियाने आता सुखोई विमानांकडे लक्ष वेधले आहे. भारत-रशिया संयुक्तपणे तयार करीत असलेली सुखोई विमाने नजीकच्या काळात आर्मेनियाच्या आकाशात उड्डाण करताना दिसली, तर फारसे वावगे ठरणार नाही.
‘सुखोई’ला पसंती का?
सुखोई-३० विमान हे दोन आसनी, बहुउद्देशीय हवाई वर्चस्व राखणारे लढाऊ विमान आहे. भारतात ‘हिंदुस्तान एअरोनॅटिक्स लिमिटेड’ कंपनीत रशियाबरोबर संयुक्तरीत्या या विमानांची निर्मिती केली जाते. ‘सुखोई-३० एमकेआय’ हे खास भारताच्या हवाई दलाच्या गरजा ओळखून तयार केले आहे. हे विमान २ ‘माक’चा (ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट) वेग गाठू शकते. विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही सोय आहे. त्यामुळे विमानाच्या क्षमतेत कमालीची वाढ झाली आहे. ही विमाने जुनी झाली असली, तरीही यामध्ये अद्ययावत सुधारणा करून २०४५ पर्यंत ती वापरली जातील, असे वृत्त आहे.
जेएफ-१७ लढाऊ विमान
‘जेएफ-१७’ विमान ‘पाकिस्तान एअरोनॅटिकल कॉम्लेक्स’ आणि चीनमधील ‘चेंगडू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन’ संयुक्तपणे तयार करीत आहेत. ‘सुखोई-३०’ विमान या विमानाच्या तुलनेत ते कमी क्षमतेचे आणि मर्यादित उद्देशकेंद्री आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या ‘जेएफ १७’ विमानांचे भारताने मोठे नुकसान केले आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता आर्मेनियाची ‘सुखोई’ला पसंती मिळाली.
पुढे काय?
भारताच्या संरक्षण सामग्री खरेदीसाठी आर्मेनिया उत्सुक आहे. ‘सुखोई-३०’ विमाने पाचव्या पिढीतील अत्याधुनिक नाहीत. मात्र, आर्मेनियाला ते अपेक्षितही नाही. अझरबैजान पाकिस्तान, चीनकडून संरक्षण सामग्री घेतो. अझरबैजानला वरचढ होऊ न देणे इतकेच आर्मेनियाचे उद्दिष्ट दिसते. ‘सुखोई’बाबत करार झाला, तर भारताला फायदा होईल. मात्र, हे विमान मूळचे रशियाचे आहे, हे विसरता येणार नाही. करार करताना त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्यावी लागेल. विशेषत: भविष्यातील विमानांची देखभाल, सुटे भाग आदींबाबत स्पष्टता लागेल. रशिया युक्रेन युद्धात गुंतला असल्याने किंवा अन्य कारणाने सुटे भाग वेळेत मिळत नाहीत. या बाबी लक्षात घेऊन व्यवहार व्हावा. या भागात भविष्यात संघर्ष झालाच, तर भारतीय बनावटीची शस्त्रे कशी कामगिरी बजावतात, हेदेखील आपल्याला समजेल. स्थानिक पातळीवर त्याचा अधिक लाभ होईल. prasad.kulkarni@expressindia.com
